घरक्रीडाभारताच्या बॅडमिंटनपटूंना झालंय तरी काय?

भारताच्या बॅडमिंटनपटूंना झालंय तरी काय?

Subscribe

दिनेश खन्ना, प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद यांसारख्या महान बॅडमिंटनपटूंचा वारसा लाभलेल्या भारताकडे सध्या सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, किदाम्बी श्रीकांत असे प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांनी मागील बरीच वर्षे भारतीयांना गर्व वाटेल अशी कामगिरी केली आहे. मात्र, या खेळाडूंची मागील काही काळात कामगिरी खालावताना दिसत आहे. गेल्या एका वर्षात सायनाला राष्ट्रकुल स्पर्धा वगळता केवळ एकच स्पर्धा जिंकण्यात यश आले आहे. याच कालावधित सिंधूलाही एक, तर श्रीकांतला एकही जेतेपदे पटकावता आलेले नाही. या तिघांव्यतिरिक्त इतर खेळाडूंना तर कोणत्याही स्पर्धेच्या एका ठरावीक टप्प्यावर पोहोचल्यानंतर जणू ब्रेकच लागतो. त्यामुळे आपल्या बॅडमिंटनपटूंना सध्या झालंय तरी काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

क्रिकेटवेड्या भारतामध्ये बॅडमिंटन हा दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. भारतीय बॅडमिंटनचा इतिहास कदाचित चीन किंवा जपान इतका प्रगल्भ नसेल, पण याचा अर्थ असा अजिबातच नाही की भारताकडे महान खेळाडू होऊन गेले नाहीत. दिनेश खन्ना हे आशियाई स्पर्धा जिंकणारे भारताचे पहिले बॅडमिंटनपटू होते. त्यानंतर प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद यांनी मानाच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. प्रकाश पदुकोण हे अजूनही भारताचे सर्वोत्तम पुरुष बॅडमिंटनपटू म्हणून ओळखले जातात, तर गोपीचंद यांनी २००१ मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर भारताच्या एकाही खेळाडूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. यावरून त्यांची कामगिरी किती खास होती हे कळते. भारताला ठरावीक काळाने का होईना, पण चांगले पुरुष बॅडमिंटनपटू मिळत होते. मात्र, महिला, खासकरून एकेरीमध्ये खेळणार्‍या महिला खेळाडू भारताला काही केल्या मिळत नव्हत्या, परंतु हे चित्र बदलले सायना नेहवालने. याच काळात दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टासारखी खेळाडूही पुढे येत होती.

- Advertisement -

सायनाने भारतीय बॅडमिंटनचे चित्रच पालटून टाकले. तिने २००८ ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची विक्रमी कामगिरी केली होती. ती अशी कामगिरी पहिली भारतीय महिला खेळाडू होती. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिलेले नाही. सायनाने पुढच्याच वर्षी पहिली डब्लूबीएफ स्पर्धा जिंकली. तिने २०१० आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य, २०१० राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, २०१२ ऑलिम्पिकमध्ये कांस्य, २०१४ एशियाडमध्ये कांस्य अशी अप्रतिम कामगिरी आहे. मात्र, २०१८ च्या सुरुवातीपासून तिला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

या एक-दीड वर्षात तिला दुखापतीने सतावले आहे, तर या काळात तिला केवळ एकच स्पर्धा जिंकता आली आहे आणि तिही जेव्हा प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरीनने दुखापतीमुळे अंतिम फेरीत माघार घेतली तेव्हा! तसेच आघाडीच्या खेळाडूंविरुद्धची तिची कामगिरीही काही खास नाही. सध्या नंबर १ ची खेळाडू असणार्‍या ताई झू यिंगविरुद्ध तिने २० सामन्यांपैकी १५ सामने गमावले आहेत. तसेच सायनाला जपानच्या अकाने यामागूचीविरुद्ध १० पैकी २, तर मरीनविरुद्ध १२ पैकी ६ सामनेच जिंकता आले आहेत. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या नोझोमी ओकुहाराविरुद्धची कामगिरी चांगली होती. तिने सुरुवातीला ७ पैकी ६ सामने जिंकले होते. मात्र, त्यानंतर ओकुहाराने वरचष्मा मिळवत मागील ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे सायना सध्या आघाडीच्या खेळाडूंविरुद्ध अडचणीत येताना दिसत आहे.

- Advertisement -

महिलांमधील दुसरी आघाडीची खेळाडू पी.व्ही.सिंधूने २०१४ मध्ये जागतिक चॅम्पियनशिप, एशियाड, राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते. मात्र, ती खर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आली ती म्हणजे २०१६ ऑलिम्पिकमधील आपल्या अफलातून कामगिरीमुळे. तिने या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. मागील वर्षाच्या सुरुवातीपासून सिंधूने बर्‍याच स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आहे, पण तिला केवळ एकच स्पर्धा जिंकण्यात यश आले आहे. पुरुषांचा आघाडीचा खेळाडू किदाम्बी श्रीकांतने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. मात्र, त्याआधी आणि त्यानंतर त्याला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

आता पुढील वर्षी ऑलिम्पिक होणार असल्याने या खेळाडूंच्या फॉर्मविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. भारताचे प्रमुख प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यामते या खेळाडूंना सरावासाठी आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे सर्व खेळाडूंचे लक्ष्य आहे. त्यामुळे ते जितके गुण मिळवू शकतील, तितके गुण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, चीन-जपानच्या खेळाडूंचीही हीच परिस्थिती असणार, पण ते सरावासाठी वेळ मिळत नसल्याची कारणे देताना दिसत नाहीत.

एकूणच विश्रांतीसाठी आणि सरावासाठी वेळ न मिळणे ही गोष्ट खरी असली, तरी त्यातून मार्ग काढणे हे महत्त्वाचे आहे. जेणेकरून या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात बाधा येणार नाहीत. अन्यथा या खेळाडूंसोबतच भारताच्या बॅडमिंटन चाहत्यांच्या पदरातही निराशा पडेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -