घरफिचर्सही कुठली ‘मर्दानगी’?

ही कुठली ‘मर्दानगी’?

Subscribe

क्रिकेटर्सच्या कामगिरीवर ताशेरे ओढत अकलेचे तारे तोडणारे अनेकजण आजवर पाहिले, मात्र खेळातील सुमार कामगिरीबद्दल त्यांच्या कुटुंबियांविषयी आणि खासकरून कुटुंबातल्या एखाद्या चिमुकलीबद्दल बलात्कारासारखी घाणेरडी वाच्यता करणारे नराधम आता समाजमाध्यमांत डोके वर काढत आहेत. मुख्य म्हणजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कुठल्या व्याख्येत एखाद्या स्त्री वा मुलीला बलात्काराची धमकी देणे ही बाब बसते, हा प्रश्न आहे.

महेंद्रसिंग धोनीसारख्या जगविख्यात खेळाडू अन् भारतीय लष्करातील मेजरबद्दल त्याच्या पडत्या काळात अनेकांनी कुठल्या न कुठल्या कारणाने बरळ ओकली. मात्र, आता त्याच्या पाचवर्षीय मुलीला बलात्काराची धमकी देणार्‍या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यापर्यंत धारिष्ठ्य वाढतेय, ही बाब निश्चितच खेळाडूच नव्हे तर खेळ आणि देशासाठीही धोक्याची घंटा ठरेल. मुळात एखाद्या गोष्टीविषयी रोष व्यक्त करण्यासाठी स्त्रिला डोळ्यासमोर ठेवून ‘मर्दानगी’ दाखवण्याची ही कुठली पद्धत, असाही मुद्दा झिवा धोनी प्रकरणावरून उपस्थित होतोय. कच्छ (गुजरात)मधून या चिमुकलीविषयी घाणेरड्या पोस्ट व्हायरल करणार्‍यास अटक झाली खरी, परंतु पुरुषप्रधान संस्कृतीत या किळसवाण्या गोष्टी आणखी किती दिवस सहन करायच्या, हाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.

सोशल मीडिया हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरते, ही बाब आजवर अनेकदा अनुभवली गेली. मात्र, तितक्याच वेळा या माध्यमांचा चुकीचा वापर झाल्याचीही उदाहरणं आहेत. आजवर अनेकांनी धमक्या, बदनामी, ब्लॅकमेलिंगसारख्या दुष्कृत्यांसाठी सोशल मीडियाचा वापर केल्याचे ऐकिवात आहे, अशा विकृतांच्या मुसक्या पोलिसांनी अनेकदा आवळल्याही. मात्र मानसिकताच विकृत असली तर खाकीचा दंडुकाही कितपत शासक ठरेल, हा प्रश्न आहे.
‘क्रिकेटचा उत्सव’ म्हणून जगभरात ओळखली जाणारी इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धा क्रिकेटरसिकांसाठी उत्तम मेजवानी ठरतेय. जगभरातले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊन क्रिकेटचा आनंद लुटतात. भारतीय खेळाडूही मोठ्या संख्येने आयपीएलचा आस्वाद घेतात. परंतु, प्रांतवाद आणि वर्चस्ववाद आपल्या देशात नवखा नाही, याचा प्रत्यय खेळांमध्येही दिसून येतोय, हे दुर्दैव. त्याला आयपीएलदेखील अपवाद नाही. जेमतेम महिना, दीड महिना चालणार्‍या या स्पर्धेसाठी अनेक चाहते आपापसांत वैर घेत असल्याचे गेल्या तेरा वर्षांपासून दिसून येते. यामुळे पारतंत्र्यातून मुक्त होऊनही आपली मानसिकता मात्र कायम असल्याचे दिसते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, आयपीएल या स्पर्धेविषयी कितपत गांभीर्याने घ्यावे हा संशोधनाचा विषय असतानादेखील प्रेक्षक विकृततेकडे का वळताहेत, हे समजण्यापलिकडे आहे.

- Advertisement -

M.S. Dhoni

क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये भारताला विजेतेपदाचा किताब पटकावून देणार्‍या आणि सर्वात यशस्वी यष्टीरक्षक ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीला आयपीएलच्या या तेराव्या सत्रात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याचा संघ काही चुकांमुळे गुणतालिकेत तळाशी आहे. यापूर्वी तीनवेळा विजेतेपदाला गवसणी घालणार्‍या धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स संघाला आज सुमार कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या टिकेचे धनी व्हावे लागते आहे. यावरून त्याच्यासह चेन्नई संघाच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केलाय. मात्र, अनिश्चिततेचा खेळ म्हणून परिचित असलेल्या क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे किती गरजेचं बनलं आहे, हे आता झिवा धोनीच्या प्रकरणावरून दिसून येतय. आजपर्यंत विश्वचषक असो किंवा अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो.. त्यात आपल्या देशाचा संघ हारला की कर्णधार, प्रशिक्षक अथवा विशिष्ट खेळाडूंचे पुतळे जाळणे, त्यांच्या घरांवर चालून जाणे, जाळपोळ करणे हे प्रकार प्रत्येक देशांत घडले. मात्र, एखाद्या खेळाडूच्या कामगिरीबद्दल त्याला दोषी ठरवत त्याच्या मुलीला बलात्काराची धमकी देणे आणि एवढ्यावरच न थांबता संबंधित चिमुकलीची सोशल मीडियावर वाभाडे काढणे हा प्रकार भारतात तरी अशोभणीय असाच आहे. गुजरातच्या कच्छमधील एका 16 वर्षीय तरुणाने धोनीला खराब कामगिरीचा धनी ठरवत चक्क त्याच्या पाच वर्षीय मुलीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या. यात त्याने या चिमुरडीवर बलात्कार करण्याची धमकी दिल्याने नेटिझन्समध्ये हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला. मूळात ही बाब भारतीय संस्कृतीला कदापिही न शोभणारी असल्याने तिला कडाडून विरोधही झाला आणि विधेयक वापरकर्त्यांकडून धोनीसह क्रिकेटला समर्थन करणार्‍या शेकडो पोस्ट झपाट्याने शेअर झाल्या. या नराधमाला कच्छमध्ये अटकही करण्यात आली, मात्र या निमित्ताने विकृत मानसिकतेचे दर्शन पुन्हा एकदा समाज माध्यमांत घडल्याने समाज माध्यमे शाप की वरदान हा प्रश्न उपस्थित केला गेला.

- Advertisement -

आजघडीला सोशल मीडियावर कुठलीही सामाजिक जाण नसलेल्या लोकांचा वाढता वावर धोकादायक ठरतोय. त्यातून असे प्रकार घडत आहेत, यात शंका नाही. हातात इंटरनेट आलं, पण वापरायचं कसं आणि कोणत्या कारणांसाठी याविषयी अनेकजण आजही अज्ञानी आहेत. १२ वी इयत्तेतला मुलगा पाचवर्षीय मुलीविषयी असं काहीतरी बरळतो आणि मुख्य म्हणजे, तो तिला डोळ्यासमोर ठेऊन नाही तर धोनीला डोळ्यासमोर ठेवून बरळतो. तेही समाजमाध्यमांमध्ये… बदला घेण्याचं किंवा राग व्यक्त करण्याचं साधन मात्र स्त्रीच का, पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांच शोषण अजून किती दिवस, सोशल मीडियावर एखाद्या स्त्रीविषयी बरळण्याचं स्वातंत्र म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य का, असे एक ना अनेक प्रश्न या एका घटनेमुळे उजेडात येत आहेत.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -