घरफिचर्सगिधाडे, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि संवर्धन

गिधाडे, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि संवर्धन

Subscribe

आजारी गुरांना डायक्लोफेनॅक हे वेदनाशामक औषध दिले जाई. गुरांच्या मृत्यूनंतर त्यावर मांसभक्षण करणार्‍या गिधाडांच्या मूत्रपिंडावर या औषधाचे परिणाम आढळून येऊ लागले व कालांतराने गिधाडांची संख्या ही कमी होत गेली. यामुळे भारतातील तब्बल 99 टक्के गिधाडे आपण गमावली आहेत. हा वेगाने झालेला बदल पाहता इंटरनॅशनल युनिअन फॉर कॉन्सर्व्हेशन ऑफ नेचरद्वारे त्यांना अत्यंत धोक्याच्या श्रेणीत समाविष्ट केले गेले आहे. भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 च्या सूची क्रमांक 1 मधे गिधाडांचा समावेश आहे, म्हणजेच जेवढं संरक्षण वाघांना व बिबट्याला दिलेले आहे, तितकेच गिधाडांना.

आपल्या एस टी महामंडळाचा मी मोठा चाहता. किती अस्वचछ का असेना, ती आपलीच. कुठला सण असो किंवा नैसर्गिक आपत्ती, एस टी कधी थांबलेली मी पाहिली नाही. बरं चालकही तितकेच कार्यक्षम. याच एस टीने मला संपूर्ण महाराष्ट्राचे दर्शन घडवले. घाटातील नागमोडी वळणे असो किंवा कोकणातले रस्ते, मी याच लाल डब्याच्या खडखडणार्‍या खिडकीतून अनुभवले. उन्हाची दिशा टाळून मागच्या चाकावरील खिडकी पकडली, की माझ्यासाठी प्रवास अगदी आनंदाचा. माळशेज घाटाला सुरुवात झाली की उजवीकडे नाणेघाट, जीवधन खडा पारशी, भैरवगड, भोजगिरीसारखे उंच कडे दृष्टीस पडू लागतात तसेच डावीकडे मोरोशी, कोल्हेवाडी, रोहिदास, हरिश्चंद्रगड व तारामतीच्या छटा पिंपळगाव जोगा धरणाच्या निळसर पाण्यात स्पष्टपणे अवतरतात. निसर्गरम्य परिसर आणि तारांवर बसलेले पक्षी पाहता पाहता आळेफाट्यापर्यंतचा प्रवास कधी संपतो हेसुद्धा कळत नाही.

या वाटेवर प्रवास करताना 2013 साली एस टीतून पाहिलेलं गिधाड माझ्यासाठी अजूनही तितकाच अविस्मरणीय क्षण आहे. माझ्यासारख्या सहसा छोट्या पक्षांकडे पाहणार्‍याला गिधाड हे पाहताक्षणी बलाढ्यच वाटले. माळशेज लिंगीच्या जवळपासच त्याचे 5-7 सेकंदासाठी दर्शन झालेले मला अजूनही स्पष्ट आठवते. त्यापूर्वी गिधाडं हिमालयात जवळूनही पाहिली होती, पण महाराष्ट्रात गिधाड पाहण्याचा हा अनुभव काही औरच. मृत जनावराच्या हाडामासावर मांसभक्षण करणारा हा पक्षी जणू सफाई कामगारच. आपल्याकडे आधी प्रचंड प्रमाणात आढळणारी ही गिधाडे डायक्लोफेनॅक सारख्या औषधांमुळे नष्ट झाल्याचे आपण सर्वांनीच ऐकले आहे.

- Advertisement -

आजारी गुरांना डायक्लोफेनॅक हे वेदनाशामक औषध दिले जाई. गुरांच्या मृत्यूनंतर त्यावर मांसभक्षण करणार्‍या गिधाडांच्या मूत्रपिंडावर या औषधाचे परिणाम आढळून येऊ लागले व कालांतराने गिधाडांची संख्या ही कमी होत गेली. यामुळे भारतातील तब्बल 99 टक्के गिधाडे आपण गमावली आहेत. हा वेगाने झालेला बदल पाहता इंटरनॅशनल युनिअन फॉर कॉन्सर्व्हेशन ऑफ नेचरद्वारे त्यांना अत्यंत धोक्याच्या श्रेणीत समाविष्ट केले गेले आहे. भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 च्या सूची क्रमांक 1 मधे गिधाडांचा समावेश आहे, म्हणजेच जेवढं संरक्षण वाघांना व बिबट्याला दिलेले आहे, तितकेच गिधाडांना.

महाराष्ट्रात काही ठिकाणी त्यांची संख्या अजूनही स्थिर असल्याचे आढळते. त्र्यंबकेश्वरच्या दक्षिणेकडील ब्रह्मगिरीच्या पर्वत रांगा व आग्नेय दिशेकडील अंजनेरी सारख्या ठिकाणी गिधाडे अगदी सहज पाहायला मिळतात. खोरीपाडा सारख्या गावांनी राबवलेल्या गिधाड संवर्धन उपक्रमाचा अभिमान तर वाटतोच, परंतु जागतिक पातळीवर अजून त्याची तितकीशी ओळख झालेली नाही हे दुर्दैव. संवर्धन व वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊनच अशा प्रसंगाकडे पाहू शकतो का? किंवा एखादी विशिष्ट शैक्षणिक पार्श्वभूमीच अशा प्रश्नांचे उपाय सुचवू शकते का? असे प्रश्न सतत पडत असतात. याचे उत्तर गुंतागुंतीचे जरी असले तरी वैध आहे.

- Advertisement -

हल्लीच जोनस नामक एका स्वीडिश व्यक्तीशी ओळख झाली. याचे गिधाडांवर अत्यंत प्रेम, इतके की प्रत्येक वाक्यात स्कॅव्हेंजर (मांसभक्षक) हा ठरलेला शब्द. गिधाडांविषयी चर्चा करता करता कधी नाशिकची मोहीम ठरली देवास ठाऊक. ठरल्याप्रमाणे मोहीम निश्चित करून आमची प्रवासाला सुरुवात झाली. प्रवासात त्याच्या 7-8 वर्षांच्या युरोपिअन रोलर पक्षाचा अभ्यास ऐकून बरीच अज्ञात माहिती देखील मिळाली. प्रवास थांबला तो अंजनेरी गडाखाली. रात्रीचा मुक्काम करून सकाळी लवकर गिधाडे शोधायला सुरुवात झाली. आर्ट अँड कल्चर क्षेत्रात या अभ्यासाचा उपयोग कसा होऊ शकतो हे मला तेव्हा कळले. इजिप्तच्या प्राचीन वास्तुकलेमध्ये गिधाडांचा कसा समावेश होता याबद्दलही माहिती मिळाली.

उत्तर इजिप्तमधील राजघराण्यात गिधाडांच्या डोक्याने बनलेले मुकुटही वापरले जात. ही माहिती मिळवताना गिधाडेही दृष्टीस पडू लागली. नैसर्गिक अधिवासात गिधाड पाहण्याचे जोनसचे स्वप्न पूर्ण होत होते. साधारण 4-5 गिधाडे पाहून आम्ही पुन्हा खाली उतरू लागलो. पण प्रश्नाच्या मिळालेल्या उत्तरामुळे व माहितीमुळे मन अधिक प्रसन्न झाले. संवर्धनाचा प्रश्न जरी एक असला तरी तो सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत याचा भास त्या क्षणी झाला. एखाद्या विशिष्ट श्रेणीतीलच नाही तर वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीतून केलेल्या अभ्यासाचाही संवर्धनावर तितकाच प्रभाव पडतो.

परतीचा प्रवास सुरू तर झाला, पण लाल डब्याच्या त्या खडखडणार्‍या खिडकीतून मी प्रत्येक मिनिटाआड गिधाडांसाठी अंजनेरीच्या कड्याकडे वळून बघत असल्याचे ध्यानात आले आणि 2013 मध्ये पाहिलेल्या त्या गिधाडांचे चित्र पुन्हा डोळ्यासमोर एकाएकी चकाकले.

-तुषार परब 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -