घरक्रीडाचौथ्याचा तिढा सुटेना !

चौथ्याचा तिढा सुटेना !

Subscribe

- विश्वचषकात चौथ्या क्रमांकाबाबत अजुनही अनिश्चितता

इंग्लंडमध्ये होणार्‍या क्रिकेट विश्वचषकाला आता अवघे दोन महिनेच बाकी राहिले आहेत. विश्वचषकाआधी भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय सामने होणार नाहीत. त्यामुळे विश्वचषकासाठी भारतीय संघात आणि त्यातही अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोण असणार याची चांगली कल्पना संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला एव्हाना आली असेल. मात्र, भारतीय संघात अजूनही एक क्रमांक असा आहे, ज्यावर कोण खेळणार हे अजून सुनिश्चित झालेले नाही आणि तो आहे क्रमांक चार. या क्रमांकावर भारताने बर्‍याच खेळाडूंना संधी देऊन बघितली आहे. मात्र एकाही खेळाडूने या जागेवर आपली पकड मजबूत केलेली नाही. त्यामुळे विश्वचषकाआधी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे अजूनही न सुटलेले कोडेच आहे.

भारतीय संघाने मागील काही काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मग ती मायदेशात असे की परदेशात. मागील दोन परदेश दौर्‍यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियामध्ये आणि न्यूझीलंडचा न्यूझीलंडमध्ये पराभव करत एकदिवसीय मालिका जिंकल्या होत्या. भारताने २०१६ वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण १७ एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी १३ मालिका या भारताने जिंकल्या आहेत. या दमदार कामगिरीमध्ये भारताच्या अव्वल तीन क्रमांकाच्या फलंदाजांचा मोलाचा वाटा आहे. शिखर धवनने २०१६ पासून केवळ एकदाच (यावर्षी ३५ ची सरासरी) ४५ पेक्षा कमीच्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याचा सलामीचा साथीदार रोहित शर्माने हे वर्ष सोडता २०१६ पासून ६२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या दोघांपैकी कोणी लवकर बाद झाले तर विराट कोहली आहेच.

- Advertisement -

विराटने २०१६ मध्ये ९२ च्या सरासरीने ७३९ धावा, तर २०१७ आणि २०१८ मध्ये हजार धावांचा टप्पा पार केला होता. यावर्षी त्याने ५६ च्या सरासरीने ६११ धावा केल्या आहेत. या आकड्यांवरूनच या तिघांच्या अफलातून कामगिरीचा अंदाज येतो. हे तिघे किंवा यांच्यातील दोघेही जर लवकर बाद झाले, तर भारताची तिसरी विकेट पडायला फारसा वेळ लागत नाही, हे वारंवार दिसून आले आहे, मात्र असे का होते? याचे कारण आहे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार्‍या फलंदाजांचे निराशाजनक प्रदर्शन. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारताला चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची जराही चिंता नव्हती. कारण त्यावेळी या महत्वाच्या क्रमांकावर डावखुर्‍या युवराज सिंगने कब्जा केला होता. पण फॉर्म खालावल्यामुळे त्याला आपले संघातील स्थान गमवावे लागले आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावर ‘हा’ खेळाडू खेळणार की ‘तो’ या अनिश्चिततेचा खेळ सुरू झाला. चौथ्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, अंबाती रायडू यासारख्या खेळाडूंना संधी मिळाली. पण कोणत्याही फलंदाजाला ठरावीक कालावधीनंतर आपल्या प्रदर्शनातील सातत्य टिकवता आले नाही.

अजिंक्य रहाणे फेब्रुवारी २०१८ पासून एकदिवसीय संघाच्या बाहेर आहे. सलामीवीर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या अजिंक्यने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर २५ वेळा फलंदाजी केली आहे. या सामन्यांमध्ये त्याने ३६.६५ च्या सरासरीने ८४३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट ८४ चा आहे, जो आजकालच्या टी-२० चा प्रभाव असणार्‍या जमान्यात अगदी साधारणच आहे. तसेच वेळोवेळी त्याच्यावर मधल्या षटकांत एक-दोन धावा घेत धावफलक हलता ठेवता येत नाही यावरून टीका झाली आहे. मात्र त्याला वगळल्यानंतरही भारताला चौथ्या क्रमांकासाठी दुसरा फलंदाज सापडलेला नाही. तसेच त्याने याआधी इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शनही केले आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी त्याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दिनेश कार्तिकने चौथ्या क्रमांकावर १८ एकदिवसीय सामन्यांत ३९ च्या सरासरीने ४२६ धावा केल्या आहेत. मात्र संघ व्यवस्थापनाने ‘आम्ही कार्तिकला फिनिशर म्हणून पाहतो’, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर त्याला संधी मिळणार याची शक्यता कमीच आहे. युवा विजय शंकर आणि रिषभ पंत हे दोघेसुद्धा या जागेसाठी दावेदार मानले जात आहेत. परंतु विश्वचषकासाठी संघ निवडताना ‘अनुभव’ हा महत्वाचा मुद्दा असू शकेल आणि असे असल्यास या दोघांचा कमी अनुभव त्यांच्या विरोधात जाईल. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने चेतेश्वर पुजाराचा पर्यायही पुढे केला आहे. पण २०१४ मध्ये आपला पाचवा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार्‍या पुजाराला थेट विश्वचषकात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

कर्णधार विराट कोहली काही महिन्यांपूर्वी ‘आम्हाला विश्वास आहे की अंबाती रायडू चौथ्या क्रमांकावर चांगले प्रदर्शन करेल’, असे म्हणाला होता. मागील आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केल्यानंतर (१६ सामन्यांत ६०२ धावा) रायडूचे भारतीय संघात पुनरागमन झाले. रायडूने वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करत आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावला होता. त्यानंतर न्यूझीलंड दौर्‍यातही त्याने सातत्यपूर्ण प्रदर्शन केले, मात्र काही दिवसांपूर्वीच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला धावांसाठी झुंजावे लागले. त्याला या मालिकेच्या ३ सामन्यांत अवघ्या ३३ धावाच करता आल्या आणि चौथ्या सामन्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आले. मात्र असे असतानाही ५५ एकदिवसीय सामन्यांनंतर ४७ ची सरासरी असणारा रायडूच विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर खेळणार अशी चिन्हे आहेत. एकूणच चौथ्या क्रमांकावर कोण खेळेल हे सध्या तरी सांगता येणे कठीण असले तरी, विश्वचषकाआधी या प्रश्नाचे उत्तर मिळेल, अशी आशा टीम इंडिया करत असेल हे निश्चित.

…तर धोनी कामास येईल

रायडूबाबत काही शंका असतील तर भारताकडे चौथ्या क्रमांकासाठी महेंद्रसिंग धोनीसारखा चांगला पर्याय आहे. धोनी आतापर्यंत ३० सामन्यांत चौथ्या क्रमांकावर खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याने ५७ च्या सरासरीने १३५८ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवून केदार जाधवला पाचव्या आणि दिनेश कार्तिकला सहाव्या क्रमांकावर खेळवणेही भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -