घरताज्या घडामोडीवेब 3.0 : माध्यमांपुढे आव्हाने आणि आशय निर्मितीत संधी !

वेब 3.0 : माध्यमांपुढे आव्हाने आणि आशय निर्मितीत संधी !

Subscribe

युरोपमधील प्रसिद्ध फूटबॉल क्लब आहे युवेंट्स. या क्लबने 2018 मध्ये त्यांच्या फॅन टोकन्सची निर्मिती केली. अशा पद्धतीने फॅन टोकन्स बाजारात आणणारा युवेंट्स हा युरोपमधील पहिलाच क्लब. ज्या फॅन्सकडे ही टोकन्स आहेत, त्यांना या क्लबच्या संदर्भातील काही निर्णयांबद्दल मतदान करण्याचा अधिकार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या क्लबच्या नव्या गोल सेलिब्रेशन गाण्याची घोषणा करण्यात आली. हे नवे गोल साँग कसे निश्चित झाले तर फॅन टोकन्स असलेल्या चाहत्यांनी केलेल्या मतदानाच्या माध्यमातून. गेल्या लेखामध्ये मी जे म्हटले होते की वेब 3.0 मध्ये खूप बदल होणार आहेत. हे बदल म्हणजे नक्की काय याची ही केवळ चुणूक आहे.

वेब 1.0 स्टॅटिक होते. तिथे संवादात्मकता किंवा वेबसाईटचे डिझाईन यावर फार काम करणे शक्य नव्हते. वेब 2.0 डायनॅमिक आहे. आपण सध्या ज्या प्रमुख वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बघतो, ते सगळे वेब 2.0 चे रुप. आता येऊ घातलेले वेब 3.0 हे डिसेंट्रलाईज अर्थात विकेंद्रित असणार आहे. विकेंद्रितपणा हेच वेब 3.0 चे प्रमुख वैशिष्ठ्य. सध्या विविध देशांमध्ये सोशल मीडिया कंपन्यांविरोधात रोष निर्माण होऊ लागला आहे. सध्याचे प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे खासगी मालकीचे आहेत. आणि मोजक्याच लोकांच्या हातात या कंपन्यांच्या चाव्या आहेत. या खासगी कंपन्या त्यांना हवे तसे नियम तयार करतात. त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मसाठी आशय निर्मिती करणार्‍यांची गरज असली तर त्याबदल्यात आशय निर्मात्यांना सढळ हाताने उत्पन्नातील वाटा दिला जात नाही. आशयाचे वितरण कसे आणि कुठे करायचे हे सर्वस्वी याच कंपन्यांच्या हातात असल्यामुळे निर्मात्यांच्या प्रत्येक निर्मितीला समान संधी मिळेल, असेही नाही. या सगळ्याविरोधात हळूहळू का होईना जनमत तयार होऊ लागले आहे आणि वेब 3.0 मध्ये काही प्रमाणात याला उत्तर मिळेल, अशी आशा दिसू लागली आहे. कारण येथे मोजक्याच लोकांच्या हातात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या चाव्या नसतील.

- Advertisement -

वेब 3.0 मध्ये प्रामुख्याने कोणत्या एका कंपनीच्या हातात निर्णय घेण्याची संपूर्ण ताकद नसेल. कारण आधी म्हटल्याप्रमाणे विकेंद्रितपणा हेच याचे प्रमुख तत्त्व. क्रिप्टो आणि एनएफटी हे वेब 3.0 चे रुप आहे. त्याचबरोबर काही डी-अ‍ॅप्स अर्थात डिसेंट्रलाईज अ‍ॅप्स आता उपलब्ध झाली आहेत. या ठिकाणी आशय निर्मिती करणार्‍यांना उत्पन्नातील काही ठराविक वाटाच दिला जाईल, अशी पद्धत नाही. आशय निर्मिती करणार्‍यांना आपला वाटा किंवा आपल्याला किती पैसे मिळाले पाहिजेत, हे ठरविण्याचा अधिकार आहे. युजर्सला येथे थेटपणे एकमेकांशी व्यवहार करता येऊ शकतात.

क्रिप्टोबद्दल सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. देशातील लाखो तरुणांनी यामध्ये गुंतवणूकही केली आहे. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी क्रिप्टोवर निर्बंध आणले जाणार, असे म्हटले होते. पण याच महिन्यात जाहीर झालेल्या पुढील आर्थिक वर्षासाठीच्या बजेटमध्ये डिजिटल सेट अर्थात क्रिप्टोच्या खरेदी-विक्रीतून नफा कमाविल्यास 30 टक्के कर लावण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. क्रिप्टो एकदम बंद करता येणार नाही, हे सरकारच्या लक्षात आल्यामुळेच सरकारने कराची रक्कम वाढवून त्यामाध्यमातून तरुणांची यातील गुंतवणूक रोखण्याचा प्रयत्न केला. सरकार क्रिप्टोवर कुठवर निर्बंध लावणार असा प्रश्न मी गेल्याच लेखामध्ये उपस्थित केला होता. तूर्त तरी सरकारने मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

एनएफटी अर्थात नॉन फंजिबल टोकन्स हेसुद्धा वेब 3.0 चे आणखी एक रुप. फंजिबल म्हणजे इंटरचेंजेबल.  सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपण एखाद्याला 10 रुपयांची नोट दिली आणि त्याबदल्यात त्याने आपल्याला पाच रुपयांच्या दोन नोटा दिल्या तर तो व्यवहार पूर्ण होतो. नॉन फंजिबल टोकन्समध्ये आपल्याकडील टोकन्स जरी आपण त्रयस्थ व्यक्तीला विकली तरी त्यातून टोकन निर्मात्यांना किंवा आयोजकांना हिस्सा द्यावाच लागतो. त्या शिवाय तो व्यवहार पूर्णच होत नाही. हा हिस्सा किती टक्के असेल हे संपूर्णपणे टोकन निर्मातेच ठरवू शकतात. प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांचा मेटाव्हर्समधील पहिला कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमाचे आयोजक पार्टीनाईट डॉट मेटाव्हर्स यांनी त्यावेळी या कार्यक्रमात सहभागी होणार्‍यांसाठी एनएफटी उपलब्ध करून दिले होते. कार्यक्रमात सहभागी होणार्‍यांना हवा तसा अवतार घेता येऊ शकत होता आणि नवनव्या लोकांना आभासी जगात भेटताही येणार होते. वेब 3.0ची जी विविध आयुधे आहेत, त्याच्या वापरातून जे विश्व तयार होईल त्याला मेटाव्हर्स असे म्हटले जाते. येत्या काळात या मेटाव्हर्समध्ये अनेक उलाढाली होणार आहेत आणि त्याचा थेट परिणाम प्रत्यक्षातील घडामोडींवरही होणार आहे.

तंत्रज्ञानात दिवसेंदिवस होत असलेली प्रगती आणि येऊ घातलेले 5 जी यामुळे पुढील काळात वेब 3.0 आपले हातपाय वेगाने पसरायला लागेल. वेब 3.0 ने निर्माण केलेल्या आव्हानांमुळे सध्याच्या सोशल मीडिया कंपन्याही धास्तावल्या आहेत. गेल्याच महिन्यात ट्विटरने आपल्या ब्ल्यू युजर्ससाठी त्यांची एनएफटी हाच प्रोफाईल फोटो म्हणून वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. खरंतर असे करून ट्विटरने सायबर सिक्युरिटीसह अनेक प्रश्न उभे केले आहेत. युजर्सची गोपनीयताही काही प्रमाणात धोक्यात आणली आहे. तरीही कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला.

वेब 3.0 च्या नव्या अवकाशात आशय निर्मात्यांना अच्छे दिन येतील, अशी आशा करायला काहीच हरकत नाही. आपण आशय तयार करायचा आणि त्रयस्थ कंपनीने त्यातून भरमसाठ पैसा कमवायचा, असे निदान होणार नाही. आपला आशय आवडणार्‍यांची कम्युनिटी तयार करणे, कम्युनिटीने एक टप्पा गाठल्यावर आपण आपलेच टोकन तयार करणे त्या माध्यमातून आपल्या कम्युनिटी अंतर्गत व्यवहार करणे हे शक्य होणार आहे. शिवाय आपला आशय खरंच लोकांच्या मनाला भिडत असेल, तर आधी म्हटलेली डी-अ‍ॅप्सही आपल्या मदतीला धावून येऊ शकतात. त्यातूनही आपण अधिकाधिक युजर्सपर्यंत पोहोचू शकतो.

एकीकडे आशय निर्मितीला सुगीचे दिवस येण्याची चिन्हे असताना दुसरीकडे या सगळ्यातून पारंपरिक पत्रकारितेपुढे आणखी नवी आव्हानेही उभी राहणार आहेत. मुळात बातम्यांमधील वाचकांचा रस कमी कमी होत जातोय आणि सध्याची माध्यमे अधिकाधिक बातम्या देण्यावर सगळं लक्ष केंद्रित करताहेत. सोशल मीडियातील खासगी कंपन्या आशय निर्मात्यांसोबत दुजाभाव करत असल्याने त्यांच्याबद्दल रोष आहे. त्यामुळे क्रिएटर्स आता पर्यायाच्या शोधात आहेत. असे असताना माध्यमांकडून सोशल मीडियातील प्लॅटफॉर्म्सचा अतितीव्र वापर केला जातोय आणि तोही पुन्हा बातम्याच युजर्सपर्यंत घेऊन जाण्यासाठी. या सगळ्यात विरोधाभास असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळेच प्रस्थापित माध्यमांपुढे असलेली आव्हाने वेब 3.0 मध्ये आणखी वाढणार, हे निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -