घरफिचर्सअसुरक्षिततेचा अथांग अंधार!

असुरक्षिततेचा अथांग अंधार!

Subscribe

विवाहितेवर बलात्कार, दोघांना अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून केला खून, हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, खाऊच्या आमिषाने बालिकेवर अत्याचार, महाविद्यालयीन परिसरात युवतींची छेडछाड…..या आशयाचे मथळे वृत्तपत्रात दररोज वाचायला मिळतात. असा एकही दिवस जात नाही की वर्तमानपत्रात महिला अत्याचारासंदर्भातली एकही बातमी नजरेला पडणार नाही. त्यामुळे या बातम्यांचे नुसते मथळे वाचून अथवा फारफार तर तोंडातून ’चक’ असा आवाज करत पान पलटण्याची सवय अनेकांना झाली आहे.

’रोजचं मढं, त्याला कोण रडं?’, असा काहीसा प्रकार महिला अत्याचाराच्या बाबतीत झालेला असल्याने या बातम्यांवर अपवादात्मक घटना वगळता फारशी चर्चा होत नाही. यावर बोलायला, चर्चा करायला, नेमका मुद्दा समजून घ्यायला फारसं कोणी तयारही नसतं. काही जण तर महिलाच कशा कायद्याचा दुरुपयोग करतात, हे छातीठोकपणे जाहीर सांगून मोकळे होतात. या आठवड्यात मात्र देशभर नव्हे तर जगातही भारतातल्या महिलांच्या असुरक्षिततेबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे आणि या चर्चेला निमित्त ठरलाय ’थॉमसन रॉयट्रस फाउंडेशन’ या जागतिक संस्थेने सादर केलेला अहवाल. या अहवालानुसार भारत हा महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश आहे.

- Advertisement -

या अहवालानुसार भारतातील महिलांची तस्करी, धार्मिक परंपरा, लैंगिक हिंसा, इत्यादी महिला अत्याचाराची कारणं नोंदवली आहेत. जगभरातील ५५० तज्ञांनी हा अहवाल सादर केला आहे. मात्र, राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यवाह रेखा शर्मा यांनी या अहवालाला देशाची बदनामी करणारा अहवाल असं म्हटलं आहे. शर्मा यांच्याप्रमाणेच अनेकांनी या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तरी या अहवालाच्या निमित्ताने एकूणच महिलांच्या स्थितीबाबत आपण गांभीर्याने पाहणार का? त्यावर काही उपाययोजना करणार की फक्त कागदोपत्री कायदे करणार असे अनेक प्रश्न पुन्हा नव्यानं ऐरणीवर आले आहे.

’यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ असं म्हणणारा एक वर्ग आणि शुद्राहून शुद्र म्हणून महिलांना कमी लेखणारा एक वर्ग अशी भारतीय समाजातील महिलांची स्थिती आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेत तर महिला या दुय्यम आणि उपभोगाची वस्तू अशा या सामाजिक परिस्थितीत महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असल्या तरी त्यांच्याकडे पुरुषी मानसिकतेतून पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही, हे ओपन सिक्रेट आहे.
या देशात दर तासाला चार महिलांवर बलात्कार होत असतात. दिवसाला लैंगिक छळाच्या शंभर तक्रारी दाखल होत असतात, सोळा वर्षाच्या आतील दहापैकी आठ मुलींवर लैंगिक अत्याचार होत असतात. तर अनेक ठिकाणी हुंड्यासाठी छळ सुरु असतो. तर अनेक ठिकाणी जन्माला येण्याअगोदरच मुलींचे जीव घेतले जातात. खरं तर या अत्याचाराची खूप मोठी यादी देता येईल. असं असलं तरी या सगळ्या घटनांबाबत महिलाच हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन गप्प बसतात. हे कोणी नाकारणार नाही. या गप्प बसण्याची कारणंही सर्वांना माहिती आहेत.

- Advertisement -

अशा परिस्थितीत हा अहवाल आल्यावर आम्ही करतोय काय? तर हा अहवाल आमच्या देशाची बदनामी करणारा आहे म्हणून बोंब ठोकतोय. पण ही बोंब ठोकण्याअगोदर थोड आत्मचिंतन करावं असं किती जणांना वाटतं? माझा देश महिलांसाठी असुरक्षिततेत पहिल्या क्रमांकावर आहे, यापेक्षाही माझा देश माझ्यासाठी असुरक्षित आहे, हिच माझ्यासाठी शरमेची बाब आहे. याकडे आपण कसं पाहणार? निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे नव्याने आले. पण त्यांच्या अंमलबजावणीचं काय? आणि कितीही कायदे आले तरी समाज पुरुषसत्ताक मानसिकतेतून महिलांकडे पाहत असेल तर त्या सुरक्षित होतील का? हा खरा प्रश्न आहे. कारण आजही बाईला आम्ही उपभोगाची वस्तूच समजतो.

गेली अनेक वर्षे महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या ’मासूम’ या संस्थेच्या संस्थापक डॉ. मनीषा गुप्ते म्हणतात, या अहवालानंतर आपण आत्मचिंतन करणं आवश्यक आहे. आपण आता घराबाहेर होणाऱ्या महिला अत्याचाराबद्दल बोलायला लागलो आहोत. पण ६० ते ७० महिला अत्याचार हे घरात किंवा नात्यातील पुरुषांकडून होत असतात. त्यावर कधी बोलायला सुरूवात करणार? हा अहवाल तयार करताना काय निकष लावले गेले यावर प्रश्न विचारण्याऐवजी हे अत्याचार रोखण्यासाठी आम्ही काय करू शकतो, यावर चर्चा करणे, गांभीर्याने त्यावर पाऊल उचलणे आवश्यक आहे.
ज्या महिला अत्याचाराबद्दल बोलायला लागल्या आहेत त्या कोणत्या वर्गातून येतात हेसुद्धा लक्षात घ्यायला हवं. तथाकथिक खालची जात, वर्गातील महिलांना तर आवाजच नाही. त्याबद्दल काय करणार? या प्रश्नाचे उत्तर आता जाहीरपणे विचारायला हवं. महिलांना तोंडावरच बोट काढायला बळ द्यायला हवं. तरच परिस्थिती बदलायला सुरवात होईल. महिला घराबाहेर पडत असताना घरातूनच संघर्ष करावा लागतो. तो वेगवेगळ्या पातळीवरचा आहे. त्यामुळे हा अहवाल बरोबर का चूक हे ठरविण्यात वेळ घालवण्याऐवजी आता प्रत्यक्ष कृतीला सुरवात करूया. महिला असुरक्षिततेच्या यादीत माझ्या देशाचा क्रमांकच येणार नाही हे पाहूया.


– अश्विनी सातव-डोके.
9881191363

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -