घरफिचर्सनिरंजनना काय कमी पडले?

निरंजनना काय कमी पडले?

Subscribe

-प्रवीण पुरो

महाराष्ट्र विधानपरिषदेचे अनेक वर्षं उपसभापतीपद भूषवलेले दिवंगत वसंत डावखरे यांचे पुत्र आणि विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य तसेच प्रदेश युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्तेच्या प्रवाहात भाजपमध्ये प्रवेश घेतला. एका ज्येष्ठ नेत्याच्या मुलाने अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. नेत्यांच्या मुलांना हवी ती पदे द्यायची आणि गरज सरली की त्यांनी पक्षालाच लाथ मारावी, अशा एक नव्हे अनेक घटना याआधी महाराष्ट्रात घडल्या आहेत. तरी पक्ष चालवणारे नेते शहाणे होण्याचं नाव घेत नाहीत. ते शहाणे होणार नाहीत कारण असे अनेक निरंजन त्यांच्याही घरात पदाची अभिलाषा ठेवून आहेत. तेव्हा निरंजनने जे आज केलं ते इतरांची मुलं करणार नाहीत, असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.
कार्यकर्त्यांवर अन्याय आणि अत्याचार
खरं तर डावखरेच काय पण इतरांच्या मुलांची पत नसताना त्यांना हवी हवी पदं देऊन सगळ्याच पक्षांनी आपल्या सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय आणि अत्याचार केलाय. पक्षासाठी काम करेल, काम करून पक्षात स्वत:ची छबी निर्माण करेल, अशांनाच खरं तर पद दिलं पाहिजे. पण तसं होत नाही. नेत्याच्या पुत्राला पद दिलं की पक्ष सुरक्षित असा समज आहे. तो या पुत्रांच्या हव्यासाने मातीमोल केला. यामुळेच निरंजनसारखे नेते मिळेल त्या वाटा चोखाळू लागले. क्रायटेरियात उतरणाऱ्या कार्यकर्त्यालाच पद असा नियम लागू झाला तर किती नेत्यांच्या मुलांना पदं मिळतील, हे कोणीही सांगू शकत नाही. आज या नियमाला सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी गुंडाळून ठेवलंय. यामुळे मोठी पदं मिळालेली पोरं धरसोड वृत्तीने पद सोडतात आणि पक्षाला पोरकं करतात.

कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या
निरंजन डावखरे यांचं महत्व हे केवळ आणि केवळ वसंत डावखरे यांचे पुत्र या एकाच कारणासाठी आहे. निरंजन यांच्याशिवाय पक्षात असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या. वेळप्रसंगी पोलीस कारवाया झेलल्या. पण त्यांच्या वाट्याला आमदारकी आणि प्रदेशाध्यक्षाचा मान कधी आला नाही. निरंजन वसंत डावखरेंचे पुत्र नसते तर ते कुठे असते? याचा विचार स्वत: निरंजन यांनी कधी केला नसेल. कोरी पाटी असताना विधानपरिषदेच्या सभागृहात पक्षाने त्यांना पाठवलं. तेव्हा पक्षाने विचार केला केवळ वसंत डावखरेंचा. निरंजन यांच्यामागे इतर कोणत्याही कामाची पार्श्वभूमी नाही की आमदार झाल्यापासून पक्षाची भरभराट झाली असाही प्रकार नाही. प्रदेशची जबाबदारी दिली म्हणून महाराष्ट्रात आणि ठाण्यात पक्ष भरभराटीला गेला असंही काही झालं नाही. उलट सत्तेत नसताना निरंजन सत्ताधाऱ्यांच्याच दारात असायचे असा आक्षेप जिल्ह्यातले नेते घ्यायचे. एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करताना दोन्ही गटांनी पक्षाचं नुकसान होतं याकडे लक्ष दिलं नाही. तक्रारी करणाऱ्यांविरोधात माध्यमांपर्यंत माहिती देण्याचा मार्ग दोन्हीकडून अनुसरण्यात आला. तरी नेत्यांनी त्यांना रोखलं नाही. आता पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यावर ऊर बडवण्याचा अधिकार त्या पक्षाच्या नेत्यांना नाही.

- Advertisement -

लोकशाहीच रस्त्यावर
अशा प्रकारे पक्ष सोडणारे निरंजन डावखरे हे एकटेच नेतेपुत्र नाहीत. यापूर्वी सत्तेच्या बाजारात आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी म्हणजेच सत्ताधाऱ्यांपासून होणाऱ्या कारवाया टाळण्यासाठी अनेकांनी आपल्या मूळ पक्षाला रामराम ठोकलेलाच आहे. पक्ष सोडताना ज्या पक्षाने आपल्याला पद देऊन मोठं केलं त्याची जराही किंमत नेते आणि त्यांची मुलं ठेवत नाहीत. उलट आज एक मिळालं उद्या आणखी मिळण्यात काही कमी पडलं की पक्षाला सोडचिठ्ठी द्यायची आणि सत्तेचा मार्ग अनुसरायचा, असली कूटनीती वापरून नेत्यांच्या पुत्रांनी लोकशाहीलाच रस्त्यावर आणलंय. पक्ष सोडताना निरंजन यांनी स्थानिक राजकारणात नसलेल्या महत्वाकडे बोट दाखवलं. प्रस्थापित नेते अन्याय करत असल्याचं निरंजन यांना आताच कसं कळलं. यापूर्वी त्यांच्या वडिलांनी अनेक निवडणुका लढल्या आणि जिगर ठेवून त्या जिंकल्याही. यासाठी त्यांनी वेळप्रसंगी विरोधकांनाही पटवलं. आवश्यक असलेली निवडणूक रणनिती त्यांनी आखली आणि ते पक्षात पहिल्या स्तरातील नेते बनले. इतकं करूनही पक्षात त्यांचा आवाज होता. विरोधकांशी जवळकी राखलेले डावखरे हे राष्ट्रवादीचे एकमेव नेते होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा डावखरेंच्या पुत्राला हे जमू शकलं नाही, याचं आश्चर्य आहे.

नेतापुत्राने दलबदलाचा पायंडा पाडला
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीची उमेदवारी आपल्यालाच मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा असली तरी तसा काही नियम राजकारणात नाही. राज्य विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुकीत पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, याची कुणकुण निरंजन यांना लागली असावी. विरोधकांची ताकद वाढावी, यासाठी सुरू केल्याचा भाग म्हणून शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची खेळी राष्ट्रवादीत खेळली जात होती. यामुळे पक्षाला उमेदवारी मिळणार नाही, हे उघड गणित होतं. अशावेळी पक्ष सोडून जाणं हे कशाचं द्योतक? सत्ताधारी पक्षातून उमेदवारी मिळवण्यात निरंजन यांनी अधिक स्वारस्य दाखवलं. या स्वारस्यातून त्यांनी भाजपत प्रवेश घेतला असल्यास नवल नाही. जाणत्या, सुशिक्षित आणि नेतापुत्राने दलबदलाचा असा पायंडा पाडला तर सामान्य कार्यकर्त्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा? केंद्रात सत्ता प्राप्त झाल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पदं भूषवणाऱ्या जवळपास ३३ नेत्यांनी सत्ताधारी भाजपत प्रवेश घेतला. या नेत्यांची भाजपत आज काय स्थिती आहे, हे लक्षात घेतलं असतं तर निरंजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेताना अनेकदा विचार केला असता, हेच खरंय…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -