आम्ही आदिवासी..देशाचे मूळ निवासी

आदिवासी

आम्ही आदिवासी …देशाचे मूळ निवासी, या थिएटर ऑफ रेलेवन्सने आयोजित केलेल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या आदिवासी मुलांनी “पर्यावरण संतुलन आणि संरक्षण आधारित विकास” या विषयावर नाटक सादर केले. आदिवासींच्या हक्काचे व नैसर्गिक स्रोतांचे शोषण, विस्थापितांची बिकट अवस्था हे अनुभव मुलांच्या जीवनातील होते. नाटकाच्या माध्यमातून ते कसे मांडायचे हे मुलांनी अनुभवले.

आम्ही आदिवासी
– मंजुल भारद्वाज

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी …
देशाचे मूळ निवासी …
आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी …

आम्ही जंगलात राहतो
हो … हो …
आम्ही डोंगरावर फिरतो
हो … हो …
आम्ही वाघासोबत बागडतो
हो … हो …
आम्ही निडर, बहादूर, धाडसी …

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी …
देशाचे मूळ निवासी …

तुम्ही पाणी आमचा चोरता
मग चार टाळकी बसता
मग तुम्हीच कायदा काढता
आणि आमची जागा लुबाडता
आणि म्हणतात कसे
” लोकशाही ” आहे …

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी …
देशाचे मूळ निवासी …

आम्ही झाडांना सांभाळतो
हो … हो …
आम्ही निसर्गाला जपतो
हो … हो …
आणि आम्हीच उपाशी मरतो
आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी
देशाचे मूळ निवासी
आणि आम्हीच मरतो उपाशी…

असा या देशाचा कारभार
लोकं म्हणे शिकले
शिकून लय मोठे झाले
बाजार आणलाय
शहर मोठे मोठे झाले
मोठा मोठा पगार घेतात
लाख लाख घेतात
बंगला पण बांधलाय
मोटारगाडी आणलीय

आणि ….
मोठा आजार घेतलाय
आजार बाजार व्यापार
अरे बंद करा बंद करा
जीवनाचा व्यापार बंद करा …

केला निसर्गाचा सत्यानाश
आणि याला हे म्हणतात
हा बघा ” विकास “

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी …
देशाचे मूळ निवासी …

कॉम्प्युटर आणलाय
म्हणे जग एक झालं
एक झालं म्हणजे काय हो ?
जागतिकीकरण
आणि यात आम्हा आदिवाशांचे मरण…
पर्यावरणाची बोंबाबोंब !!

मायेचं तापमान वाढलंय
निसर्गचक्र बिघडलंय…

चला जागे होऊया
चला एक होऊया
घडवूया आपलं अस्तित्व
करूया यांच्या विकासाचा
अस्त अस्त अस्त …

आमचे जीवन सुंदर आहे! या आरोळ्यांनी दुमदुमलेला निसर्ग, थंडगार वारा.. कोवळं ऊन..
पर्वतरांगा..

टेकड्या चढताना, एक जागी ऊन तर लगेच दुसर्‍या बाजूला सावली असा ऊन सावलीचा खेळ बघताना डोळे अगदी भारावून जायचे.. डोंगरांच्या मध्यभागी एक छोटेसे गाव, गावातली निरागस माणसं आणि आमच्याभोवती सतत किलबिलणारी मुलं.. हो, मी एका आदिवासी पाड्याचा अनुभव तुम्हाला सांगत आहे.

“आदिवासी”, नावातच अर्थ आहे. आदीकाळापासून आपल्या निसर्गाचे, आपल्या गावाचे, आपल्या देशाचे अस्तित्व टिकवण्यासाठी वसलेली लोकं. या माणसांचा एकच धर्म- माणुसकी, आयुष्याचे एकच ध्येय-श्रम आणि समाधान आणि एकच कर्तव्य-निसर्गाचे संरक्षण. अशी ही मानव प्रजाती, सध्याच्या काळ चक्रातून बाहेर फेकली गेली, असे का ? उत्तर अगदी सोपं आहे – “जागतिकीकरण”. या जागतिकीकरणाने विश्वाला एका मखमली जाळ्यात गुंडाळून, आदिवासींना अलगद अलिप्त केले. आर्थिक सुधारणा, विकास आणि पायाभूत सुविधा, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाने मूलभूत मानवी अधिकारांचे हनन केले. ज्या जल, जंगल आणि जमिनीचा आयुष्यभर हे आदिवासी आपले जीवन समजून जगत आले त्यावरच भांडवली ताकदींनी कब्जा केला.

अशात आम्ही आदिवासी …देशाचे मूळ निवासी. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सहभागींनी “पर्यावरण संतुलन आणि संरक्षण आधारित विकास” या विषयावर नाटक सादर केले.

आदिवासींच्या हक्काचे व नैसर्गिक स्रोतांचे शोषण, विस्थापितांची बिकट अवस्था हे अनुभव मुलांच्या जीवनातील होते; पण नाटकाच्या माध्यमातून यांना कसे मांडायचे हे मुलांनी अनुभवले ..आपल्या विनाशाचा जागतिकीकरणाशी / विकासाशी थेट संबंध आहे. कारण शहरातून येणारे.. मोटरगाडीतून फिरणारे so called श्रीमंत असतात असा आदिवासींचा गैरसमज होता; पण चार दिवस चालणार्‍या थिएटर ऑफ रेलेवन्स कार्यशाळेमधून त्यांनी हे जाणले की .. श्रीमंती ही पैशाने नसते … या ‘विक्री आणि खरेदी’ च्या काळात आपण जगण्यासाठी कुठलीच गोष्ट विकत घेत नाही आणि म्हणूनच आपण श्रीमंत आहोत, आपले जीवन खूप सुंदर आहे. आपण आदिवासी जंगलात राहतो, डोंगरात फिरतो, सुंदर निसर्गासोबत जगतो … निसर्गाला आपण जपतो… शहरातल्या उपभोग घेणार्‍यांसारखे ओरबाडत नाही… निव्वळ स्वतःचा विकास करणे आणि स्वतःच्या जगण्यासाठी निसर्गाचा र्‍हास करणे ही संस्कृती आम्हा आदिवासींमध्ये नाही … आणि म्हणूनच आदिवासींचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे.

आपल्या हक्कांसाठी आता आपल्यालाच लढावे लागणार याची जाणीव या नाट्य कार्यशाळेत मुलांनी अनुभवली… माझ्या हक्कांसाठी आता मला लढावे लागणार … आम्ही आदिवासी …. या नावातच माणसाचे अस्तित्व आहे. आदी काळापासून वसलेली माणसं, त्यांची निसर्गाशी, पशु पक्ष्यांशी असलेली सांगड , माणुसकीच्या तत्वाला जगवणारी आहे. माझ्याकडे निसर्गाची विपुल साधन संपत्ती आहे … तिचा विनाश न करता नियोजन करून मी समृद्ध होण्याची कला आत्मसात करण्याची संकल्पना या कार्यशाळेत समजली … या मुलांमध्ये कला जन्मजात भिनलेली असते आणि निसर्गाशी जवळ असलेला कलाकार हा नेहमीच विशुद्ध असतो, ही जाणीव या कार्यशाळेत झाली. या प्रक्रियेतून मुलांना नेतृत्वाची जाणीव झाली. काहींनी पहिल्यांदाच आपला आवाज मनापासून ऐकला. एका मुलाचा अनुभव तर असा होता की त्याचे वडील पावसाळ्यात सगळ्या परिवारासोबत शेती करतात; पण उन्हाळ्यात पाण्याअभावी शेती करता येत नसल्याने शहरात वेठबिगारी गवंडीचे काम करतात. मालक असलेला आदिवासी शहरात जाऊन गुलाम बनतो. हाच प्रश्न या मुलांनी या नाटकात मांडला आणि याच प्रक्रियेत याचे उत्तरही शोधले. एकत्र येऊन काम करण्याची प्रेरणा मिळवली.” आम्ही आमच्या जमिनी कारखान्यासाठी देणार नाही” , ” ही जागा आमची आहे” , ” आम्ही उपाशी मारणार नाही !” , असे नारे लावत या आदिवासी मुलांनी एकमेकांची सोबत देऊन , स्व-अस्तित्वासाठी लढा देणारी टीम तयार केली.

जननीचा (पृथ्वीचा) ताप प्रत्येक क्षणी वाढतो आहे. आपली धरती आता संकटात आहे. मध्यमवर्गीय लोकांचा विकास व्हावा म्हणून मोठमोठी झाडे, जंगले धडाधड कापली जात आहेत. संपूर्ण देशभरात दुष्काळ आता तोंडाशी येऊ लागला आहे. शेतकर्‍यांची अवस्था विकासाचा जप करणार्‍या अंध भक्तांसमोर आहे. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या 27 मुला-मुलींनी ” पर्यावरण संतुलन आणि संरक्षण” विषयावर आपली प्रस्तुती सादर केली.

माणसापासून माणुसकी आणि प्रकृतीपासून नैसर्गिक संसाधने हिसकावून घेणारे हे ” जागतिकीकरण ” – विषमता आणि अन्यायाचे वाहक आहे. हवा, पाणी, जंगल आणि माणुसकीला नष्ट करणारा या विकासाचा पाया इतका मजबूत झाला आहे की आता पृथ्वीचा ताप वाढत चालला आहे. अशा वेळी लोकशाही व्यवस्थेचा आवाज ‘मीडिया’ पण भांडवलदारांच्या मांडीवर बसून नफा कमवत आहे.. पुरातन काळापासून आदिवासी ” जल, जंगल आणि पर्यावरणाचे” संतुलन आणि संरक्षणाचे रखवालदार राहिले आहेत. या कार्यशाळेत नाटकाच्या माध्यमातून या कल्पनेला पुनर्स्थापित केले गेले की, विकल्या जाणार्‍या फिल्मी लोकांऐवजी, ‘आदिवासी’ पर्यावरणाच्या संतुलन आणि संरक्षणाचे ‘खरे आणि टिकाऊ दूत’ आहेत.

-अश्विनी नांदेडकर. (रंगकर्मी)