घरअर्थजगतम्युच्युअल फंड गुंतवणूक - कोणी? का करावी?

म्युच्युअल फंड गुंतवणूक – कोणी? का करावी?

Subscribe

कोणतीही गुंतवणूक आपण का करतो? सोप्या शब्दांत सांगायचं तर हाती असलेला ‘पैसा’वाढावा म्हणून. ‘बचत’ व्हावी म्हणून ! भविष्यात वा कधी अडी-अडचणीला उपयोगी पडावा म्हणून. हे सर्व फायदे आपल्याला म्युच्युअल फंडात पैसे गुंतवल्यावर मिळतात. नेमके हेच फायदे जर मिळणार असतील, तर मी माझ्या नेहमीच्या बँकेत किंवा पतपेढीत न गुंतवता इथेच का ठेवावेत? असा प्रश्न कोणीही विचारू शकतो. अशा काही शंकांची योग्य उत्तरं मिळाली तर आपल्यापैकी अनेकजणम्युच्युअल फंडसारख्या झपाट्याने लोकप्रिय होणार्‍या साधनांकडे नक्कीच वळू लागतील.

म्युच्युअल फंडच का? इतर कोणत्याही प्रचलित योजना किंवा साधनांपेक्षा ह्यातच का पैसे गुंतवावेत? त्याची दोन कारणं –

- Advertisement -

१) आजवर जे काही गुंतवणूक मार्ग उपलब्ध आहेत, त्यापैकी काही आता ‘कमी उत्पन्न – कमी लाभ’ देणारे झालेत. बदलत्या काळानुसार त्यांची नफा-क्षमता कमी झालीय.

उदाहरणार्थ – पूर्वी बँकेच्या खात्यात – साधे बचत खाते असो किंवा मुदत ठेव म्हणजे फिक्स्ड डिपॉझीट असो, त्यात चांगले व्याज मिळायचे. रिटायर्ड मंडळी आपली कमाई तिथे गुंतवून निर्धास्त असायची. कारण बँक सुरक्षित आणि व्याजही नियमित! पण गेल्या काही वर्षात असे काही बदल झाले, की पूर्वीची खात्री आणि विश्वास डळमळीत झालेला आहे. काही बँक्स बुडाल्याच्या, गैर-व्यवहाराच्या बातम्या आपण वाचतो. बुडीत कर्जाच्या डोंगराखाली काही बँका बुडतील की काय? अशी गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. अशा वातावरणात आपली आयुष्यभराची पुंजी का धोक्यात घालायची? शिवाय व्याजदर कमी-कमी होतो आहे! म्हणजे ‘मुद्दलाची धास्ती आणि त्यावर मिळणार्‍या उत्पन्नात होणारी घट.’ ही का सोसायची?

- Advertisement -

२) शेअर्समध्ये अधिक नफा मिळू शकतो; पण जोखीमदेखील असते. इतके व्याप करायला आपल्याकडे वेळ कुठे असतो? आपल्याला तितके काही कळत नाही. हे काही आपले काम नाही! अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला येते. पूर्वीपेक्षा आज शेअरबाजारात गुंतवणूक करणारी मराठी मंडळी अनेकपटींनी वाढलीत. अनेक मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत, त्यातून आपल्या मनातील भीती कमी झालेली आहे. तरी ह्यात ‘जोखीम’ आहे ही बाब नाकारता येणार नाही.

म्हणूनच म्युच्युअल फंड हा एक असा पर्याय आहे, जो आपल्याला शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याचे फायदे मिळवून देतो आणि जोखमीचा परिणाम तितकासा जाणवत नाही. म्हणजे नेमके काय?

तुम्ही-आम्ही थेट शेअर्स घेवू शकतो; पण कोणती कंपनी चांगला बिजनेस करते?म्हणजे चांगला डिव्हिडंड मिळेल! हे एकतर आपल्याला समजून घ्यायला लागेल आणि शेअर्सच्या किमतीच्या चढ-उतारावर नित्य-नियमितपणे लक्ष द्यावे लागेल. कारण आता क्षणाक्षणाला अशी बाजाराची माहिती टीव्ही-इंटरनेट आणि सोबतच मोबाईलवर मिळत असते. पण हा खटाटोप आपल्याला जमेल का? हो जमेल ! पण त्यासाठी वेळ काढायला हवा, सतत अभ्यास करायला हवा! आपली नोकरी-ताणतणाव-प्रपंच अशा इतर जबाबदार्‍या यांतून तितका वेळ नाही देता येत.

आपल्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराला शेअरबाजारातील उलाढालीचा लाभ, तोही कमीतकमी जोखमीत घेता यावा, ह्याकरिता म्युच्युअल फंड हे उपयुक्त साधन मानले जाते. कारण असे फंड हे आपल्याकडील पैसे अनेकप्रकारे गुंतवतात आणि त्याद्वारे अधिक नफा कमावतात. परत तोच आपल्याला आपण विकत घेतलेल्या युनिटच्या प्रमाणात ‘लाभांश’ स्वरुपात देतात. आणि हे काम अंदाजपंचे किंवा सांगोवांगी पद्धतीने नाही चालत,तर त्यासाठी गुंतवणूकशास्त्र, अनेक बाजार-विविध साधने आणि अर्थव्यवस्थेचा अभ्यास असणारे, अनुभवी व्यावसायिक तज्ज्ञ म्युच्युअल फंड कंपनीकरिता हे काम करत असतात.

कोणी म्हणेल, की म्युच्युअल फंडात जोखीम अजिबातच नसते का ?

तर उत्तर आहे – हो असते. कारण जोखीम ही पदोपदी आपल्या जगण्यातही असते! तशीच कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीत ही असतेच ! मात्र प्रमाण हे कमी-जास्त प्रमाणात असू शकते. आपण एक व्यक्ती म्हणून आपली जोखीम घेण्याची परिस्थिती मर्यादित असू शकते. मात्र असंख्य गुंतवणूकदार जेव्हा आपले पैसे एकत्रितपणे गुंतवतात, तेव्हा ‘जोखीम’’ही त्या प्रमाणात विभागली जाते. शिवाय त्याबाबतचा निर्णय हा अभ्यास करून घेतला जातो. अमुक कंपनीचे शेअर्स घेताना किती प्रमाणात घेतले जावेत, ह्याचे काही निकष असतात. कंपनी आणि तिचा उद्योग-व्यवसाय यांची कामगिरी ह्याकडे लक्ष असते. कुठे धोका किंवा तशी शक्यता दिसल्यास विक्री करून बाहेर येण्याचीदेखील सोय असते. अधिकृत आकडेवारी पाहून असे निर्णय घेतले जातात. आणि ह्याकरीता जी तज्ज्ञ-मंडळी असतात त्यांना ‘फंड-मॅनेजर’ म्हटले जाते, त्यांच्यावर चुकीबाबत कारवाई होऊ शकते.
आपण एकट्याने शेअर्स घेणे-विकणे अधिक जोखमीचे असू शकते. त्यामानाने आपल्याप्रमाणे अनेकजण म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात, तेव्हा अमुक कंपनीत किती प्रमाणात गुंतवणूक करावी? हे त्या कंपनीची कामगिरी आणि अन्य व्यावसायिक बाबींवर ठरत असते. अशा अनेक कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवले जातात आणि आपण फक्त त्या म्युच्युअल फंड कंपनीचे काही युनिट्स घेत असतो. म्हणजेच आपली जोखीम ही तितकीच मर्यादित असते! यात ‘सेबी’सारखी नियामक संस्था म्युच्युअल फंडाकडे जागरुकतेने लक्ष देत असते, त्याबद्दल माहिती आपण वेळोवेळी घेणार आहोतच.

म्म्युच्युअल फंडात कोण पैसे गुंतवू शकतो?

तसे पाहिले तर जे कोणी बँक्स – पोस्ट ऑफिस किंवा तशा अनेक बचत-योजनांमध्ये आपले पैसे गुंतवतात, त्या व्यक्ती आणि संस्था म्युच्युअल फंडात आपले पैसे सहजपणे गुंतवू शकतात.

उदाहरणार्थ – तुम्ही-आम्ही म्हणजे सज्ञान व्यक्ती आपले पैसे कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवू शकतो.

खालील व्यक्ती / संस्था म्युच्युअल फंड गुंतवणूकदार होऊ शकतात. अर्थात, त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात . के.वाय.सी.असते का? हेही आपण समजून घेणार आहोत.

व्यक्ती आणि मुलांच्या नावेदेखील पैसे गुंतवता येतात, हिंदू अविभक्त कुटुंब (एच.यु.एफ), व्यावसायिक, व्यक्तिगत स्वरूपाचे बिझनेस करणारे – प्रोप्रायटर, तसेच पार्टनरशिप-भागीदारीत व्यवसाय करणारे, शिवाय अनिवासी भारतीय आपले पैसे फंडात ठेवू शकतात. सरकारी तसेच खाजगी कंपनी, धर्मादाय चॅरिटेबल ट्रस्ट, संघटना-संस्था आणि को-ऑपरेटिव्ह सोसायटीदेखील ह्याप्रकारच्या युनिट्समध्ये गुंतवू शकते. पुढील भागात आपण कधी व कसे गुंतवावे हे पाहणार आहोत.

– राजीव जोशी
(लेखक बँकिंग व अर्थ अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -