घरफिचर्सकुठे हरवला शिवसेनेचा हिंदुत्वाभिमान !

कुठे हरवला शिवसेनेचा हिंदुत्वाभिमान !

Subscribe

काही वर्षांपूर्वी जर का बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे छातीठोकपणे सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजही आठवतात. मात्र, आता राजकारणाच्या घड्याळातील काटे बदलले आहेत. पवारांच्या पाठिंब्यावर राज्यात शिवसेना सत्तेत आहे. अयोध्येतील मंदिराचा प्रश्न आस्थेचा असल्याचेही वारंवार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत असत. मागील वर्षी राम मंदिर झालेच पाहिजे यासाठी शरयू काठी गंगा घाटावर त्यांनी आरती केली आणि त्यानंतर रामलल्लांचे दर्शनही घेतले होते. मात्र, आता तेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जेव्हा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा विषय आला तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी ई-भूमिपूजन का करू नये असा सवाल केला? मुळात आपल्या सोयीने राजकारण करणार्‍यांच्या पंक्तीत उद्धव ठाकरे यांनी बसू नये, एवढीच  सगळ्यांची माफक अपेक्षा आहे. शरद पवार यांनीही निमंत्रण मिळाले तरी अयोध्येला जाणार नाही,  असे  स्पष्ट केले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे ई-भूमिपूजन करावे असे उद्धवजींच्या मनात येत असेल तर मग त्यांनी आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन विठ्ठल रखुमाईची का पूजा केली?

पुढील तीन महिने सण, उत्सव यांची मांदियाळी असणार. नुकतीच नागपंचमी झाली. पवित्र असा श्रावणमास सुरू झालाय. मुस्लीम बांधवांची ईदही याच आठवड्यात आहे. त्यानंतर येणारे रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, दहीहंडी, गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी असे सण पुढील 100 दिवसांत देशभर साजरे होतील. मागील पाच महिने देशभर कोरोनारूपी महामारी आल्याने दिवसरात्र त्याचेच पारायण सुरू आहे. आता मात्र श्रावणात कोरोना सोडून घरोघरी देवादिकांचे पारायण सुरू आहे आणि सकारात्मक वातावरण निर्मिती होत असल्याचा निश्चितच आनंद आहे. या अगोदर कोरोना झाल्याचे कळल्यावर शेजारी पाजारी त्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला वाळीत टाकल्यासारखे करीत होते. एप्रिल ते जून या काळात मुंबईसह राज्यात हेच चित्र होते. मात्र, आता हळूहळू जुलैपासून त्यात बदल होऊन कोरोनातून बरे होऊन आल्यावर लोक प्लाझ्मा डोनेट करण्यावर भर देत आहेत. कारण कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीने प्लाझ्मा डोनेट केल्यास किमान पाचजणांचा जीव वाचू शकतो. मागील काही दिवसांत असे तरुण पुढे येत आहेत आणि अशा प्लाझ्मा डोनरचा गौरवही केला जातो हे विशेष. त्यामुळे कोरोनाची भीती हळूहळू दूर करण्यात पालिका प्रशासन, राज्य सरकार, डॉक्टर्स आणि पोलीस यंत्रणांना यश आल्याने आता प्रत्येकजण आपापली काळजी घेत सॅनिटायझर, मास्क लावूनच कामधंद्याला बाहेर पडत आहे. मात्र, कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात सुमारे 14 हजार जणांनी आपला जीव गमावला असून, राज्यातील मृत्यूदर 3.62 टक्के एवढा आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी डॉक्टर्स आणि संबंधित यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत असताना अजूनही भीती कायम आहे. कारण सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारांना जास्त पाय फुटत असल्याने प्रत्येकाने आपापली काळजी घेतच अनावश्यक फिरणे टाळून कोरोनाचा मुकाबला करायचा आहे.

- Advertisement -

कोरोनावर नियंत्रण जसजसे पक्के होत आहे तसतसे राजकारण्यांनी आपले 24 बाय 7 चे राजकारण पुन्हा सुरू केले आहे. आता निमित्त आहे अयोध्या येथे उभारण्यात येणार्‍या राम मंदिराचे 5 ऑगस्ट रोजी होणारे भूमिपूजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुचर्चित अशा राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. यासाठी बद्रिनाथ येथून माती आणि अलकनंदा नदीचे पाणी अयोध्या येथे पाठवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केवळ 200 लोक उपस्थित असतील. त्यापैकी 150 आमंत्रित पाहुणे असतील. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळून हा कार्यक्रम पार पडणार आहे. श्रीराम जन्मभूमी असलेल्या जागी नवे श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहायचे आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईननुसार मंदिराची उभारणी होणार आहे.

राम मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येईल का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवारांनी विचारला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाने 5 ऑगस्ट ही तारीख श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसाठी निश्चित केली आणि त्यानंतर राजकारण महाराष्ट्रातून सुरू झाले. सोलापूरच्या दौर्‍यावर असलेल्या पवार यांनी राम मंदिर बांधून कोरोना जाईल का, असा सवाल केल्याने सेक्युलर महाराष्ट्राचे आपण सच्चे पाईक असल्याचा दाखला दिला. पवार यांना, श्रीराम मंदिर उभारल्याने कोरोना जाईल का, हा प्रश्न सतावतो असे दिसतेय. मुळात श्रीराम मंदिर आणि कोरोना या दोन्ही निराळ्या गोष्टी आहेत. मंदिर बांधल्याने कोरोना जाईल असा दावाही कुणी केलेला नाही. ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळाले तरी जाणार नाही,’ असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. अर्थात, या सगळ्याच्या मुळाशी इफ्तार पार्ट्यांना हजेरी लावणार्‍या पवार यांनी काँग्रेसमध्ये असो वा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतरही एकगठ्ठा मतांसाठी मुस्लिमांबद्दल सॉफ्ट कॉर्नरच घेतला. पवार यांच्या वक्तव्यानंतर आता इतर पक्षही राम मंदिर भूमिपूजनावर टीका करू लागले आहेत. अयोध्येत येत्या 5 ऑगस्ट रोजी भव्य श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ‘दूरदर्शन’ या सरकारी वाहिनीने करू नये, असे पत्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार बिनॉय विस्वम यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना नुकतेच लिहिले आहे. देशाच्या राष्ट्रीय वाहिनीचा वापर 5 ऑगस्ट रोजी होणार्‍या धार्मिक कार्यक्रमाच्या थेट प्रसारणासाठी करणे हे धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांताच्या विरोधात आहे, असेही ते पत्रात म्हणतात.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी जर का बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे छातीठोकपणे सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजही आठवतात. मात्र, आता राजकारणाच्या घड्याळातील काटे बदलले आहेत. पवारांच्या पाठिंब्यावर राज्यात शिवसेना सत्तेत आहे. अयोध्येतील मंदिराचा प्रश्न आस्थेचा असल्याचेही  वारंवार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत असत. 2018 मध्ये राम मंदिर झालेच पाहिजे यासाठी शरयू काठी गंगा घाटावर त्यांनी आरतीही केली आणि त्यानंतर रामलल्लांचे दर्शनही घेतले होते. मात्र, आता तेच उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कोरोनाच्या काळात मातोश्रीवरच राहून ते राज्याचा गाडा ऑनलाईन हाकत आहेत. त्यामुळे जेव्हा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा विषय आला तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी ई-भूमिपूजन का करू नये असा सवाल केला? मुळात आपल्या सोयीने राजकारण करणार्‍यांच्या पंक्तीत उद्धव ठाकरे यांनी बसू नये एवढीच सगळ्यांची माफक अपेक्षा आहे. कारण जर अयोध्येतील श्रीराम मंदिराचे ई-भूमिपूजन करावे असे उद्धवजींच्या मनात येत असेल तर मग त्यांनी आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन विठ्ठल रखुमाईची का पूजा केली? ई-पूजा का केली नाही असा सवाल भाजपकडून विचारला जातोय तो चुकीचा नाही.

आपल्या वाढदिवशी पक्षातील नेत्यांना, सरकारमधील मंत्र्यांना मातोश्रीवर भेटणारे मुख्यमंत्री आठवड्याला होणार्‍या कॅबिनेट बैठकीला मंत्रालयात का जात नाहीत, असा प्रश्न पुढे येतो. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी त्यांना अपेक्षित असलेला कारभार करावा, पण ज्या श्रीराम मंदिरासाठी आपण दोनदा अयोध्यावारी केली, जहाल हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख असणारी शिवसेना आणि आयुष्यभर भाषणांतून का होईना राम मंदिराचा पाठपुरावा केला त्या सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्याचे मिळालेले भाग्य सोडण्यासारखा कद्रुपणा करू नये. कारण जर सर्वच गोष्टी ऑनलाइनने होणार असतील तर मग बकरी ईदच्या कुर्बानीवरून एवढा गदारोळ कशाला हवा. यावर्षी सर्वांनी बकरी ईद घरीच साजरी करावी. प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले होते. मात्र, त्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक शरद पवार यांनी बोलावली. त्या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांनी सांगायचे प्रतिकात्मक कुर्बानी द्या आणि त्यांच्याच सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कुर्बानीवर बंदी नाही. रितसर परवानगी घेऊन बकर्‍यांच्या कुर्बानीच्या परवानगीबाबत योग्य तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे सांगतात.

मुस्लीम धर्मियांकडून बकरी ईद हा सण 1 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने बकर्‍यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदा बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने केल्या आहेत. संसर्गजन्य परिस्थितीमुळे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यानुसार बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा सार्वजनिक ठिकाणी पढू नये. घरीच नमाज अदा करावी. जनावरांचे बाजार बंद राहतील. याशिवाय नागरिकांनी प्रतिकात्मक कुर्बानीवर भर द्यावा. पालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रांत सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. त्यात कोणतीही शिथिलता आणली जाणार नाही, असेही सरकारच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये झालेले अनेक सण सर्वांनी अत्यंत साधेपणाने साजरे केले आहेत. रमजान ईदसुद्धा मुस्लीम बांधवांनी साजरी केली होती. परंतु, बकरी ईदसाठी बकर्‍यांची कुर्बानी देण्यावरून सर्वांमध्ये मतमतांतरे आहेत. कारण, बकरी ईद साजरी करण्यासाठी त्यांना बकर्‍यांची कुर्बानी देणे भाग आहे, असे मंत्री नवाब मलिक यांचे म्हणणे आहे. मलिक यांच्या म्हणण्यानुसार गृहमंत्र्यांनी जी गाईडलाईन केलीय त्यात कोणतेही निर्बंध नसून लॉकडाऊन असताना बोकड कापायला कोणतीही बंदी नव्हती आताही बंदी नाही. बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. जे  काही गैरसमज आहेत ते गृहमंत्री संबंधित अधिकार्‍यांशी बोलून दूर करतील. बकरी ईदबाबत जे नियम आहेत ते तसेच आहेत. नियमानुसार बकरी ईद साजरी करता येईल. या संदर्भात कोणतीही अडचण नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे म्हणणे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या मतांच्या राजकारणासाठी जरूर बकरी ईदसाठी नियमांत सूट द्यावी, पण प्रत्येकवेळी हिंदूंच्या सणाच्या वेळीच निर्बंध का असा सवाल विचारला जात आहे.

परप्रांतियांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी विशेष ट्रेन, खासगी लक्झरी बसेस सोडण्यात आल्या. परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी जाऊन पुन्हा मुंबईत आलेही. पण ज्या कोकणी माणसाने शिवसेनेला डोक्यावर घेतले त्या कोकणवासीयांच्या गणपतीत गावाला जाण्याबाबत अजूनही सरकार धोरण ठरवत नाही याला काय म्हणायचे. सरकारच्या परवानगीशिवाय एखादी ग्रामपंचायत कुणाला गावात प्रवेश द्यायचा कुणाला नाही, किती दिवस क्वारंटाईन करायचे याचा निर्णयच कसा घेऊ शकते, याबाबत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची भूमिका कधी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस त्यांचा सेक्युलरवादी चेहरा कायम राहावा म्हणून बकरी ईदबाबत तात्काळ बैठका घेणार आणि शिवसेना गणेशोत्सवाच्या उपाययोजनेबाबत आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार परवानगी मिळेल, असे सांगणार? याला काय म्हणावे.

बकरी ईदसाठी, मोहरमसाठी एक गाईडलाईन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी वेगळी गाईडलाईन राज्यात असूच शकत नाही. आतापर्यंत राज्यातील सुमारे 12 कोटी जनतेने लॉकडाऊनचे पालनच केले आहे. पण महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष आपापल्या सोयीने सर्वधर्म समभावाचे असे आचरण करत बसले तर कोरोनानंतरची राज्यातील स्थिती वेगळी असेल. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून हिंदू-मुस्लीम या दोन समाजबांधवांना एकच न्याय द्यावा, हीच राज्यकर्ते म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.

एक प्रतिक्रिया

  1. छान . आज शिवसेनेला मानणाऱ्या असंख्य लोकांना हेच प्रश्न पडले आहेत. सेनेने सत्ताकारण करण्यासाठी स्वतःचा अभिमान गहाण ठेवला आहे हे इथून तिथून दिसून येत आहे…

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -