घरफिचर्सधर्मचिकित्सेतून स्त्री मनाचा ठाव

धर्मचिकित्सेतून स्त्री मनाचा ठाव

Subscribe

अविचाराने, कर्मठपणाने आणि स्वार्थ भावनेने इस्लामचे झेंडे उंचावणार्‍यांसाठी ‘झैनब’ म्हणजे एक चपराक आहे. झैनब ही निव्वळ पाकिस्तानी नव्हे, निव्वळ एक मुस्लीमही नव्हे. ती एक स्त्री आहे. धर्म-कर्माच्या नावाने स्त्रियांच्या जगण्याची चौकट आखून देणार्‍या सगळ्याच कर्मठांसाठी झैनब हे एक जळजळीत अंजन आहे. इस्लाम, धर्मग्रंथ आणि सुवचनांचा अन्वयार्थ लावत स्त्रीमनाचा, जाणीवांचा, बदलत्या सामाजिक परिस्थितीचा धाडसीपणाने वेध घेणार्‍या ‘बोल’ या चित्रपटाची झैनब ही नायिका आहे.

घराला कुलदीपक हवा ही वृत्ती आणि यातून वाढत जाणारी लोकसंख्या या प्रश्नाला हात घालणारा ‘बोल’ हा पाकिस्तानी चित्रपट मध्यंतरी पाहण्यात आला. काम करणारे हात आणि खाणारी तोंडे यांचे गुणोत्तर योग्य नसले की सगळ्या कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाचीच वाताहात होत जाते. यात बळी ठरत असते ती स्त्री. पाकिस्तानी स्त्रीयांच्या बदलत्या व्यक्तित्वाचा आणि वास्तव बदलांचा वेध ‘बोल’ हा चित्रपट घेतो. दोन वर्षांपूर्वी दहशतवाद विषय घेऊन ‘खुदा के लिए’ हा चित्रपट घेऊन पाकिस्तानी दिग्दर्शक शोएब मन्सूर आला होता. खूदा के लिए चित्रपटाने पाकिस्तानमध्ये वादळ उठविले होते. त्यानंतर मन्सूर वेगळ्या वळणाने जाणारा ‘बोल’ हा आणखी एक चित्रपट घेऊन आला आहे.

- Advertisement -

आई-वडील, सहा सात बहिणी आणि एक भाऊ या कुटुंबाची ही कथा. कर्मठ वडिलांपुढे कायमच नमलेली आई, ‘पुरुष’ नसलेला भाऊ आणि वडिलांची दहशत अनुभवणार्‍या बहिणींमध्ये थोरली असणारी झैनब ही चित्रपटाची नायिका आहे. एकट्या कमवत्या वडिलांमुळे घरात खाण्या-पिण्याची आबाळ आहे. वडिलांचा हकीमीचा व्यवसाय मंदावला आहे. धर्मांधपणामुळे घरचा विकास खोळंबला आहे आणि वैयक्तिक प्रगती खुंटलेल्या घरात झैनब नावाचे एक वादळ आहे. जुजबी शिक्षण झालेली आणि घरची वेसही न ओलांडलेली झैनब म्हटली तर चारचौघींसारखी. सर्व सामान्य. दारबंद घरात रिकामटेकडं आयुष्य कंठणारी. (जगणारी नव्हे) पण तरीही झैनब सामान्य नाहीये कारण तिला प्रश्न पडतात. बुद्धिनिष्ठ प्रश्नांनी ती हैराण आहे. तिच्या प्रश्नांचे स्खलन चप्पला बुटांनी नव्हे तर बुद्धीने, विचाराने व्हावं इतकी माफक अपेक्षा आहे.

चित्रपटाच्या मुख्य विषयाबरोबर झैनबच्या माध्यमातून धर्मचिकित्सेचा येणारा वेगळा आयाम म्हणूनच भावतो. चित्रपटाची सुरुवातच पित्याचा खून करुन फाशीच्या तख्तावर उभ्या असलेल्या झैनबपासून (हुमाइमा मलीक ) होते. दयेचा अर्ज नामंजूर झाल्यावर आपली व्यथा प्रसारमाध्यमांपुढे सांगण्याची संधी मिळावी या तिच्या शेवटच्या इच्छेने कथा फ्लॅशबॅकमधून पुढे सरकते. चित्रपटाचा नायक अर्थातच झैनबचे धर्मांध पिता हकीम साहेब (मंझर) आहेत. पाकिस्तानातच नव्हे तर भारताच्याही गल्ली बोळात आढळणार्‍या वंशाचा दिवा हा प्रश्न मुख्य कथेचा भाग असला तरी संपूर्ण चित्रपटभर ‘बॅकड्राप’सारखी असणारी धर्ममूल्याची चिकित्साही महत्त्वाची बाब वाटते. धार्मिक संकुचित प्रवृत्तीच्या विचारांना तार्किक पद्धतीनेच उत्तर देण्याच्या प्रयत्न चित्रपटातून झाला आहे.

- Advertisement -

जगण्याला धर्माची चौकट घालताना किंवा धर्माच्या चौकटीत जगणं बसवताना ‘धर्म’ ही संकपना योग्यरित्या उमगली नाही तर त्याचा सामाजिक भूमिकेवर होणारा परिणाम खूप विचित्र असतो. डोकं असतानाही पारंपरिकरित्या धर्म जसाचा तसा स्वीकारणे ही खूप मोठी अडचण असते. बुद्धीला पटत नसताना आणि केवळ धर्म म्हणतोय म्हणून वागायचा प्रयत्न केला की केवळ संभ्रमच निर्माण होत राहतो. चित्रपटात मुख्य विषयाला इस्लाम धर्माचे अधिष्ठान आहे. त्यामुळेच डोक बाजूला ठेवू न शकणार्‍या झैनबला पडणारे प्रश्न हे तिच्यासह आपल्याला अस्वस्थ करतात. धर्माला बुद्धिप्रामाण्याची जोड असावी लागते. विचार न कळताच अंधानुकरण करणे हे अविवेकी आहे, हे चित्रपटाच्या कानाकोपर्‍यातून झळकते. धर्म आणि कर्माची तार्किक सुसंगती घालून प्रवाहाबरोबर येणे, विज्ञानाचा, आधुनिकतेचा स्वीकार करणे ही आता काळाची गरज आहे हे चित्रपटाच्या कानाकोपर्‍यातून झळकत राहते.

मग झैनबचा ‘खुदा’ वेगळा आहे का?
प्रत्येक गोष्टीसाठी ‘अल्लाह’ला जबाबदार धरण्याच्या वडिलांच्या वृत्तीची झैनबला चीड येते. झैनबचे पिता हकीम साहेबांना घरात त्यांच्यानंतर ‘कर्ता’ कोणीतरी ‘पुरुष’ हवाय. यासाठी मुलींनंतर मुली होत आहेत. घरात सैफी नावाचा मुलगा जन्म घेतो खरा पण तो ‘पुरुष’ होणार नाहीये. ‘अल्लाह की नेमत’ म्हणून देणारा तो आहे असं मानणार्‍या हकीम साहेबांना ‘असला’ मुलगा मात्र नकोय. पित्याचा रोष ओढावून आईची कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे पाऊल झैनब उचलते. कर्ताकरविता तो आहे, तो जन्माला घालेल तर पोटंही भरेल, कुटुंबनियोजन हे पाप आहे असं उत्तर पित्याकडून मिळते तेव्हा तिला प्रश्न पडतोय, मग का नाही सगळ्यांना वेळ्च्यावेळ जेवण मिळत. कष्ट न घेणार्‍याला अल्लाह तरी कशी मदत करेल असा प्रश्न तिला छळतोय. जीव मारणे गुन्हा आहे तर सांभाळता न येणारे भिकारी जन्माला घालणे गुन्हा का नाही?

घर पुरुषानेच का चालवायचे? मो. पैगंबर यांच्या पत्नी तर स्वत: व्यापार करायच्या, घर सांभाळायच्या मग? स्त्रीला शिक्षणाचा हक्क नाकारण्याचा अधिकार कोणी दिलाय? इस्लाममध्ये तर ज्ञान घेण्याचे महत्त्व ‘इकरा’ या एका शब्दात आहे, जगात येणार्‍यांची तो देखभाल करतो तर मग सैफीचा खून करण्याची मुभा हकीम साहेबांचा कोणता धर्म देतो? लाच देणे, मस्जिदच्या रकमेचा गैरवापर करणे, आपल्या मुलींची इज्जत रहावी, पण हरीमंडीत जाऊन एका नर्तकीच्या मुलीचा पिता होण्याची परवानगी या पुरुषांना कोणत्या धर्माने मिळते, धर्माचे पालन फक्त स्त्रीने करावा हा नियम आहे का? झैनबला प्रश्न पडलेत. मला कळणारा इस्लाम आणि तुमच्या इस्लामध्ये इतकी तफावत का आहे? हमारा खुदा और आपका खुदा अलग है शायद. असं म्हणेपर्यंत धर्म वेगळा का भासतोय या प्रश्नांनी ती वैतागली आहे. धर्ममूल्यांना तावून सुलाखून पाहायचे म्हटले तर ती स्त्री आहे, पण ती सरळ हवी तशी मोडीत काढण्याची मुभा पित्याला पुरुष आहे म्हणून कशी काय मिळू शकते या प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक दिली जावीत, असं तिला वाटतंय. मात्र धर्मांध वडिलांकडे उत्तरे नाहीत. मुस्लीम चौकटींच्या काहीशा रिजिड असणार्‍या या समाजात असे प्रश्न निर्माण होणारी झैनब म्हणूनच खूप आशादायी वाटते.

गमंत म्हणजे, चित्रपटात हकीम साहेब हे मौलवीचेही काम करतात. तथाकथित धर्माच्या जाणकारांमध्ये उठबस करणारे आहेत. धर्म वाकवून घेण्याची मुभा पुरुषांना पण स्त्रीयांना नाही हे आजही सगळीकडे आहे. पुरुष म्हणून समाज त्यांना अशी संधी मिळते आणि स्त्रीला मात्र गप्प केले जाते. झैनबने विशद केलेला इस्लामीतत्वांचा अर्थ हकीम साहेबांना पाप वाटणे, त्यासाठी देवाची माफी मागण्यासाठी मुलीला उसकवतात, मात्र स्वत: धर्म सोडून वागत राहतात. समाजात आपमतलबासाठी धर्माची ग्वाही देणारे असे हकीम साहेब असतातच. आपल्या बुद्धीवादाने, विवेकबुद्धीने धर्माची चिकित्सा झाली पाहिजे हा झैनबचा विचार म्हणूनच पटतो. समाजात अशाच दुटप्पी आणि स्वार्थी जगणार्‍यांचा भरणा आहे.

पाकिस्तानातील, मुस्लीम समाजातील आधुनिक पिढीचा बुद्धिनिष्ठ विचार आणि आचार, धर्मचिकित्सा दाखविण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न कौतुकास्पद वाटतो. परखडपणे धर्ममूल्यांची मांडणी करण्याला जिगर लागते. या नव विचाराने प्रेरित झालेला समाज निश्चितच अंकुरला असणार ही बाब म्हणूनच आल्हाददायी वाटते. सध्याच्या परिस्थितीत असे प्रश्न पडणारे खूपच कमी असतील, पण धर्माच्या संभ्रमातून बाहेर पडणार्‍यांची एकदा का वाढ झाली तर निश्चितच हा चित्रपट खर्‍या अर्थाने यशस्वी ठरला असे म्हणावे लागेल.

-हिनाकौसर खान-पिंजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -