Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स गौतम बुद्धाच्या पवित्र भूमीत

गौतम बुद्धाच्या पवित्र भूमीत

गौतम बुद्धांची साधनाभूमी राजगीरमध्ये आहे. राजगीरमधील प्रमुख आकर्षण म्हणजे विश्व शांती स्तूप. हा जगभरातील ८० शांती स्तूपांपैकी एक आहे. रत्नागिरी नावाच्या डोंगरावर असलेल्या या स्तूपाकडे जाण्यासाठी एक रोपवे आहे. या रोपवेतून स्तूपाकडे जाताना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो.

Related Story

- Advertisement -

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात एक सुंदर राज्य आहे.त्या राज्यात जाण्याचा अलीकडेच योग आला.ते राज्य म्हणजे बिहार! खरं तर पर्यटनाच्या नकाशावर बिहारचे नाव तसे तळालाच असते.पण प्रत्यक्ष बिहारमधील काही काळाचं वास्तव्य आणि काही ठिकाणचं मनमुराद फिरणं हा एक समृद्ध असा अनुभव होता.बिहारबाबत मनात असलेल्या अनेक गैरसमजुतींना छेद देणारा होता.

बिहारमधील वास्तव्यात गंगानदीच्या दक्षिण तटावर वसलेल्या राजधानी पाटणासह अनेक पर्यटन स्थळांना भेट देता आली. शहरातील पाटणा म्युझियम, शहरापासून साधारण १३ किमीवर असलेले शीख धर्मियांचे दहावे गुरु गोविंद सिंह यांचे जन्मस्थान असलेले तख्त श्री पटना साहिब व श्री हरमंदिरजी पटना साहिब या नावांनी ओळखले जाणारे प्रसिद्द गुरुद्वारा आहे. हा गुरुद्वारा शिखांच्या पाच पवित्र तख्तापैकी एक मानला जातो. ६ किमीवर गंगेच्या तीरावर असलेला काली घाट, माँ शीतलादेवीचे दर्शन आणि मंदिरातील अगम कुआँ नावाची रहस्यमय विहीर, अशा पाटण्यातील अनेक ठिकाणांना भेट दिली.
त्यानंतर पाटण्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाला जाण्याचा योग आला.नालंदा हे भारतातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. अत्यंत सुनियोजित आणि सुबक पद्धतीने बांधलेले हे बौद्ध विद्यापीठ म्हणजे जगातील स्थापत्य कलेचा एक सुंदर आणि आश्चर्यकारक नमुना मानला जातो.येथील हूएन त्सांग म्युझियमही प्रेक्षणीय आहे. तसेच येथील पावापुरी जलमंदिरही प्रेक्षणीय आहे. येथूनच ११ किमीवर राजगीर नावाचे छोटे शहर आहे.अत्यंत स्वच्छ भासलेले हे शहर म्हणजे प्राचीन काळी मगध साम्राज्याची राजधानी होती.गौतम बुद्धांची साधनाभूमी राजगीरमध्ये आहे.तीर्थंकर महावीरांच्या येथील उपदेश स्थळामुळे राजगीरला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याबरोबरच राजगीरमधील प्रमुख आकर्षण म्हणजे विश्व शांती स्तूप हे आहे. हा जगभरातील ८० शांती स्तूपांपैकी एक आहे.रत्नागिरी नावाच्या डोंगरावर असलेल्या या स्तूपाकडे जाण्यासाठी एक रोपवे आहे. या रोपवेतून स्तूपाकडे जाताना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो.

- Advertisement -

भगवान महावीरांचे जन्मस्थान असलेल्या प्राचीन व ऐतिहासिक वैशाली शहराला भेट दिली. वैशाली येथील कोल्हुआ या ठिकाणीही एक अशोक स्तंभ असून या स्तंभावर उत्तर दिशेकडे तोंड केलेला एक सिंह विराजित आहे.शेवटच्या टप्प्यात मग पाटण्यापासून ११० किमी असलेल्या बोगद्याला निघालो. वाटेत सुमारे ४० किमी अंतरावर धानारुआ या ठिकाणी श्रीसाईबाबांचे एक मंदिर लागले. या ठिकाणी श्रीसाईबाबांचे दर्शन घेऊन बोगद्याकडे कूच केले.बोगद्याला पोहोचल्यानंतर येथील ज्या बोधी (पिंपळ) वृक्षाखाली बसून भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते, त्या बोधीवृक्षाचे दर्शन घेतले. येथील महाबोधी मंदिर १८० फूट उंचीचे असून अत्यंत कोरीव पद्धतीने बांधण्यात आले आहे. बोगद्याला थायलंड, जपान, श्रीलंका आदी अनेक देशांनी भव्य दिव्य मंदिरं बांधली आहेत. पाटण्याच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विमानतळावरून, शांती आणि करुणेचा संदेश देणार्‍या गौतम बुद्धाच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या बिहारचा जड अंतकरणाने निरोप घेताना खरंच मन भरून आलं.


– प्रदीप शंकर मोरे

- Advertisement -