घरफिचर्सनिबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर

निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर

Subscribe

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा आज स्मृतिदिन. विष्णुशास्त्री हे ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार होते. त्यांचा जन्म २० मे १८५० रोजी पुणे येथे झाले. मुंबई विद्यापीठाची बी. ए.ची परीक्षा पुण्याच्या ‘डेक्कन कॉलेजा’तून ते उत्तीर्ण झाले. (१८७२) त्यानंतर पुणे व रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक शाळांतून त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. (१८७२-७९). त्यांचे वडील कृष्णशास्त्री हे संस्कृततज्ज्ञ होते. तसेच इंग्रजी साहित्याचे जाणकार, रसिक, विद्वान आणि चतुरस्त्र मराठी लेखक असल्यामुळे विष्णुशास्त्री यांनाही लेखनवाचनाची गोडी लागली.

कृष्णशास्त्री यांनी चालविलेल्या शालापत्रक या मासिकातून विष्णुशास्त्रींचा लेखनाचा आरंभ झाला (१८६८) व त्यानंतर काही वर्षांतच ते या मासिकाचे संपादकही झाले. सरकारी नोकरीत असतानाच त्यांनी निबंधमाला, हे सुप्रसिद्ध मासिक काढले (१८७४). तसेच ज. बा. मोडक आणि का. ना. साने यांच्या सहकार्याने काव्येतिहाससंग्रह हे मासिक सुरू केले (१८७८). निबंधमाला हे विष्णुशास्त्रींचे प्रमुख जीवितकार्य होते. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ अंकांतील लेखन विष्णुशास्त्रींनी जवळजवळ एकटाकी केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधांनी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि त्याच्या विकासाचा एक महत्वाचा टप्पा गाठला.

- Advertisement -

शालापत्रक, निबंधमाला, केसरी इत्यादी नियतकालिकांतून विष्णुशास्त्रींनी जे लेखन केले ते भाषा-साहित्यविषयक, सामाजिक, राजकीय असे विविध प्रकारचे आहे. त्यांच्या भाषा-साहित्यविषयक लेखांत मराठी भाषेची तत्कालीन स्थिती, भाषापद्धती, परभाषेतील शब्दांची योजना, इंग्रजी भाषा, कविता, विद्वत्व आणि कवित्व, ग्रंथांवरील टीका वगैरे विषयांवरील लेखन अंतर्भूत आहे. लोकभ्रम, अनुकरण, गर्व ह्यांसारखे विषय त्यांच्या सामाजिक लेखनात आलेले आहेत. ‘आमच्या देशाची स्थिती’ आणि ‘मुद्रणस्वातंत्र्य’ हे दोन लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय होत. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा यांविषयीचा अभिमान ही त्यांच्या लेखनामागील प्रेरणा होती. अशा या श्रेष्ठ निबंधकाराचे १७ मार्च १८८२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -