घरफिचर्सआरते ये पण आपडा नको...

आरते ये पण आपडा नको…

Subscribe

श्रद्धा उठली आणि खळ्यात बसलेल्या मला बोलावून, आपडा नको म्हणजे काय रे? असे विचारले. मलादेखील ती नक्की काय म्हणते याचा अर्थबोध होईना. मी नक्की काय झालं ते विचारलं, तेव्हा तिने सविस्तर खुलासा केला. तेव्हा मी तिला सांगितलं, अगं तुला महिन्याची अडचण आहे ना म्हणून तुला त्या सांगत होत्या की, त्यांना स्पर्श करू नकोस. हा प्रसंग आठवला की, मालवणी मुलखातली अस्सल म्हण मला आठवते, Women and menstruation. आजही गावखेड्यात मासिकधर्माच्या दिवसात अशा प्रसंगांना महिला सामोर्‍या जाताना दिसतात.

पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट असावी. नवीन लग्न झालं होतं. माझ्या पत्नीने-श्रद्धाने गावं पूर्वी कधी बघितलं नव्हतं. तिची आयुष्यातील पंचवीस वर्षे मुंबईत गेलेली, आता पहिल्यांदा ती गावी जात होती. जाताना माझ्या आईने सासूच्या नात्याने काही गोष्टी सांगितल्या. आम्ही दोघेही शिक्षण क्षेत्रातील म्हणून दोघांनाही महिनाभर सुट्टी होती, त्यामुळे महिनाभर राहणार या हेतूनेच आम्ही मुंबईहून निघालो. गावी जाऊन दहा-बारा दिवस झाले. एकत्रित कुटुंबातील कोकण बघून ही मुंबईची सून सुखावली. आणि एकदिवस महिन्याची अडचण आली आणि इथे सगळं मुसळ केरात गेलं.

खेड्यातल्या ह्या जुन्या रितीभाती श्रद्धाला माहीत नव्हत्या. पाळीच्या दिवसात बसण्यासाठी तिची स्वतंत्र व्यवस्था केली होती. इथे मुंबईत ह्या रीतीभाती कोण पाळत?. संध्याकाळच्या वेळी आई-काकी अजून दोघी-तिघी खोपीच्या बाजूला बसल्या होत्या. नेहमीच्या सवयीने श्रद्धा त्यांच्या बाजूला उभी राहिली. तेवढ्यात त्यातली एकजण बायगो, भायेरची हस ना मगे हय उबी र्‍हव पण आमका आपडा नुको. श्रद्धाला त्या काय बोलतात हे कळेना. तासभर गजाली करून सगळ्या तिथून उठल्या, सगळ्यांबरोबर श्रद्धा उठली आणि खळ्यात बसलेल्या मला बोलावून आपडा नको म्हणजे काय रे ? मला देखील ती नक्की काय म्हणते याचा अर्थबोध होईना. मी नक्की काय झालं ते विचारले तेव्हा तिने सविस्तर खुलासा केला.तेव्हा मी तिला सांगितलं, अगं तुला महिन्याची अडचण आहे ना म्हणून तुला त्या सांगत होत्या की, त्यांना स्पर्श करू नकोस. हा प्रसंग आठवला की, मालवणी मुलखातली अस्सल म्हण मला आठवते, आरते ये पण आपडा नको. आजही गावखेड्यात मासिकधर्माच्या दिवसात अशा प्रसंगांना महिला सामोर्‍या जाताना दिसतात.

- Advertisement -

वरील म्हणीचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर जवळ यायला हरकत नाही पण स्पर्श करू नको किंवा शिवू नकोस. अशा दिवसात शेताभातात राबायला, तिथे घाम गाळायला परवानगी असते, धुणी घुवायला परवानगी असते. फक्त कोणाला स्पर्श करायची परवानगी नसते. समाजाभिमुख ह्या गोष्टींकडे आपण तसा कानाडोळा करत असतो, पण असे प्रसंग बघितले मला याचा सहसंबंध अशा अनेक गोष्टींशी लावता येतो.

हल्लीच शालांत परीक्षेचे निकाल जाहीर झाले. अनेक निकषाच्या आधारे निकाल जाहीर झाले. व्यवस्थेकडे दुसरा कुठला पर्याय नसल्याने त्यांनी ठराविक निकष तयार केले आणि त्याआधारे मुलांना पुढील वर्गात पाठवण्याची व्यवस्था केली. अर्थात पुढील वर्गात मुलं गेली पण त्यांना अवगत झालेल्या ज्ञानाचे काय?, मुलांच्या टक्केवारीचा फुगा फुल्यासारखा वाटतो पण त्यातुलनेत त्यांनाही सहज गुण मिळाल्याने मला वाटत, अभ्यासाच्या जवळ या पण त्यातील मर्म लक्षात घेतलं नाही तरी चालेल. ह्या गुणवत्तेचा निकष या गुणांवर आधारित असताना ह्या मुलांच्या भवितव्याचे काय हा प्रश्न माझ्या मनात कायम राहतो.

- Advertisement -

कविता किंवा कथा लिहीत असताना समोर एखादी घटना बघितली की, त्याच्यावर भाष्य करणारी कविता किंवा कथा डोक्यात सुरू होते. अगदी एखादा लेखदेखील सहज तयार होतो. त्या घटनेचे पडसाद समाजमाध्यमावर सहज मांडले जात असतात. त्यावर साधक बाधक चर्चा होत असताना अनेकजण दुखावले जातात किंवा अनेकजण सुखावले जातात. अगदी त्या घटनेचा वर वर विचार करून त्यावर कथानक तयार होऊन त्यावर तशा धर्तीचा सिनेमा तयार होतो. पण बिटवीन द लाईन्स ही जी काही गोष्ट असते ती सहजपणे विसरली जाते. एखाद्या व्यक्तीच्या बाबत या कल्पनेचा आधार घेऊन त्याची व्यक्तिचित्रणे त्यामाध्यमातून तयार होत असते पण मूळ गाभ्याला हात घातला असे फारसे कधी होताना दिसत नाही. अशा कविता-कथांना समाजमाध्यमांवर मान्यता मिळते, पण ते लिहिण्याचे समाधान लेखक म्हणून मला मिळत नाही. कारण त्या घटनांना वरवर स्पर्श झालेला असतो, त्यांच्या केंद्रापर्यंत माझे हात पोचलेले नसतात. मनाच्या ह्या संभ्रमाला आपणच जबाबदार नसतो का ? .अशावेळी मला सोहिरोबा आठवतात अशावेळी त्यांनी केलेली सूचना मला वारंवार ठणकावत असते.

संत संगतीने उमज
जाणुनी मनी पुरते समज
अनुभवाविण मान हालवू नको रे ॥

ह्या संत उक्तीप्रमाणे त्या घटनेचा सगळ्या बाजूंनी विचार केल्यानंतर हाती लागेल त्याचा विचार जे लागेल तो कदाचित आपला विचार असू शकेल. मालवणी मुलखातील ह्या म्हणी अनुभवातून किंवा लोकसंग्रहातून तयार झाल्या आहेत. त्यातील खोचकपणा इतका तीव्र आहे की, सौ सोनार की और एक लोहारकी असा आहे. लोकसंग्रहातील कित्येक घटना त्यातून उकलल्या जातात. ह्या रूढी-परंपरा यातील घनत्व फार जटिल आहे. त्यातून लोकसंस्कृती तयार होईल पण त्याचे परिणाम काय असतील याचा विचार आपण करत नसतो. वर्षानुवर्षं चालणार्‍या परंपरा तशाच पुढे चालत ठेवण्यात आम्हीदेखील संस्कृती जपतो या उद्देशाने पुढे हाकत असतो.

गेल्यावर्षी कॉलेजमध्ये मराठीच्या जागेसाठी मुलाखती होत्या. मराठी साहित्यात एम.ए आणि शिक्षणशास्त्र पदवी घेतलेले अनेक उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. पहिली चाचणी झाली. त्यातून काही निवडले गेले त्यांना दुसर्‍या फेरीसाठी निवडले गेले, काही वैयक्तिक प्रश्नावली झाली आणि विषयाशी निगडित प्रशोत्तरे सुरू झाली. मराठीतील काही नवीन कवींची नावे सांगा. गाडी सुरू झाली ती कवी बी, केशवसुत, मग विंदा, बापट आणि पाडगावकर इथे येऊन ती थांबली. पुन्हा प्रश्न नवीन कवींची नावे सांगा ?…तर मग वैभव जोशी आणि संदीप खरे इथपर्यंत गाडी आली. पुढे मग तुम्हाला माहीत असलेल्या किंवा आवडलेल्या लेखकांची नावे सांगा? पुन्हा माडगुळकर, रणजीत देसाई, कोणी आपलं बोट विश्वास पाटील यांच्यापर्यंत नेलं. गेल्यावर्षी एम.ए च्या अभ्यासक्रमात आसाराम लोमटे होते म्हणून कोणी त्यांचे नाव सांगितले, मग त्यांचे आलोक आणि इडा पिडा टळो वाचलं का? तर उत्तरं नाही. विद्यापीठाने अभ्यासक्रमाची एक छोटी पुस्तिका दिली होती. त्यात सगळ्या कथांचा सार आहे, मग कथासंग्रह मिळवून वाचा कशाला? एकूण काय तर खालच्या वर्गापासून ते वरच्या विद्यापीठीय अभ्यासक्रमापर्यंत ही अशी अवस्था आहे. एखाद्या विषयाच्या जवळ जायचे पण त्याला स्पर्श करायचा नाही त्यामुळे आजच्या समाजाची अवस्था ही हत्ती आणि सात आंधळे ह्या गोष्टीप्रमाणे झाली आहे. फक्त फरक इतकाच की, ह्या गोष्टीतील आंधळे हे जन्मांध होते, त्यांना फक्त स्पर्श ज्ञान होत होतं. बाकी रूपाच्या बाबतीत त्यांना ज्ञान नव्हते. आज आम्ही आंधळे नाहीत पण आम्ही ह्या सगळ्या घटनांच्या केंद्राकडे जाण्याच्या प्रक्रियेवर डोळेझाक केली आहोत. त्यातून कुठल्या गुणवत्तेची कास आपण धरणार आहोत कुणास ठाऊक?

मला ह्या गुगलप्रणालीचा आता राग येऊ लागला आहे. कारण कोणत्याही संदर्भासाठी पुस्तक उघडण्याची आज आवश्यकता ठेवली नाही. मला आठवत. एम.एस्सीच्या पहिल्या वर्षाला असताना विद्यापीठाने अभ्यासक्रमाचे एक परिपत्रक तयार करून सगळ्या महाविद्यालयाला दिले होते. तेव्हा एम.एस्सीची क्रमिक पुस्तके कधीच नसायची. विद्यापीठाने दिलेल्या त्या पत्रकातून अभ्यासाचे घटक घ्यायचे आणि त्यासाठी कोणते संदर्भ पुस्तके आहेत त्यातून आपल्याला हव्या असलेल्या पाठाची तयारी करावी लागे. त्यामुळे सगळ्या संदर्भ पुस्तकांची चाळणी व्हायची. आमचे प्राध्यापकदेखील तेव्हा कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसून आमच्या पदरात ते ज्ञान टाकण्यासाठी संदर्भग्रंथ चाळताना दिसत, त्यातून एक अभ्यासूवृत्ती तयार झाली. कोणत्याही घटनेसाठी संदर्भ शोधून तिच्या मुळापर्यंत जाणं जमलं नाही तर किमान मुळाला स्पर्श करण्याची वृत्ती तयार झाली. आज सगळे तयार अर्क नोट्सच्या माध्यमातून इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे मुलांकडे आज डिग्री आहे पण ज्ञान किती हा प्रश्न नेहमीच भेडसावतो. कारण आम्ही जवळ आलो पण स्पर्श करू नका हे आमच्या मनावर इतकं ठासून भरलं की, त्यापासून आता आमची सुटका होणे शक्यच नाही. यातून पुन्हा पुन्हा आठवत राहते, आरते ये पण आपडा नको.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -