घरफिचर्सबाई हरवली आहे

बाई हरवली आहे

Subscribe

केवळ नोकरी करता येत आहे किंवा सो कॉल्ड करिअर करता येतंय हे स्त्री स्वातंत्र्याचं मोजमाप ठरू शकतं का? अगदी जागतिक आकडेवारी जरी बघायची झाली तर उच्चपदस्थ नोकर्‍या करणार्‍या स्त्रियांचं प्रमाण आजही अगदी अत्यल्प आहे. आजही एक स्त्री पॉवरफुल पोसिशन, कामाच्या ठिकाणचा हाय एन्ड स्ट्रेस पेलू शकते का? असे प्रश्न कंपनीच्या मॅनेजमेंटला पडतातच! अगदी १० ते 5 नोकरी करणार्‍या स्त्रिया आज खर्‍या अर्थाने सबल, इंडिपेन्डन्ट आहेत का हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.

स्त्री म्हणून वेगवेगळ्या भूमिका निभावताना एक बाई रादर व्यक्ती म्हणून ती हरवत जाते, का वर गेल्या काही दिवसांत विचार करत होते. विशेषतः स्त्री एक आई झाल्यावर साधारणपणे चाळीस टक्के बायका काम सोडून मुलांच्या संगोपनासाठी घरी बसतात, असं एका सर्वेक्षणानुसार वाचण्यात आलं आणि विचारचक्र सुरू झालं. बायकांना आई झाल्यानंतर काम करताना, नोकरी करताना आणि करिअर करताना अपराधीपणाची भावना येते.. असं अपराधीपण किती पुरुषांना येत असेल बाप झाल्यावर? म्हणजे मी माझ्या लहान मुलाला घरी सोडून कामावर जाताना बापाला वाईट वाटू शकतं पण जसं आईला आत्यंतिक गिल्ट येते, आपण चांगली आई नाही आहोत अशी बोचणी लागते. तशी बोचणी बापाला लागत असेल का? याउलट मुलं झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी मी जास्त काम करून कसा समर्थपणे पेलू शकतो याचं समाधान असं कित्येक पुरुषांना वाटत असतं. खरं पाहता ती बाई सुद्धा काम करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लावतच असते. पण काम करून बाळाकडे आपण दुर्लक्ष्य करत आहोत याची बोच त्या बाईला जास्त वाटते.

आजची स्त्री एका विचित्र कात्रीत अडकली आहे, असं एकूण सभोवताली डोळसपणे पाहिल्यावर वाटतं. तिचं शिक्षण बर्‍यापैकी असतं. ती नोकरी करते. घराला आर्थिक हातभार लावते. घरातलं काम सुद्धा नवर्‍यापेक्षा जास्तच करते आणि वर मुलं झाल्यानंतर तर आई हे पर्मनंट लेबल तिच्यावर लागल्या गेलं की ती अधिकच दबत जाते घर, नोकरी आणि मुलांमध्ये… एक तर करिअर करणं आणि नोकरी करणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात. बाईचं म्हणायचं झालं तर बहुतांश बायका नोकरी करतात आणि आपापल्या कुवतीनुसार त्यात पुढे जातात. ज्या बायकांना करिअर करायचं असतं त्यांना पहिली प्रायोरिटी आपल्या कामाला दयावी लागते जे कित्येक बायकांना शक्य होत नाही.उदाहरण घ्यायचं झाल्यास पेप्सिकोच्या पहिल्या महिला सीईओ इंदिरा नुई. गेल्या आठवड्यात चोवीस वर्ष पेप्सिको ह्या कंपनीमध्ये काम करणार्‍या आणि या कंपनीच्या गेल्या ४४ वर्षांच्या इतिहासात पहिली महिला सीईओ म्हणून काम करणार्‍या इंदिरा नुई वयाच्या ६२ व्या वर्षी हे पद सोडत आहेत.

- Advertisement -

भारतात जन्मलेल्या नुई यांचा आयआयएम कलकत्ता ते फॉरचून ५०० मधल्या एका मल्टिनॅशनल कंपनीच्या सीईओ पर्यंतचा हा प्रवास नक्कीच विलक्षण ! २०१४ साली त्यांना सीईओ केलं गेलं. एरवी उशिरापर्यंत काम करणार्‍या इंदिरा त्या दिवशीही आनंदाची बातमी घरी सांगावी म्हणून लवकर म्हणजे रात्री दहा वाजता घरी आल्या. दारातच त्यांची आई त्यांना दिसली. त्या आईला म्हणाल्या ‘आई तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे’. आई म्हणाली ‘थांब, घरातलं दूध संपलं आहे. ते घेऊन ये. मी काम करणार्‍या बाईला सांगायचं विसरले’. यावर इंदिरा म्हणाल्या ‘माझा नवरा घरी आहे. त्याला सांगू शकली असतीस’ यावर ‘तो थकला आहे असं उत्तर त्यांच्या आईने दिलं’. त्यांनी दूध आणलं आणि चिडून आईला म्हणाल्या की मला बनवलं सीईओ गेलं आणि तू मला दूध आणायला सांगतेस? त्यावर त्यांची आई त्यांना म्हणाली की ‘तू असशील सीइओ एका मोठ्या कंपनीची पण घरात पाय ठेवल्यावर तू फक्त एक बायको आणि आई आहेस हे लक्षात ठेव’! एका इंटरव्यूमध्ये नुई सांगतात की ‘मी आई म्हणून कशी आहे ह्याची इन्सिक्युरिटी मला कित्येक वर्ष होती. मी माझ्या मुलींच्या शाळेतील बुधवारी सकाळी असलेल्या मीट अप्स ना जाऊ शकायचे नाही आणि त्यामुळे मला प्रचंड अपराधी वाटायचं. बायकांना चांगली आई होणं आणि करिअर करणं असं दोन्हीही करता येणं अवघड आहे’.

जर एवढ्या हुशार,इंडिपेन्डन्ट स्त्रीला असं वाटत असेल तर आज आपण स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र आहे अशा गप्पा करतो त्या कितपत खर्‍या आहेत? केवळ नोकरी करता येत आहे किंवा सो कॉल्ड करिअर करता येतंय हे स्त्री स्वातंत्र्याचं मोजमाप ठरू शकतं का? अगदी जागतिक आकडेवारी जरी बघायची झाली तर उच्चपदस्थ नोकर्‍या करणार्‍या स्त्रियांचं प्रमाण आजही अगदी अत्यल्प आहे. आजही एक स्त्री पॉवरफुल पोसिशन, कामाच्या ठिकाणचा हाय एन्ड स्ट्रेस पेलू शकते का? असे प्रश्न कंपनीच्या मॅनेजमेंटला पडतातच! अगदी १० ते 5 नोकरी करणार्‍या स्त्रिया आज खर्‍या अर्थाने सबल, इंडिपेन्डन्ट आहेत का हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया यांनी १० मेट्रो सिटीज मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार २५ ते ३० टक्क्यांच्या वर बायका पहिलं मूल झालं की नोकरी सोडून देतात. यामध्ये उच्चशिक्षित महिलांचं नोकरी सोडण्याचं प्रमाण जास्त आहे.हे सगळं पाहिलं की वाटायला लागतं की स्त्रीने नक्की जगावं कसं? तिची बुद्धिमत्ता, हुशारी ती केवळ एक आई आहे म्हणून जर दबून जात असेल तर ते किती रास्त आहे? हुशार असून स्वतःहून मागे राहणार्‍या आणि घर आणि मुलांसाठी आपल्या करिअरवर स्वखुशीने पाणी सोडणार्‍या स्त्रियांचं प्रमाण फार कमी आहेत. आजही कित्येक आया नाखुशीने घरी राहतात कारण पूर्णवेळ गृहिणी असणं आणि मुलांचं संगोपन करणं ही आजही फार गौण काम मानलं जातं.

- Advertisement -

कारण ह्या कामाचे पैसे मिळत नाहीत. बाईची संसारातील जागा ही जर तिने मिळवलेल्या पैशाने तोलली जाणार असेल तर मग पुरुषाप्रमाणे तिला सुद्धा निर्धास्तपणे कामाला जाता येणं गरजेचं आहे. ऑफिसमधून चारदा घरी फोन करणे, काम संपल्यावर जिवाच्या आकांताने घराकडे धाव घेणे, येताना किराणा, भाजीची लिस्ट आठवून सामान घेऊन येणे, कामाला बाई असेल तर ठीक नाहीतर आल्यावर स्वयंपाक करणे, मुलांचा अभ्यास घेणे आणि अशा शेकडो गोष्टी कळत नकळत फक्त आईने कराव्यात अशीच अपेक्षा ठेवली जाते. नोकरी करत असलेल्या बायकांचे नवरे किती प्रमाणात यातले काम वाटून घेतात? आणि जर करत असतील तर मी तुला मदत करतो आहे असा अविर्भाव असतो! ही मदत नव्हे! संसार दोघांचा, मूल दोघांचं, पैसे दोघांचे तर मग जबाबदार्‍या आणि कामं सुद्धा दोघांचीच!

एका नवीन जीवाला जन्म देता येणं ही अविश्वसनीय गोष्ट आहे. त्यामुळे मुलाच्या जन्मानंतर ती दुबळी होऊच शकत नाही. आई होणं ही पायातली बेडी नसून अजून पंख पसरून उडण्यासाठी मिळालेलं बळ आहे ते! कधी, कसा फरक पडणार आहे माहीत नाही. पण सुरूवात स्वतःपासून करायला काय हरकत आहे! एक बाई म्हणून स्वतःच स्वतःचं कंडिशनींग बदलणं गरजेचं आहे. त्या त्या टप्प्यावर जे आपल्यासाठी योग्य वाटतं त्यानुसार निर्णय घेता येणं महत्वाचं. स्वतःच मोल, स्वतःची योग्यता ही दुसर्‍या कोणालाही ठरवू द्यायला नकोय. एक स्त्री आहोत म्हणून हे चालवून घ्यावं लागणारचं, एक आई आहोत म्हणून थोडं धकवून घ्यावं लागणारचं, एक बायको आहोत म्हणून थोडं अ‍ॅड्जस्ट करायला लागणारचं हे आणि असे अनेक निर्बंध जे कधी आपण स्वतःच स्वतःवर लावून घेतो किंवा आपले लोकं, समाज आपल्यावर लावतो ते मोडायला लागणार आहेत. तेव्हा खर्‍या अर्थाने स्त्री सबल बनेल!


-सानिया भालेराव

एक प्रतिक्रिया

  1. सानिया भालेराव कुठलाही अभिनिवेश न आणता लिहितात. आणि तरी ही त्यांच्या लिखाणात त्यांचा अभ्यास, त्यावर त्यांनी केलेला सम्यक विचार आणि त्या विचारांचा ठामपणा, तो नीट मांडण्याचे कौशल्य दिसते. त्यांचा ठामपणा कुठेही आग्रही, उपद्रवी होत नाही. शैली सहज आणि भाषा प्रवाही आहे. या लेखिकेने जास्तीतजास्त लिहावे. सानिया भालेराव यांना शुभेच्छा.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -