घरफिचर्सलिंगपरिवर्तन - वाचते, बोलते व्हा!

लिंगपरिवर्तन – वाचते, बोलते व्हा!

Subscribe

बीड जिल्ह्यातल्या पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवेचा ललित साळवे झाल्याच्या बातम्या आल्या तशी  लिंग  लिंगपरिवर्तनाच्या मुद्द्यावरुन एकाएकी चर्चा सुरू झाली. पण ही सगळी चर्चा बहुतांश ‘ऐकलं का हे?’ अशा गॉसिप स्वरूपाची, किंवा ‘हे काय भलतंच?’अशा हेटाळणीची घडते आहे. पण कायद्याने संमत असलेल्या लिंगपरिवर्तनाबाबत शास्त्रीय माहिती अजूनही पुरेशी पोचलेली नाही हे वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा ठळक झालं.

आजघडीला सरकारी किंवा खासगी रुग्णालयातही लिंग परिवर्तनाच्या शस्त्रक्रिया करण्याचं किंवा एखाद्या व्यक्तीने त्यासाठी दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे. पूर्वी लिंगबदल किंवा लिंगपरिवर्तन हे शब्द डॉक्टरांसमोर काय तर घरच्यांसमोर देखील सहजी उच्चारले जायचे नाहीत. याच्यामागचं कारण एकच ते म्हणजे ‘लोकं काय म्हणतील’! मुलगा किंवा मुलगी या दोघांना ही किशोरवस्थेत त्यांच्या शरीरात होणारे बदल जाणवतात.  मुलं जसजशी मोठी होतात तसतसा शरीरातील प्रत्येक अवयव बदलत असतो. पण, हे होणारे बदल जर सुखावण्याऐवजी अडचणीचे, घुसमटीचे वाटत असतील तर? हे सगळं इतकं अनवट, गुंतागुंतीचं असतं की ते नेमकं  कुटुंबियांच्या कानावर कसं घालायचं, त्यांच्या गळी कसं उतरवायचं या पेचात मुलं अडकतात. त्यातले काही तर आयुष्यभर घुसमट सहन करतात.

- Advertisement -

जे थोडे धाडसाने पुढे येत लिंगबदल करुन घेतात त्यांना आयुष्यभर समाजात वावरणं अजिबातच सोपं नसतं. खरंतर लिंगबदल म्हणजे निसर्गाच्याविरोधात जाऊन काहीतरी करणं असाच समज बहुतेकांचा असतो.  पण, लिंगबदलाचा अधिकार प्रत्येकाचा मानवी हक्क आहे, हे ही आपण समजून घेतलं पाहीजे.

अशी असते लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया 

- Advertisement -

दोन प्रकारची लिंगबदल शस्त्रक्रिया असते. महिलेतून पुरूष आणि दुसरी पुरुषातून महिला. ज्यात महिलेला लिंगबदल करुन पुरुष करण्यासाठीच्या प्रक्रियेला जवळपास दीड ते दोन वर्ष जातात, असंही तज्ज्ञ प्लास्टिक सर्जन्स सांगतात. पुरुषाला महिला बनवणं तुलनेने सोपं असतं. परंतु महिलेला पुरुष बनवणं बरंच गुंतागुंतीचं असतं. कारण एखाद्या स्त्रीला अवयव म्हणून पुरूषाचं लिंग देणं अवघड असतं. यामध्ये स्त्रिची गर्भाशयाची पिशवी काढून टाकावी लागते आणि पुरूषांच्या प्रजननाशी निगडित गोष्टी पाहाव्या लागतात. लिंगबदल करून पुरुषाचं रूपांतर स्त्रीमध्ये करताना स्तन, योनी यांसारख्या अवयवांचं रोपण केलं जातं. शिवाय, अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया असते. त्वचा, मज्जातंतू, रक्तवाहिन्या आणि सपोर्ट यांचा फ्लॅप तयार करावा लागतो. ज्याला ‘कंम्पोझिट यूनिट ऑफ टिश्यू’ असंही म्हणतात. हाताची किंवा मांडीची त्वचा वापरावी लागते. त्यानंतर त्यांच्यात संवेदना निर्माण होतात. तब्बल 2 ते 3 स्टेजेसच्या प्रक्रियांनंतर पुरुषाची महिला आणि महिलेचा पुरुष होतो.  या शस्त्रक्रियांचा खर्च ५ लाखांपासून तब्बल ४० लाख रुपयांपर्यंत येतो.

समुपदेशनही महत्त्वाचं

एखादी महिला किंवा पुरुष लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी दवाखान्यात आला तर त्याचं आधी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन केलं जातं. आपल्या नावापासून ते आपल्या ओळखीपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये हळूहळू बदल करण्याचा सल्ला दिला जातो. एखाद्या महिलेला जर पुरुष व्हायचं‌ असल्यास तिचे स्तन काढले जातात. इतरही अनेक प्रक्रिया सुरवातीच्या काळात शरीरावर केल्या जातात. या संपूर्ण प्रक्रियेनंतर लिंगबदल केलेल्या स्त्रीच्या शरीरावर केस येतात. मिशी येते. आवाजात घोगरेपणा, कणखरपणा येतो. हार्मोन्सची औषधं, मानसिक समुपदेशन यात नियमितता ठेवावी लागते. पुरुषाने लिंगबदल केल्यास स्त्रीचे सर्व गुण हळूहळू त्याच्यामध्ये दिसू लागतात. ही दीर्घकाळ चालणारी ही प्रक्रिया असते. तसंच, प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात ही प्रक्रिया वेगळीही असू शकते. संपूर्ण शस्त्रक्रिया झाल्यानंतरही समाजात वावरताना त्यांना कसल्याही प्रकारची भीती किंवा खंत वाटू नये म्हणून पुन्हा रुग्णाचं, नातेवाईकांचं समुपदेशन केलं जातं.

अडथळे काय असतात ?

एरवी एखादी छोटीशी जरी शस्त्रक्रिया कुणी करवून घेत असेल तरीही त्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. या शस्त्रक्रियेमध्ये कुठल्याही स्टेजवर काहीही चुकीचे घडू शकते. त्यामुळे खूप अभ्यास आणि नियोजन करुनच या शस्त्रक्रिया केल्या जातात. अशा शस्त्रक्रियांमध्ये संसर्ग होऊ शकतो, रक्तदाब सतत तपासावा लागतो,शिवाय भूल देताना रुग्ण फीट असला पाहिजे. यादरम्यान रुग्णालाही मानसिक ताणातून जावे लागते. त्यामुळे त्याला झालेली एखादी जखम भरण्यासही वेळ लागतो.
प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर एक अनुभव सांगताना म्हणाले, ‘एक पेशंट आली होती माझ्याकडे जिला पुरुष बनायचं होतं. तिच्यासोबत तिची मैत्रीणही होती. दोघांची वयं अनुक्रमे ३० आणि २५ असतील. ज्या महिलेला पुरुष बनायचं होतं, तिचे आम्ही स्तन काढले. तिचं लिंग बदललं. त्यानंतर ही पुरुष झाल्यावर त्या दोघांनी त्यांच्या आई-वडिलांच्या संमतीने लग्नदेखील केलं. यातील जी महिला आहे ती ब्युटीशियनचा व्यवसाय करते. तर, पुरुषाचा स्वत:चा व्यवसाय आहे. कपूर यांनी आतापर्यंत अशा बऱ्याच शस्त्रक्रिया केल्या आहेत. अनेकदा या गोष्टी बाहेर कळू नयेत म्हणून प्रयत्न केले जातात. पण, पेशंटचे नातेवाईकही बाहेर सांगून टाकतात, त्यामुळे सरकारी रुग्णालयात असे पेशंट येण्याचं प्रमाण कमी असतं. शिवाय इथे उपचार चांगले होत नाहीत असाही समज असतो, पण ज्यावेळी त्यांना वास्तव कळतं त्यावेळी लोक महाराष्ट्राबाहेरुनही येतात. आता जनजागृती वाढली असल्याकारणाने अशा केसेस यायला सुरुवात झाली आहे. सामान्यतः १८ वर्षानंतर व्यक्ती सज्ञान होते त्यामुळे या वयानंतर लिंगबदलाचा निर्णय घेता येऊ शकतो.” याविषयी सेक्स चेंज स्पेशालिस्ट डॉ. पराग तेलंग यांना विचारलं असता ते म्हणाले, “सध्या सेक्स चेंज सर्जरी करण्यासाठी अनेक लोकं खुलेपणाने समोर येत आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की, अशा लोकांचा समाजाकडून स्वीकार होण्यास बराच वेळ लागतो. दर महिन्यात ५-६ रुग्ण लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी येतात. ही शस्त्रक्रिया एकाच दिवशी होत नाही. यासाठी चार-पाच वेळा विविध शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया होण्यात बराच कालावधी जातो.

मुलं किशोरवस्थेत येताना मुलांमध्ये असे बदल आढळतात. एवढ्या लहान वयात असे बदल जाणवले की त्यांनाही साहजिकच भीती, अस्वस्थता  वाटते. पण, सामान्यपणे १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मुला-मुलींमध्ये येतो. त्यानंतरच ही मुलं निदानासाठी किंवा सल्ल्यासाठी दाखल होतात. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही महत्त्वाचा असतो. त्यामुळे लिंगपरिवर्तनासाठी त्यांचं आधी समुपदेशन केलं जातं.  असं, शीव रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निलेश शाह यांनी सांगितलं आहे.

‘हमसफर ट्रस्ट’ची खंबीर साथ 

लिंगपरिवर्तन केलेल्या तरुण-तरुणींसाठी ‘हमसफर’ ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावते. जिथे समाज या लोकांना स्वीकारत नाही तिथे ‘हमसफर ट्रस्ट’ अशा लोकांना नोकरीची संधी, आधार, जगण्याचे बळ अशा अनेक गोष्टी मिळवून देते. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘हमसफर ट्रस्ट’ आणि लिंगपरिवर्तन केलेले लोक एकमेकांशी जोडलेले आहेत. लिंगपरिवर्तन केलेल्या लोकांसाठी प्रोजेक्ट ट्रान्सजेंडर, कॉपोरेट सेक्टर, जनजागृतीचे उपक्रम, कम्युनिटी ट्रान्सजेंडर, लैगिंकता असे अनेक उपक्रम हमसफरकडून राबवले जातात.

हे सगळं समजून घेण्यासाठी मी हमसफर ट्रस्टमध्ये प्रोजेक्ट हेड म्हणून काम करणाऱ्या श्रेया रेड्डीला भेटले.ती या विषयावर मोकळेपणाने बोलली, ‘मातेने बाळाला जन्म दिल्यानंतर तो आईचा पुर्नजन्म असतो असं म्हणतात. तसंच आमचं देखील असतं. अशा प्रकारचे जीवन जगून स्वत:ला समाजाच्या मुख्यप्रवाहात आणणं खरंच सोपं नसतं.’ श्रेया जन्मली मुलगा म्हणून, पण  लहानपणापासूनच मुलींसारखी वागायची. घरच्यांनी मात्र तिला कधीच मुलगी म्हणून स्वीकारलं नाही. भरतनाट्यम पाहून सुरू झालेल्या श्रेयाच्या प्रवासाला??????? अखेर हमसफर ट्रस्टने वेगळा मार्ग दाखवला. शाळेत जायचं कसं या प्रश्नामुळे श्रेयानं अर्ध्यात शाळा सोडलेली.  शिक्षण कमी झालं होतं. पण माझ्यातल्या मुलापेक्षा मला मुलगी व्हायचंय हे तिनं ठामपणे मनात ठरवलं होतं. ती पुढे बोलते, ”घरातला विरोध स्वीकारुन मी घराबाहेर पडले. १० वर्ष घरातले बोलले नाहीत. पण, बऱ्याच ठिकाणी नोकरी करुन माझ्या एका मित्राच्या साहाय्याने हमसफर ट्रस्टपर्यंत पोहोचले. मग, नोकरी करुन लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया केली. एका मुलीला जे अवयव असतात त्या सगळ्यांची मी शस्त्रक्रिया करुन घेतली. सततचं समुपदेशन, हार्मोन्सची औषधं या सगळ्यामुळे मुलगी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पण, आजही समाज आमच्यासारख्यांना स्वीकारत नाही. समाजाने आमच्यासारख्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर कदाचित आमचं जगणं सोपं होऊ शकतं.”
मुंबईत राहणाऱ्या माधुरी सरोदे या विविध सामाजिक संस्थांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात. त्यांनी दोनेक वर्षांपूर्वी जय शर्माशी केलेला विवाह ‘तृतीयपंथी व्यक्तीने  धार्मिक पद्धतीने केलेला पहिला जाहीर विवाह’म्हणून गाजलं. त्या सांगतात, ‘मी माझ्यातल्या आताच्या माधुरीचा शोध गेल्या अनेक वर्षांपासून घेत होते. अडचणी, दडपण सगळं होतं. घरातही विरोध होता. पण, नंतर सर्व व्यवस्थित झाल्यानंतर मी माझी लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया करुन घेतली आणि मला माझ्यातल्या माधुरीचा शोध लागला. १८ वर्षांपासूनच कामाला सुरूवात केली. सामाजिक कामात मग्न झाले. टीबीसाठी जनजागृतीचे कार्यक्रम राबवायला सुरूवात केली. यामुळे बरेच अडथळे आले. पण, मी थांबले नाही. शस्त्रक्रिया करुन घेतल्यावर जय शर्माशी लग्न केलं.  नवऱ्याने सांगितलं महिलेचे ओळखपत्र बनवून घे. त्यासाठी २००५ सालीच अर्ज केला आहे. पण, अजूनही मला लिंगपरिवर्तनाचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही. म्हणजे आजही शासनासह समाजातील लोकं आमच्या सारख्या लोकांना स्विकारत नाहीत याचं दु:ख वाटतं.’
कुणी स्त्रीच्या देहात पुरुष म्हणून आणि पुरुषांच्या देहात स्त्री म्हणून तळमळत असेल, तर त्यातून बाहेर येत हवी ती ओळख-अस्तित्व मिळवणे हा हरेक मानवी देहाचा हक्क आहे. कारण कोंडी गक्त देहाची नसते. मना-मेंदूचीही असते. ती ओळखत आपणही समाज म्हणून अशा हरेकाला सोबतीचा हात दिलाच पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -