घरफिचर्सफुटलेला ढोल आणि फुगलेला बैल

फुटलेला ढोल आणि फुगलेला बैल

Subscribe

जनता कोणत्या अपेक्षा ठेवून सरकार निवडत असेल? चांगल्या मूलभूत सुविधा, स्वच्छ शहरे, प्रगती पथावरील अर्थव्यवस्था, किमान शहरातील लोकांची तरी हीच अपेक्षा आहे. देशात अजूनही प्रदूषण, जातीयवाद, भ्रष्टाचार, लोकसंख्या, प्रादेशिकरण घट्ट आहेत. त्यात विकासाचा फाटका ढोल बडवत ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत हिंदुत्वाच्या मुद्यावर बुड आपटत भाजपाचं सरकार आणलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन महाराष्ट्र पोखरणारी ही पिलावळ सत्तेत आली. मोदी नावाच्या भक्तांच्या अवताराने बैल इतका फुगू शकतो यासाठी ना-ना तर्‍हेचे प्रयोग केले. बेडूक ते बैल यादरम्यानच्या प्रवासात काही भक्तही प्रसूत पावले. ही या सरकारची जमेची बाजू.

मेक इन इंडियाच्या अंगावरील खपल्या निघाल्या. स्मार्ट सिटी एका शिट्टीत भात शिजायची वाट पाहतेय. नवीन रोजगार निर्मितीमध्ये मोठ्या अडचणी येताहेत. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचा अभाव आहे. मोदी म्हणाले होते की,बोलणं कमी आणि काम जास्त. पण, इथं नेमकं उलट होतंय, सत्तेत येण्याअगोदर ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिनविण्यात आले, आम्ही सत्तेत आल्यावर यांची कशी जिरवतो म्हणणारे, भाजपच्या सुलभ शौचालयासमोर मला अगोदर पोट साफ करायला कसं मिळतंय यासाठी रांगेत उभे आहेत. गंमत म्हणजे यातीलच एका भ्रष्ट व्यक्तीबद्दल मोदी म्हणतात की, ते माझे राजकीय गुरू आहेत आणि त्यांचेच बोट पकडून मी राजकारणात आलो आहे. तसंही मोदींना खेळणं म्हणून कोणालाही वापरायची सवय आहे. नोटबंदी यशस्वी झाली की फसली, हेच अजून आम्हाला कळलं नाही आणि पाच वर्ष होत आली तरी सरकार हे सांगू शकत नाही, यातच सगळं आलं. यांच्या भक्तांची आकडेवारी ही मटक्याच्या धंद्यापेक्षा वेगळी नसते. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाचा दर खालीलप्रमाणे होता.

- Advertisement -

मे 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात 100 तर मुंबई-80 रुपये
मे 2015 मध्ये 55 तर मुंबई-72 रुपये
मे 2016 मध्ये 40 तर मुंबई-70 रुपये
मे 2017 मध्ये 50 तर मुंबई-75 रुपये
फेब्रुवारी 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात 60 तर मुंबई-80 रुपये

मोदींना जरी मनातून मानले तरीही हे समीकरण मला तरी न सुटण्यासारखं आहे. जो भाजपा पीडीपी पार्टीला नेहमी शंकेने आणि देशविघातक शक्तींना मदत करणारा या नजरेने पाहतो. मग अशा पार्टीसोबत गळ्यात गळे कसे घालू शकतात? म्हणजे सत्तेसाठी उंबरठे चाटायचे? जर आता काश्मीरमध्ये काही घडले तरी तोंडाचे छेद दाबून बसावे लागेल. असच काहीसं चित्र महाराष्ट्रात आहे. हिंदुत्व म्हणजे काय? वंदे मातरम आणि भारत माता की जय म्हणत गोमूत्र प्यायचं ही हिंदुत्वाची ओळख कधी आणि कोणी बनवली? एकीकडे निवृत्त जज मोर-लांडोरांच्या प्रणयक्रीडेवर संशोधन काय करताहेत, कोणी महाभारतात जाऊन इंटरनेटचं कनेक्शन काय करतोय. दहा-दहा अपत्यांना जन्म द्या, मी सांभाळेल, म्हणत कोणी साध्वी पाळणाघर काय काढताहेत..देशाचा राजकीय वेश्याबाजार केलाय…यात जनता खाली, सत्ताधारी वर आणि भक्त दलाल झालेत. हिंदुत्वाच्या नावावर दलितांना, मुस्लिमांना सर्रास टार्गेट केलं जातंय, गोहत्या बंदी कायदा करून सर्व जोर लावून आम्ही गायीला न्याय दिला असा बैलशोध सरकारने लावू नये. तंबाखूमुळे वर्षाला 8 लाख लोकं मरतात.

- Advertisement -

जिथं सरकार याविषयी कायदा करून बंद करू शकत नाही. तिथंच सरकारचा नाकर्तेपणा उघडा होतो. गोहत्या कायदा मानला तरी हे गोरक्षक काय प्रकार आहे? गोहत्या झाली तर त्यावर न्यायालयीन खटला चालवा. पण, या गाईच्या लालना कोणी अधिकार दिला मारहाण करण्याचा? बरं, गोहत्या नाही करायची मग भाकड, दूध न देणार्‍या गायीचे काय करायचे? गावात भटकी जनावरं खूप आहेत हे शहरात 56 इंचाची छाती ठेवून नाही कळणार. भाकड गाय कसायाला विकून जर गावकर्‍याला पैसे मिळत असतील तर त्यात गैर काय? किंवा सरकारने अशा गायी विकत घेऊन योग्य तो मोबदला द्यावा. उद्या गोहत्या सोबत म्हैस हत्येवरही कायदा होईल..नाही झाला तर गोंधळ उडेल.

चौकीदारांनी स्वतःला दहा लाखांचा सूट शिवला आणि शेतकर्‍यांसमोर एक आदर्श ठेवून त्यांना स्वाभिमान काय असतो हे दाखवून दिलं. नेपाळला 10,000 कोटी, भूतानला 4,500 कोटी आणि कुपोषित अदानीला 70 मिलियन डॉलर देऊन. शेतकर्‍यांसाठी माझ्याकडे न जन्मलेल्या विकासाशिवाय काहीच नाही. असं भासवून कर्जाचा डोंगर दाखविल्याबद्दल आणि आमचं पोट पाठीला कसं चिकटवायचं याचं कसब शिकविल्याबद्दल तुमचे आभार. देवाच्या बाजूला त्याचे रक्षक उभे असतात म्हणे. 3000 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर कदाचित मंत्राने जन्माला घातलेले तुमचे रक्षक, शेतकर्‍यांनो सरकारवर अवलंबून राहू नका (गडकरी) शेतकरी मरताहेत तर मरू द्या (संजय धोत्रे),आता कोणी झाडावर लटकून मेलं तर सरकार काय करणार(गुलाब कटारिया) शेतकर्‍यांनो माझ्यासमोर तुमची लायकी काय आहे(संजीव वालीयान) यांनी उधळलेली स्तुती-सुमने ऐकून डोळे पाणावले आणि तुमच्या मंत्र्यांनी 3 कोटी रुपये बारमध्ये उडवले, यामुळे भारतमातेची मानही उंचावली.

कॅग अहवालानुसार गुजरात 2013-14 मध्ये अ‍ॅग्रीकल्चरचा जीडीपी नकारात्मक झाला, 54% शाळांमध्ये शिक्षक नाहीत,87%तालुक्यात रक्तपेढी नाही. कुपोषणाचे प्रमाण वाढले,1000 मुलं बेपत्ता आहेत. दिवसाला 2 बलात्कार आणि 15 आत्महत्या होताहेत. गुजरातमधल्या नदीला स्वच्छ करू शकले नाहीत आणि इथं स्वच्छ भारत अभियानाने आपल्या अस्वच्छ कारभाराचे गोडवे गाताहेत.

पैशा-पैशाने पेट्रोलचे दर कमी झाले तर हे मोदींमुळे झाले आणि जर ते रुपयाने वाढले तर जागतिक बाजाराकडे बोट दाखवून. ‘आदा मादा कोण पादा’ म्हणत ‘कान गरम आहे का’ तपासणारे भक्तगणही कमी नाहीत. हे तेच भक्त आहेत जे बोटावर घाण घेऊन चाटतील. पण, त्याच घाणीवर पाय पडला की अरेरेरे..म्हणत गोमूत्र पितील. पाकिस्तानाचं मुंडकं उडवून त्यांना उत्तर देऊ म्हणणारेच दोन्ही हाताने बिर्याणी कोंबून, मीडियावाल्यांनो मी हिरवा पोशाख घातलाय बरं का? असं लक्ष वेधून आकाशाच्या दिशेने पार्श्वभाग करून जेव्हा त्यांच्याच शयनकक्षात ताणून देतात, तेव्हा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि वर इलेक्ट्रॉनिक मीडियाही व्हय मालक,आताच तैमुरचं अंतर्वस्त्र धुतलं, आता तुम्ही परदेशात गाडलेले झेंडे फडकवतो. तेवढं लक्ष असुद्या मालक म्हणत आपल्या उदात्त पत्रकारितेचे दर्शन देतात. 100 दिवसात काळा पैसा आणू म्हणणार्‍यांचा उघडा पडलेला पार्श्वभाग पाहून मोरही पिसारा फुलवायला लाजताहेत. अठराविश्व दारिद्य्र असलेल्या अदानीला 350 एकर जमीन देऊन वर 70 मिलियन कर्ज बोनस म्हणून देऊन उज्वल भारताच्या सरणाचा पाया रचलात. संपूर्ण जगभरात गांधींच्या अहिंसावादाचे गोडवे गाऊन इथं मात्र नथुचे मंदिर उभे करण्याची तयारी केली. त्याबद्दल दुतोंडी सापही लवकरच तुमच्याकडे ट्युशन लावणार आहे. ‘शिव छत्रपती का आशीर्वाद’, ‘चलो चले मोदी के साथ’ म्हणत तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांचा खेळ मांडला आहे.

गोमूत्रात सोनं असतं, गोमूत्राने कॅन्सर बरा होतो. ‘गाय ऑक्सिजन देते. म्हशीचे दूध प्यायल्याने मुले गुन्हेगार होतात’, असे हास्यकल्लोळ शोध लावल्याने ‘भारत माता की जय’ म्हणत छाती अभिमानाने फुलते, स्त्रियांनी साडी-टिकलीच लावा म्हणजे बलात्कार होणार नाहीत, म्हणजे आता 3-5 वर्षांच्या मुलींनाही साडी आणि टिकली लावून बाहेर पाठवायचे? मग आसाराम, नित्यानंद सारख्या भोंदूंची नसबंदी करण्यापेक्षा त्यांचा उदो-उदो करीत बलात्कार या देशाच्या संस्कृतीचा भाग आहे. म्हणणार्‍यांना साक्षात दंडवत करावासा वाटतो.

सरकारचा नोटबंदीचा निर्णयही पूर्णतः फसला आहे. 99% करन्सी बँकेत आली, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घोषित केले. मग काळा पैसा गेला कुठे? उलट तीन ते चार दिवसातच मार्केटमध्ये 2 हजारच्या नकली नोटा आल्या. नोटबंदीने अतिरेक्यांचे कंबरडे मोडेल. अशा बाता मारल्या होत्या. पण, प्रत्यक्षात मात्र 8 नोव्हेंबरला नोटबंदी झाली. पण, 19 नोव्हेंबरला आसाम, 22 ला काश्मीर आणि 29 ला नागरोटात अतिरेकी हमले होऊन भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले. नोटबंदीनंतर पहिल्या 50 दिवसात 1.28 लाख कोटी नुकसान अर्थव्यवस्थेला सोसावे लागले. चार महिन्यात 15 लाख जॉब गेले. 2.2% ने सर्व ग्रोथ घटली. त्यात नवीन नोटा छापण्याचा खर्च 21 हजार कोटी इतका आला. 150 लोकांना रांगेत, हॉस्पिटलमध्ये करन्सी चालत नाहीत म्हणून जीव गमवावा लागला. निदान आपला निर्णय चुकला म्हणून ‘प्रधानमंत्री’नी देशाचा जबाबदार नागरिक म्हणून माफी मागायला हवी होती. लोकांनी माफ केलेही असते. पण, यांच्यात ती दानत नाही.

-अरविंद वाघमारे (लेखक —-आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -