घरफिचर्सइलेक्ट्रॉनिक्स नातेसबंधांची पोकळ दुनिया

इलेक्ट्रॉनिक्स नातेसबंधांची पोकळ दुनिया

Subscribe

मिळवलेली प्रत्येक गोष्ट समाधानापेक्षा असमाधानी करण्यास हातभार लावू लागते. ज्याच्यापाशी एकच गोटा होता किंवा दहा गोटे होते, तेही त्या गोष्टीत दु:खी होतात, तशी आजकाल एकूण समाजाची दुर्गती झाली आहे. कारण आपण समाधान मिळवायचे विसरून गेलो आहोत आणि जगण्याची मजा घेण्यापेक्षा ‘एन्जॉय’ करण्याच्या आहारी गेलेले आहोत.

काही दिवसांपूर्वी एक बातमी आली. पालघर येथे वास्तव्य असलेल्या एका पारशी वृद्ध जोडप्याची एकुलती एक मुलगी लग्न होऊन अहमदाबादला आहे. तिचे आईवडील खूप थकलेले आणि त्यांची देखभाल करायला कोणीच नाही, म्हणून नोकर आहेत. त्यापैकी आईचा अलिकडेच मृत्यू झाला, म्हणून शेजार्‍यांनी मुलीला कळवले. तर तिने पालघरला येणे अशक्य असल्याने अंत्यसंस्कार उरकून घेण्याचा शेजार्‍यांना सल्ला दिला. इतकेच नाही,तर अंत्यसंस्काराचा विधी आपल्याला व्हिडिओद्वारे दाखवायलाही सांगितले. एक माणूस म्हणून समाजात राहाताना अशा घटनांचा मनावर कुठेतरी खोल परिणाम होतो. या घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सध्या विविध संपर्काच्या व्यवस्थांनी जग जवळ आणले व जोडले गेले आहे. आपल्या जन्मदातीची अंत्ययात्रा दुरवरूनही मुलीला प्रत्यक्ष बघता आली, ही त्यातील जमेची बाजू नक्कीच आहे. पण आईच्या अंत्यसंस्काराला एकुलत्या एक मुलीला वेळ मिळू नये ही घटना भयंकर आहे. भारतातल्या अनेक शहरातल्या शेकडो घरात असेच आज तुटलेले संबंध आहेत. आत्मियता, आपुलकी ,माया हे शब्द शब्दकोषात शिल्लक राहिले आहेत. त्या शब्दांना कुठलाही आधार उरलेला नाही.

माणूस हा मुळातच कळपात जगणारा प्राणी आहे. विविध विषयात तसा उल्लेख मुद्दाम केला जातो. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हणायचा वास्तविक अर्थ काय? समाज म्हणजे तरी काय? इतर प्राणी जसे थव्याने वा कळपाने एकत्र जगतात, तसाच माणुसही कळपात वावरतो. जो भित्रा प्राणी असतो, तोच कळपाने जगतो. माणूस त्याला अपवाद नाही. आपण एकटेच आपले संरक्षण करू शकत नाही आणि समूहशक्तीनेच आपण सुरक्षित राहू शकू, अशा भयापोटी समाज नावाचा कळप माणसाने स्विकारलेला असतो. या कळपातूनच नातेसंबंध तयार होतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शेकडो नव्हे, तर कोट्यवधी माणसे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत असताना त्यातील माणसाने निर्माण केलेले नातेसंबंध कुठे राहिले आहेत. पालघरच्या घटनेतील मुलीला फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर खूप सारे मित्र असतील पण ती जर आपल्या जन्मजाती आईच्या अंत्यसंस्काराला हजर राहू शकत नसेल तर त्या इलेक्ट्रॉनिक्स नातेसंबंधांचा काय उपयोग?
आपण नातीगोती, भावभावना असल्या मानवी जाणिवांना पारखे झालेले आहोत. आयुष्यभर पालक आपल्या पुढल्या पिढीसाठी राबत राहातो. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि आपल्या आयुष्यात खावे लागलेले टक्केटोणपे मुलांच्या वाट्याला येऊ नयेत, म्हणून पालक आयुष्य खर्ची घालतो. पण जेव्हा त्याची परतफेड करायची वेळ येते, तेव्हा मुले कुठे असतात? परदेशी वा अन्य कुठे दूर जाऊन वसलेली असतात. त्यांना आपल्याच जन्मदाते पालकांविषयी कुठलीही आत्मियता उरलेली नसते. त्यासाठी मुलांनाही दोषी मानण्याचे कारण नाही. भौतिक सुखांच्या अतिरेकाचे महात्म्य आपणच त्यांना शिकवलेले रुजवलेले नसते का? ही स्थिती श्रीमंत पालक वा सुखवस्तू कुटुंबातलीच नाही. घडणारे गुन्हे वा विसंवादाकडे बघितले, तर माणसे आपले माणुसपण हरवून बसलेली दिसतील. कालपरवा मराठा मोर्चात सहभागी झालेला एक तरूण औरंगाबादला नदीत उडी टाकून मोकळा झाला. तेव्हा कोणी त्याला वाचवायला पुढे सरसावला नाही. उलट त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन तो घुसमटत मृत्यूशी झुंजताना, शेकडो सहकारी त्याचा जयजयकार करीत होते. व्हिडिओ घेण्यात मग्न होते. रस्त्यावर चौकात कुठे मुली महिलांची छेड काढली जाते वा अब्रु लुटली जाते. तेव्हा बघे उभे असतात, पण हस्तक्षेप करायची हिंमत कोणी दाखवत नाही. नंतर न्यायासाठी आवेशात आरोळ्या ठोकल्या जातात, हे आजकालचे संस्कार झालेले आहेत.

- Advertisement -

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि त्याला इतरांना समजून घेऊन सुखदु:खात सहभागी होऊनच जगणे भाग असते, हे आपण आता विसरून गेलेले आहोत. साहाजिकच अशा बातम्या कानावर येतात किंवा वाचनात येतात, तेव्हा आपल्या अंगावर शहारा येत असतो. वाहिन्यांवरच्या मालिका बघून त्यातले मानवी संबंध बघून डोळ्यांत अश्रू येतात. आज संपूर्ण भारतीय समाज जीवनमान उंचावलेले असले तरी दु:खी दिसतो. कारण आपले सुख वा आनंद कशात सामावलेला आहे, त्याची जाणिवच बोथटलेली आहे. त्या कथेतल्या गोट्यांप्रमाणे अधिकाधिक संपत्ती गोळा करण्यात दमछाक होते आणि जिथे तो पल्ला गाठला जातो, तिथे त्याची उपयुक्तता नसल्याचे एक नैराश्य जीवनाला व्यापून टाकते. पैसा, संपत्ती वा सुविधा या माणसासाठी असतात. त्या समाधानाचे संपादन करण्यासाठी असतात. जे कमावले ते उपभोग घेण्यासाठी असते आणि त्या उपभोगातून समाधान लाभत असते; त्याचे भान राखायला हवे. इतर कुणापाशी काय आहे वा त्याने ते कमावल्याने तो सुखी झाल्याच्या भ्रमातून बाहेर पडल्यास त्याचा अर्थ लागू शकतो. हव्यास आणि समाधान यात मोठा फरक असतो. हव्यासातून आनंद मिळत नाही की मिळवल्याचे समाधानी मिळत नाही. काहीतरी मिळवायचे मिळायचे राहूनच जाते. जाहिरातीच्या मोहजालात भरकटले, मग घरातला उपयुक्त टीव्हीही भिकारपणाचे लक्षण वाटू लागतो. आपल्या मनात अशी न्युनगंडाची धारणा जिथून निर्माण होते वा केली जाते; तिथून मग सुखातल्या दु:खाचा आरंभ होत असतो. त्यातून मग सुटका नसते. मिळवलेली प्रत्येक गोष्ट समाधानापेक्षा असमाधानी करण्यास हातभार लावू लागते. ज्याच्यापाशी एकच गोटा होता किंवा दहा गोटे होते, तेही त्या गोष्टीत दु:खी होतात, तशी आजकाल एकूण समाजाची दुर्गती झाली आहे. कारण आपण समाधान मिळवायचे विसरून गेलो आहोत आणि जगण्याची मजा घेण्यापेक्षा ‘एन्जॉय’ करण्याच्या आहारी गेलेले आहोत. किंबहुना प्रत्येक बाबतीत दु:ख शोधण्यात आपण पुरते गढून गेलो आहोत. त्यातून मुक्त होऊ तेव्हाच अच्छे दिन सुरू होतील. कारण जे टोचतबोचत असते, अडलेनडले असते, त्यातून बाहेर पडण्यालाच सुखाची अनुभूती म्हणतात. मात्र आज आपण तिच विसरलोय.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -