नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर

well known marathi stage actor Bhalchandra Pendharkar
नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर

भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर हे मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार होते. त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1921 रोजी हैदराबादमध्ये झाला. भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. ते मेहनतीला कोठेही कमी पडत नसत. जेव्हा बालपणी त्यांनी निश्चय केला की आपल्याला गाणं शिकायचंय, त्यासाठी रात्रीचा दिवस केला. त्यांची आजी व आई त्यांना बापूराव पेंढारकरांच्या मृत्यूनंतर जेव्हा मुंबईला घेऊन आली, तेव्हा बापूरावांच्या चाहत्यांनी ‘पेंढारकर ट्रस्ट’ उभा केला.

अण्णांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी सांगितलं. त्यावेळी त्यांनी फक्त औपचारिक शिक्षण घेण्यास नकार दिला. त्यांना संगीताचं शिक्षण घ्यायचंच होतं. त्यांच्या आजी व आईनं त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. रोज सकाळी ५ ते ८ रियाज, मग पर्वतीवर व्यायाम, १० ते १२ शिकवणी, जेवण, पुन्हा संध्याकाळी ३ ते ८ शिकवणी. मग रात्री कुठेतरी गाण्याचा कार्यक्रम ऐकायला जायचं. असं पाच वर्षं सुरू होतं. ते दिवस खूप आर्थिक चणचणीचे होते. घरी आजी, आई आणि ३ लहान बहिणी. त्यातील दोन अपंग व अण्णा. एकच धोतर होतं त्यांच्याकडे. ते रात्री धुवायचं, पंचावर निजायचं अन् दुसर्‍या दिवशी पहाटे वझेबुवांकडे पळायचं. हेही दिवस सरले. रेडिओच्या कामानिमित्ताने बाबूराव देसाई यांची भेट झाली. त्यांना अण्णांची स्थिती समजली. देसाईंनी संपूर्ण कुटुंबासह अण्णांना मुंबईत आपल्या घरी राहायला बोलावलं. ‘ललितकलादर्श’चं पुनरुज्जीवन करायला लावलं आणि त्यासाठी संपूर्ण आधार दिला.

ललितकलादर्श या नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेचे प्रमुख या नात्याने त्यांनी अनेक संगीत नाटके रंगभूमीवर सादर केली. त्यात ‘संगीत सौभद्र’सारखी पूर्वी गाजलेली नाटके होतीच, शिवाय ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘बावनखणी’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘आनंदी गोपाळ’ या नव्या नाटकांचाही समावेश होता. अभिनयासोबतच दिग्दर्शन, नेपथ्य, छायाचित्रण, नाट्य निर्मिती अशा अनेक क्षेत्रांत पेंढारकर लीलया वावरले. गिरगावच्या साहित्य संघातील त्यांचा वावर अनेक कलावंतांना मार्गदर्शक ठरला.

पेंढारकर यांनी संगीत, गद्य अशा सुमारे ५१ नाटकांमध्ये भूमिका केली होती. त्यांनी ललितकलादर्श संस्थेमार्फत १४ नाटकांची निर्मिती केली. विजय तेंडुलकर लिखित ‘झाला अनंत हनुमंत’, भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवरील ‘रक्त नको मज प्रेम हवे’ हे सुरेश खरे लिखित नाटक तसेच डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरील ‘आनंदी-गोपाळ’ ही त्यातील काही प्रमुख नाटके होती. पेंढारकर यांच्यावर ग्वाल्हेर गायकीचे संस्कार झाले होते. ‘आई तुझी आठवण येते’, ‘जय जय गौरीशंकर’ नाटकातील ‘रमारमण श्रीरंग’ ही त्यांच्या संगीत नाटकातील पदे अतिशय लोकप्रिय झाली. १९५५ मध्ये प्रदर्शित ‘अमर भूपाळी’ चित्रपटात होनाजी यांची भूमिका पंडित नगरकर तर बाळा यांची भूमिका भालचंद्र पेंढारकर यांनी केली होती. अशा या नाट्यतपस्वीचे ११ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले.