Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स मराठी पंतप्रधानाचे घोडे का अडले!

मराठी पंतप्रधानाचे घोडे का अडले!

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी स्वराज्यांचे साम्राज्यात रुपांतर केले आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांची सत्ता भारताच्या बहुतांश भागावर पसरली. मराठे हे मुख्य सत्ताधीश असल्यामुळे अहमदशहा अब्दालीशी लढण्यासाठी मराठी माणसांना महाराष्ट्रातून पानिपतपर्यंत जावे लागले. शाह आलम याला सत्तेवर बसवून मराठ्यांनी दिल्लीची सत्ता चालवली. पुढे मराठे हे या देशातील मुख्य सत्ताधीश असल्यामुळे ब्रिटिशांनी शनिवारवाड्यावरचा भगवा उतरवून, तिथे युनियन जॅक चढवला आणि भारताची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. असा सगळा मराठ्यांचा दबदबा असताना ब्रिटिशांच्या राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि विशेषत: संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर अजूनपर्यंत महाराष्ट्रातील मराठी माणूस पंतप्रधान झालेला नाही, याची खंत मराठी माणसांना आहे. राजकीय विश्लेषकांनाही हे कोडे पडलेले असून त्यावर ते विविधांगी खल करत असतात. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पंतप्रधानपदाच्या जवळ पोहोचले होते, इंदिरा गांधींच्या प्रभावामुळे त्यांचा तो मान हुकला.

पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यामध्ये मराठी पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे होते, पण प्रमोद महाजन यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे ती शक्यता मावळली. आता शरद पवार यांनी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केली आहेत, तरीही त्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान होण्याची आशा अजूनही सोडलेली नाही. पवारांनी तिसर्‍या आघाडीची मोट बांधण्यासाठी बैठकांना सुरुवात केलेली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्र मंच या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली दिल्लीत भाजपविरोधी पक्षाची बैठक झाली. प्रशांत किशोर या राजकीय रणनीतीकाराने काही दिवसांपूर्वी पवारांची मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळीच पुढच्या हालचालीचे संकेत मिळू लागले. मंगळवारी दिल्लीत प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार पवारांच्या उपस्थितीत पंधरा पक्षांची बैठक झाली. आताही प्रशांत किशोर तिसर्‍या आघाडीसाठी ही बैठक नाही, असेच म्हणत आहेत. पण आधीच कुठल्या गोष्टीचा बोलबाला नको, अशी त्यामागे भूमिका असावी. मोदी सरकारची चुकीची धोरणे आणि त्यामुळे जनतेला होत असलेला त्रास याविरोधात आम्ही एकत्र येत आहोत, हे जरी पवार सांगत असले तरी या एकत्रिकरणामागील एकमेव कारण आहे, ते म्हणजे त्यांची देशाचे पंतप्रधान होण्याची इच्छा.

- Advertisement -

ज्या पदाने आपले राजकीय गुरू आणि महाराष्ट्राचे भाग्यविधाता यशवंतराव चव्हाण यांना हुलकावणी दिली, त्या पदावर आपण स्थानापन्न व्हावे, या त्यांच्या अनिवार इच्छेमुळेच पवार तिसर्‍या आघाडीची मोट बांधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असतात. तसे पाहू गेल्यास पुढील लोकसभा निवडणूक ही २०२४ साली आहे. त्याला अजून वेळ आहे. त्यात पुन्हा केंद्रात भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे कुठले पक्ष फुटून बाहेर पडतील आणि मोदी सरकार पडेल, अशीही स्थिती नाही. तरीही पवार शांत बसलेले नाहीत, मोदींना हटवून त्यांच्या जागी विराजमान होण्यासाठी त्यांची धडपड सुरूच आहे. ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचंड ताकदीला पश्चिम बंगालमध्ये चितपट करून विजय मिळवल्यानंतर पवारांचा उत्साह अधिकच वाढला आहे. त्यामुळे नव्या उत्साहाने ते कामाला लागले आहेत. ममतांच्या रुपाने मोदींविरोधात लढण्यासाठी पवारांना एक मजबूत ढाल मिळालेली आहे.

प्रशांत किशोर यांच्या मदतीने देशाभरातील भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांना तिसर्‍या आघाडीच्या माळेत गुंफण्याचे काम पवार करत आहेत. पवारांचा आशावाद प्रचंड आहे, त्यामुळे अजून लोकसभा निवडणुकीला अवकाश असूनही त्यांनी मोदींविरोधात जोरदार तयारी चालवली आहे. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, असे महाराष्ट्रातील माणसांना वाटत असले तरी त्यालाही पुन्हा विविध राजकीय कंगोरे आहेत. पवार पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी काँग्रेसकडून नरसिंह राव, मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाची संधी देण्यात आली, तशी पवारांनाही देण्यात येईल, असे वाटत होते, पण तसे न होता, पवारांना डावलण्यात येऊ लागले, त्यातूनच मग पवारांनी काँग्रेसला राम राम ठोकला आणि वेगळा पक्ष काढून वेगळा मार्ग निवडला. त्या मार्गावरून त्यांची वाटचाल सुरू आहे.

- Advertisement -

आजवर मराठी माणूस देशाचा पंतप्रधान का बनू शकला नाही, याचे मुख्य कारण म्हणजे केंद्रीय सत्तेत नेहरू, गांधी घराण्याची असलेली मक्तेदारी. त्यांना आव्हान देणार्‍यांना त्याची किंमत मोजावी लागली. जनमानसात अतिशय आदराचे स्थान असलेले लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले, पण त्यांना फार काळ जिवंतही राहता आले नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या निधनानंतर काँग्रेसमधील ज्येष्ठांनी जेव्हा नेहरुंची कन्या इंदिरा गांधी यांना आव्हान द्यायला सुरुवात केली, तेव्हा इंदिराजींनी ज्येष्ठांना बगल देऊन वेगळ्या आय काँग्रेसची स्थापना केली. त्या माध्यमातून पंतप्रधानपद मिळवले. पुढे इंदिरा गांधी यांनी राजीव गांधी यांना राजकारणात आणले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान कोण होणार, असा प्रश्न निर्माण राहिला.

तेव्हा प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधानपद मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या, पण त्यांना बाजूला ठेवून राजीव गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करण्यात आले. त्यानंतर प्रणब मुखर्जी यांनी वेगळा पक्षही काढला होता, पण आपल्या मर्यादा लक्षात येऊन ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. पुढे मनमोहन सिंग यांच्यापेक्षा राजकीयदृष्ट्या प्रभावी असूनही मुखर्जींना पंतप्रधानपदाची संधी देण्यात आली नाही. पुढे राहुल गांधी यांच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या मार्गात अडथळा नको, म्हणून मुखर्जींना राष्ट्रपती बनवण्यात आले. आजही राहुल गांधी यांना बाजूला करून कुठल्याही काँगेस नेत्याला पुढे येता येत नाही. काँग्रेस हा पक्ष कायमची नेहरू-गांधी कुटुंबीयांच्या दावणीला बांधला गेला आहे. भारतासारख्या लोकशाही राजवट असलेल्या देशात हा पक्ष एका घराण्याची मक्तेदारी होऊन बसला आहे. आता तर गांधी घराण्याशिवाय काँग्रेस चालूच शकत नाही, अशीच भावना काँग्रेसजनांचीही झालेली आहे.

यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार गांधी घराण्याच्या पंतप्रधानपदावरील मक्तेदारीमुळे नेहमीच डावलेले गेले. जेव्हा त्यांनी स्वंतत्रपणे प्रयत्न केला तेव्हा त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. भारतीय राजकारण हे प्रामुख्याने दोन विचारसणींमध्ये विभागलेले आहे. एक जहालवादी म्हणजे हिंदुत्ववादी आणि दुसरी आहे, मवाळवादी म्हणजे गांधीवादी. जहालवादी लोकमान्य टिळकांना मानतात, तर मवाळवादी महात्मा गांधींना मानतात. खरे तर महात्मा गांधींचे गुरू गोपाळकृष्ण गोखले हे महाराष्ट्रातले. या दोन्ही विचारसरणींचे प्रमुख महाराष्ट्रातलेच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पाठिंब्यातून अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तर काँग्रेसमधून गांधी घराण्याची मंडळी पंतप्रधानपदावर आली. अशा स्थितीत महाराष्ट्रातील पंतप्रधानपदाचे दावेदार बाजूला पडले. त्यांना राष्ट्रीय पातळीवर व्यापक विस्तार असलेल्या कुठल्या संघटनेचा पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातून आजवर कुणी मराठी पंतप्रधान झाला नाही. पवार आता प्रादेशिक पक्षांची मोट बांधून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. महात्मा गांधींचा मारेकरी मराठी असणे, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विशेषत: मराठी लोकांनी काँग्रेसच्या केंद्रीय सत्तेला दिलेले कडवे आव्हान, अशाही गोष्टी दिल्लीत मराठी नेत्यांची उपेक्षा होण्यासाठीही कारणीभूत ठरल्या.

- Advertisement -