घरफिचर्सवटपौर्णिमा का आणि कशासाठी?

वटपौर्णिमा का आणि कशासाठी?

Subscribe

व्रतवैकल्य करत असताना पर्यावरणाला हानी न पोहचवता किंवा त्याचा ऱ्हास तर होत नाही ना? याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आधुनिक युगात वटपौर्णमा का आणि कशासाठी केली जाते याचा एक छोटासा आढावा.

सावित्रीनं सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं. तेव्हापासूनच सर्व सुवासिनी हे व्रत आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभावं यासाठी हे व्रत करायला लागल्या अशा गोष्टी आपण ऐकत आलोच आहोत. वडाच्या झाडाला पुजून हे व्रत करण्यात येत होतं. पण हे व्रत केल्यानं खरंच का नवऱ्याचे प्राण वाचतात? म्हणजे हा विचार कदाचित त्याकाळी पण नसावा आणि आजही. पूर्वीच्या काळी बायकांना बाहेर पडता यायचं नाही. वटपौर्णिमा हे एकत्र जमण्याचं एक निमित्त होतं. वडाच्या झाडाजवळ ऑक्सीजन मिळायचा तो दोन्ही अर्थानं. एक म्हणजे श्वासोच्छवासाचा ऑक्सीजन आणि दुसरा म्हणजे आपल्या मैत्रिणींचा थोड्या कालावधीसाठी का होईना पण मिळणारा सहवास. हादेखील त्याकाळी बायकांसाठी ऑक्सीजनच होता. तर याच दिवशी सर्व बायकांना नटण्या-मुरडण्याची एक संधीही मिळायची. पण आता ही रूढी – परंपरा जपण्याची गरज आहे का? असा प्रश्न बऱ्याच जणांना असतो. तर याच पद्धतीनं जर ही परंपरा जपली असती तर याचं उत्तर कदाचित हो आलं असतं.

झाड्याच्या फांद्या तोडून रूढी जपू नका

आजही आपल्या रूढी – परंपरा जपत, थोरा-मोठ्यांना आवडतं म्हणून किंवा एरव्ही जीन्स आणि शर्टमध्ये वावरणाऱ्या महिला वटपौर्णिमेला मात्र सर्व साजश्रृंगार करून वडाला फेऱ्या मारताना दिसतात. त्यांचं कौतुक आहेच. कारण त्या पर्यावरणाला कोणताही हानी न पोचवता आपली परंपरा जपण्याचा, कोणालाही न दुखवता उपास – तापास करण्याचा प्रयत्न करत असतात. पण ज्या महिला झाडांच्या फांद्या आणून पूजा करतात किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन वाण म्हणून मात्र पानाचा वापर करतात, त्यांचं काय? मुळात आधुनिक युगात व्रत ही कदाचित विसंगती आहे. झाडांच्या फांद्या तोडून उपास करण्यानं नक्की काय होतं? आजच्या मुली दिवसभर धावपळीत कामावर जातात. फक्त फळं खाऊन उपवास करणं शक्य असतं का? मग पर्याय निघतो उपवासाचे पदार्थ खाण्याचा. मग इतकं सगळं ओढाताण करून का करायचं असाही प्रश्न पडतो. वटपौर्णिमा हा एक सण आहे आणि तो रूढी – परंपरा जपत पूजा करून एकमेकींना भेटून खेळून – मिसळून घालवला तर चालणार नाही का? रूढी – परंपरा आधुनिक पद्धतीनंदेखील जपता येतात. त्यासाठी पर्यावरणाला हानी पोहचवण्याची खरंच गरज आहे का आणि त्यानं नक्की काय साध्य होत असतं? तुमचा पती तुमच्यासाठी हे व्रत करतो का? तो तुमच्याप्रमाणेच तुम्हाला जपत असेल आणि तुमच्या बरोबरीनं हे व्रत करत असेल तर नक्कीच ते कौतुकास्पद आहे. पण तरीही सात जन्म खरंच हा पती मिळणार असतो का? हा प्रश्न तर तसाच राहतो.

- Advertisement -

प्रेमच नाही तर व्रत कशाला?

बऱ्याच जणींच्या लग्नाला अनेक वर्ष लोटलेली असतात. मग त्या जोडप्यामध्ये प्रेमच नसेल, एकमेकांविषयी आदरच नसेल, नवरा कर्तव्यच नीट निभावत नसेल, दारू पिऊन मारझोड करत असलेला नवरा असेल, बायकोला गृहित धरणारा असल्यास, असा नवरा जन्मोजन्मी मिळावा असं मनात धरून हा उपवास करणं आजच्या स्त्रियांना खरंच गरजेचं आहे का? या धकाधकीच्या जीवनात नटणं – मुरडणं हा एक बदल म्हणून ठीक आहे. पण सात जन्म हाच पती मिळावा यासाठी उपवास करणं किती स्त्रियांना पटत असेल हा एक मुद्दा आहेच.

वाढत्या इमारती आणि प्रदूषणाच्या विळख्यात पर्यावरणाची हानी होत चालली आहे. असं असताना झाडांची कत्तल करून त्यांच्या फांद्या तोडून पूजा करण्यापेक्षा वडाच्या झाडाजवळ जाऊन थोडा मोकळा श्वास घ्यायची आजच्या स्त्रियांना गरज आहे असं वाटणाऱ्या स्त्रियाही बऱ्याच असतील. तर काहींना अजिबातच यामध्ये रस नाही. एकंदरीत ही दोन टोकं आहेत. व्रतवैकल्य करून एकमेकांवरचं प्रेम व्यक्त होतंच असं नाही. काही जणी तर याच जन्मात आपल्या नवऱ्याला कंटाळल्या आहेत. हा वाद होतच राहील. पण व्रतवैकल्य करत असताना पर्यावरणाला हानी न पोहचवता किंवा त्याचा ऱ्हास तर होत नाही ना? याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. खरं तर वडाला सात फेऱ्या मारून सात जन्म हाच नवरा मिळू दे असं म्हणण्यापेक्षा सात जन्म तुझी पूजा करता यावी यासाठी तू असाच जन्मोजन्मी उभा राहा अशी वडालाच प्रार्थना करायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -