घरफिचर्सअफवांचे शेत पिकते तेव्हा!

अफवांचे शेत पिकते तेव्हा!

Subscribe

सद्यस्थितीत तर अफवांचा महापूर आलेला दिसतो आहे. अफवा प्रसारित करता येईल, अशी वेगवान माध्यमे उपलब्ध आहेत. अफवा एखाद्या संसर्गजन्य आजारासारख्या असतात. अफवा एखाद्या अणुबॉम्बपेक्षा अधिक घातक आणि प्रभावी ठरतात.

महाराष्ट्रातलं औरंगाबाद असो की बिहार, उत्तर प्रदेश… ‘मुलांना पळवणारी टोळी आली’ अशी अफवा प्रसारित करून बहुरूप्यांना झालेली मारहाण, घेतलेला बळी, गोमांसाची अफवा प्रसारित करून घेतले गेलेले दलित-अल्पसंख्याकांचे बळी, मुलीची छेड काढल्याच्या अफवेवरून झालेली दंगल… आज अफवा सतत बातम्यांचा विषय बनताना दिसतात. त्यानिमित्ताने हा अफवांचा मानसशास्त्रीय मागोवा…

अफवा आपले इप्सित साध्य करतात

सद्यस्थितीत विविध लोकसमूह अस्वस्थ आणि असुरक्षित आहेत. लोकांच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना ही गोष्ट अफवा वेगाने प्रसारित होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार करते. सेपीयन मनुष्य हा टोळीजीवन जगत असल्याने त्याची टोळी, टोळीची अस्मिता, अस्तित्व आणि टोळीचे संरक्षण या मानसिकतेत होता. आधुनिक काळातही या टोळी संस्कृतीचे काही नकोशे अवशेष उरलेले दिसतात. विविध लोकसमूह आपल्या स्वार्थासाठी अचूकतेने अफवांची पेरणी करून समाजस्वास्थ्य बिघडवताना दिसतात. ही टोळी मानसिकता आदिम आहे.
आपल्या अवतीभवती नित्यनेमाने प्रचंड वेगाने असंख्य घटना घडत असतात. व्यक्तिगत, कौटुंबिक, सार्वजनिक, राजकीय, धार्मिक अशा विविध घटनांबद्दल प्रचंड कुतूहल माणसाच्या मनात असते. आपल्या आजुबाजूला काय घडतंय हे जाणून घेण्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नाही. आजुबाजूला काही घडले नाही तरीही तो प्रचंड अस्वस्थ होऊन जातो हे वर्तमानकालीन वेगवान जीवनशैलीचे फलित आहे. घटनांची आपल्याला एवढी सवय झालीय की घडलेल्या घटनेमागील सत्यासत्य न तपासताच तो क्षणार्धात त्या अफवेला बळी पडलेला असतो. नेमकी हीच मानवी मानसिकता लक्षात घेऊन अफवा प्रसृत केल्या जातात. या अफवा मनात संभ्रम निर्माण करून व्यक्तीच्या, समूहांच्या सद्सद्विवेक बुद्धीला मारुन आपले इप्सित साध्य करतात.

- Advertisement -

अफवा प्रसारित करण्याचा हेतू

अफवा प्रसारित करण्याचा हेतू हा कायमच नकारात्मक आणि विध्वंसक-हिंसक राहिला आहे. ऐकलेल्या-पाहिलेल्या प्रत्येक गोष्टींची शहानिशा व्यक्ती किंवा समूह करत नाही. किंबहुना गुलामगिरीची मानसिकता असलेला माणूस/ समाज आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला गहाण ठेवून अफवांना सातत्याने बळी पडताना दिसतो आहे. कुठल्याही गोष्टीला तात्काळ प्रतिक्रिया देण्याच्या मानसिकतेमुळे आलेल्या अफवांना वेगाने प्रतिक्रिया मिळून विध्वंस आणि हिंसा सुरू होतात. मुळातच अफवा या व्यक्ती आणि समाजस्वास्थ्य बिघडवण्याच्या हेतूने निर्माण केल्या जातात. ‘नरो वा कुंजरोवा’ ही युद्धकाळात युधिष्ठीराने पसरवलेली अफवाच होती. ‘ध चा मा’ करून केलेली हिंसा हा अफवांच्या शाब्दिक संभ्रमाचाच प्रकार. अतिशय चलाखीने शाब्दिक संभ्रम निर्माण करून सत्याला बेमालूमपणे सत्य भासवत जे काही वर्णन जन्माला येते ते म्हणजे अफवा. अफवा प्रसारित करण्याची घाई, उत्सुकता विध्वंस आणि हिंसेला कारणीभूत ठरतात. ‘आपल्याला जे माहीत आहे ते जगाला सांगावे’ हा मानवी स्वभाव पण काय सांगावे? कधी केव्हा कसे सांगावे याचा तारतम्य भाव असलाच पाहिजे. समाज माहितीचे विश्लेषण न करता चटकन विश्वास ठेवतो. त्यामुळे मूळ अफवा आणखीनच विकृत होऊन हिंसाचार वाढतो.

अणुबॉम्बपेक्षा घातक आणि प्रभावी

सद्यस्थितीत तर अफवांचा महापूर आलेला दिसतो आहे. कारण अफवा प्रसारित करता येईल, अशी वेगवान माध्यमे उपलब्ध आहेत. महिला, लहान मुलं, वंचित घटकांचा अतिशय विकृत वापर अफवा निर्माण करताना होतोय. अफवांमुळे निर्माण झालेल्या हिंसेत महिला, मुले, दुर्बल घटक मोठ्या प्रमाणावर बळी जातात. सामाजिक आणि वित्तहानी वेगळीच. अफवा एखाद्या संसर्गजन्य आजारासारख्या असतात. अफवा एखाद्या अणुबॉम्बपेक्षा अधिक घातक आणि प्रभावी ठरतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. नकारात्मक आणि विकृत बुद्धिमत्ता वापरून त्या निर्माण होतात. आज विशेषतः राजकीय, धार्मिक आणि जातीय अस्मितेच्या अफवा ह्या प्रचंड घातक सिद्ध होताहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिकांचा वापर करून निर्माण केलेली अफवा आणि हिंसाचार, राज्य प्रायोजित अफवा, व्यक्तिगत आणि कौटुंबिक बदनामी करणाऱ्या अफवा अशी ही यादी मोठी आहे.

- Advertisement -

अफवा आणि हिंसा एकाच नाण्याच्या दोन बाजू

आपल्या प्रतिस्पर्धी गटाला नामोहरम , बदनाम करणे. एखाद्याला जीवनातून उठवणे, एखाद्याचा काटा काढण्यासाठी अफवा प्रसारित केली जाते. अफवा गैरसमज वाढविण्यासाठी पूरक ठरतात. प्रेमात, कौटुंबिक आणि नातेसंबंधात हिंसक स्वरूप धारण करीत आहेत. नुकतेच नागपूरला एका कुटुंबातील पाच सदस्य याचे बळी ठरलेत. धर्म-देश धोक्यात आल्याची अफवा प्रसारित करून युद्ध लादली जातात. अफवा, हिंसा आणि दहशतवाद ही त्रिसूत्री जगभर हातात हात घालून चालताना दिसते. एखाद्या राष्ट्राच्या विरोधात अफवा प्रसारित करून त्याच्या विरोधात ताकदवान देश युद्ध पेटवतात. उदाहरणार्थ इराकवरील अमेरिकेचा हल्ला. अफवा आणि हिंसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित उद्योग

विविध प्रकारे हिंसा घडवून, हिंसक दृष्य विकृत पद्धतीने प्रसारित करून आणखी मोठ्या प्रमाणावर अफवा आणि हिंसा घडवून आणणे हा आता जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित उद्योग झाला आहे. इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेनच्या फाशीचे प्रसारण सगळ्या जगभर दाखवून एक वेगळाच दहशतवाद प्रतिष्ठित केला गेला. एखाद्या महिलेला, वंचित घटकाला विकृत पद्धतीने मारून, त्याचे जाती व धर्मनिहाय लेबल लावून चित्रीकरण प्रसारित करून हिंसा व दहशत माजवणे हा वर्चस्ववादी जगमान्य खेळ झाला आहे. अफवांवर आधारित हिंसा आणि दहशतवादाचा अर्थ एकच आहे. ‘आम्हीच सर्वशक्तीमान आहोत, आमचे मांडलिकत्व मान्य करा अन्यथा आम्ही तुम्हाला संपवून टाकू.’ अफवांमुळे हल्ली ‘भावना दुखावण्या’ चा रोग वाढीस लागला आहे. सर्व लोकसमूह याचा यथेच्छ वापर करून सामाजिक वातावरण गढूळ करत आहेत.

सामाजिक कलंक

अफवांची आणि हिंसेची निर्मिती हा सामाजिक कलंक आहे. आपल्याला मनातला शत्रूभाव काढून टाकावा लागेल. किमान आलेल्या माहितीला तात्काळ प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत पडू नका. नीट वाचा विचार करा. समाजहितैषी माहिती असेल तरच प्रसारित करा. अन्यथा आपण अफवांचे, पर्यायाने सामाजिक विध्वंसाचे, कळत-नकळत वाहक बनत राहू. मला विश्वास आहे मानवी सद्सद्विवेकबुद्धीवर. अजूनही वेळ गेलेली नाही.


– संजय सोनटक्के
(लेखक मानसशास्त्राचे अभ्यासक आणि समुपदेशक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -