घरफिचर्सविवाहानंतर का निर्माण होतात मल्टिपल रिलेशनशिप्स?

विवाहानंतर का निर्माण होतात मल्टिपल रिलेशनशिप्स?

Subscribe

अनेकजण गृहीत धरतात की विवाह एकाशी झालेला आहे आणि त्यामध्ये काही अडचणी असतील म्हणून व्यक्ती पर स्त्री अथवा पर पुरुषाकडे आकर्षित झाली. त्यांनी एकमेकांना आधार देण्यासाठी संबंध स्वीकारले. पण खरंच असं होत का की वैवाहिक जीवनातील कमतरता ही दुसरी आयुष्यात आलेली व्यक्ती पूर्णपणे भरून काढू शकते?

अनेकदा आपण विवाहबाह्य संबंधाबद्दल ऐकतो, बोलतो आणि चर्चा करतो. अनेकजण गृहीत धरतात की विवाह एकाशी झालेला आहे आणि त्यामध्ये काही अडचणी असतील म्हणून व्यक्ती पर स्त्री अथवा पर पुरुषाकडे आकर्षित झाली. त्यांनी एकमेकांना आधार देण्यासाठी संबंध स्वीकारले. पण खरंच असं होत का की वैवाहिक जीवनातील कमतरता ही दुसरी आयुष्यात आलेली व्यक्ती पूर्णपणे भरून काढू शकते? अथवा त्याच एका व्यक्तीसोबत हे संबंध आपण कायमस्वरूपी टिकवून ठेऊ शकतो? तर अनेकदा त्यांचे उत्तर नाही असेच येते. असे काय होते? लग्न तरी आपण अनेकदा घरच्यांच्या पसंतीने, कधी कधी दबावात अथवा एक तडजोड म्हणून स्वीकारलेले असते. पण विवाहबाह्य संबंध तर पूर्णपणे आपल्या आवडीने, मताने, सोयीने निवडलेला पर्याय असतो. बरेचदा त्याचा पाया प्रेम हा देखील असतो. मग तरी आपण ते रेलशनशिप आयुष्यभर का निभावू शकत नाही? का एकमेकांशी प्रामाणिक राहू शकत नाही.

यामागे अनेक कारणे असू शकतात. मुख्य म्हणजे विवाहबाह्य संबंधांना कोणताही नैतिक अथवा कायदेशीर पाया नसतो. एकमेकांना सुरक्षित वाटेल असे कोणतेही शाश्वत बंधन यात नसते. अशा संबंधातून कोणताही त्रास, अडचण, अत्याचार होत असल्यास कुणीही त्याविरुद्ध आवाज उठू शकत नाही. महिला असो वा पुरुष एकतर अशा प्रकारचं नातं त्यांनी आपल्या दररोजच्या घरच्या अस्थिर वातावरणाला कंटाळून, लग्नाच्या जोडीदाराकडून अपेक्षा भंग झाल्यामुळे, लग्नाच्या जोडीदाराच्या चुकीच्या किंवा न पटणार्‍या सवयी, आवडीनिवडी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांशी असलेले वाद, विवाद, कलह, मतभेद, संशय, कटकट, मेंटल टॉर्चर याला पर्याय म्हणून अथवा यावर उपाय म्हणून स्वीकारलेले असतात. आता या प्रकारचं नातं स्वीकारताना स्त्री अथवा पुरुष कोणीही जास्त विचार केलेला नसतो. आधीच डिस्टर्ब असलेल्या मानसिकतेमध्ये जो कोणी आपल्या आयुष्यात प्रेमाची सावली घेऊन येईल, जो दोन शब्द गोड बोलेल आणि जो आपल्या भावना त्यावेळेस समजून घेईल, ती व्यक्ती आपल्या आयुष्यातील देवदूत वाटते.

- Advertisement -

अशा वेळी समोरील व्यक्तीचे व्यक्तिमत्व, विचार, आचार, खरा स्वभाव, सवयी, आर्थिक व्यवहार, करियर अथवा इतर विचारसरणी याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते आणि रिलेशनशिपमध्ये जाताना हे माहिती असणे आवश्यक आहे. याची आपल्याला अजिबात जाणीव नसते.परंतु, जसजशी एकमेकांमध्ये जवळीक वाढते, शारीरिक, मानसिक संबंध बर्‍यापैकी पुढे जातात आणि ते नातं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते, तेव्हा कुठेतरी दोघांमधील एकजण जरी चुकीचं वागला, किंवा समोरच्या व्यक्तीला स्वतःच्याच मताने वागवू लागला किंवा हे प्रेमाचं नातं आपल्या करियर, प्रगतीच्या आड येऊ लागलं किंवा एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जाऊ लागल्यावर, या नात्यात कोणताही आर्थिक व्यवहार इन्व्हॉल झाला की या प्रकारच्या नात्यांची अधोगती सुरु होते. आता जे नातं आपण आपल्या मानसिक, शारीरिक, भावनिक गरजांना पूर्ण करण्यासाठी निर्माण केल आहे, त्यातही जर तणाव निर्माण झाला तर त्यातील आनंद संपायला लागतो. या नात्याची जी बंधने, मर्यादा अथवा आपल्या आयुष्यातील जागा यावर दोघांनी एकविचार ठेवणे शक्य होत नाही.

आपली स्पेस आपल्याला मिळत नाहीये किंवा आपले व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे, असे जेव्हा उभयतांना वाटायला लागते, तेव्हा अशा नात्यांना तडा जायला सुरुवात होते. त्यातून एकमेकांसाठी केलेला त्याग, घेतलेली रिस्क, दिलेले योगदान, केलेली तडजोड, मदत बोलून दाखविले जाऊ लागते. एकमेकांना नकोशी वाटणारी जाचक बंधने जर घातली गेली तर ती स्वीकारणे अवघड जाते. यातून एकमेकांना टाळणे सुरु होते आणि एकदिवस या नात्याचा अंत होतो. तोपर्यंत वैवाहिक जीवनाची घडी सगळ्याच आघाड्यांवर बिघडलेली असेल तर तो मनस्ताप आणि तुटलेल्या विवाहबाह्य संबंधाच दुःख यातून सावरायला माणूस अजून एक आसरा शोधायला लागतो.आता जेव्हा आधीच विवाहबाह्य प्रकरण आपल्या हाताबाहेर जातंय असं वाटत तेव्हा स्त्री अथवा पुरुष परत इतरत्र भरकटतात. आपल्या आयुष्यात आपण थांबतच नाही, स्वतः ला ओळखायला, स्वतः साठी विचार करायला वेळच देत नाही. काय चूक, काय बरोबर, कोणत्या मर्यादेपर्यंत वाहवत जावं ही विचारशक्तीच आपण वापरत नाही.

- Advertisement -

आपलं मन आपली बुद्धी काहीच आपल्या कंट्रोलमध्ये नसल्यासारखं परत तीच भावनिक गुंतवणूक, परत तेच स्वप्नाळू जीवन आपण सुरु करतो. अनेकदा आपल्या ही कळत नकळत आपण त्यात ओढलं जातो. अनेकजण केवळ एन्जॉय म्हणून किंवा टाइमपास म्हणून अशा प्रकरणांना खूप सोपं समजतात. असे लोक कोणत्याही त्रासाशिवाय यातून बाहेर देखील पडतात. पण त्यावेळी ते हे विसरतात की समोरची व्यक्ती आपल्यामध्ये सिरीयसली गुंतून जाऊ शकते आणि त्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्याचा, त्याला फसवण्याचा आपल्याला कोणताही नैतिक अधिकार नाहीये. अनेक जन अशा प्रकरणांमध्ये स्वतः च्या आयुष्याचे बहुमोल दिवस, पैसा, नोकरी, व्यवसाय, वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्य पनाला लावतात. वेळ निघून गेल्यावर लक्षात येते की आपण यातून क्षणिक सुखपलीकडे काहीच मिळवू शकलो नाही. अशी प्रकरणे इतक्यावरच थांबतात असं नाही तर त्यातून एकमेकांना ब्लॅकमेल करणे, भावनेच्या आहारी जाऊन आत्महत्या करणे, घातपात, गुन्हेगारीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागणे यासारखा उपद्रव देखील घडू शकतो. एक किंवा अनेक विवाहबाह्य संबंध ठेवतांना आपण स्वतःला कुठेच समाधानी ठेऊ शकत नाहीये याची जाणीव होणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -