घरफिचर्सकरोनाला रोखण्यासाठी महिलांची पायपीट !

करोनाला रोखण्यासाठी महिलांची पायपीट !

Subscribe

करोनाला रोखण्यासाठी घरात सगळ्यांनी हात धुवायचे म्हणजे पाण्याचा साठा वाढवायला हवा. सध्या सुरु असलेल्या महिन्यात म्हणजे उन्हाळ्यात पाण्याचे साठे, विहिरी आटतात आणि पाण्यासाठी आणखीच पायपीट करावी लागते. आणि ही पायपीट मात्र बायका आणि जास्त करून घरातल्या किशोरवयीन मुलींचीच होते. म्हणजे आता या प्रतिबंधात्मक स्वच्छतेच्या सवयींनी मुलींना पाण्याचा चार खेपा जास्त कराव्या लागणार. उन्हातान्हात पाणी वाहताना त्यांच्या सुरक्षेचा आणि त्यामुळे होणार्‍या शारीरिक त्रासाचा प्रश्न तर करोनाच्या दहशतीत असाच विरून जाणार.

जगभरात ‘करोना’ नावाच्या विषाणूची मोठी दहशत पसरली आहे. या विषाणूने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आणि अनेकांच्या शरीरात जाऊन वास्तव्य केलंय. कोरोनावर अजून कुठलेही औषध सापडलं नाही. पण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्याची काळजी आपण सारे घेतो आहोत. वारंवार हात धुवून स्वच्छता कशी राखायची, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न करायचे असे अनेक विषय आता आपल्या रोजच्या गप्पांमधले होत आहेत.

वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्याचा विषय नको तितका दुर्लक्षित राहिलेल्या आपल्या देशात सध्याचे हे कोरोनामय वातावरण मात्र सर्वांना सुदृढ आरोग्याचा पुन्हा पुन्हा साक्षात्कार करून देतंय. करोनाच्या भीतीमुळे का असेना पण समाज म्हणून आपल्याला आरोग्यदायक सवयी लागत आहेत, हेही नसे थोडके! पण सार्वजनिक आरोग्याचा हा विषय इतका साधा आणि सरळ नाही. भारतात सार्वजनिक आरोग्याच्या सुविधांची गरज, उपलब्ध सुविधा, आणि त्यांचा दर्जा हे सारे विषय अनेक फळ्यांमध्ये विभागले जातात आणि त्यानुसार ते बदलतातही. मग त्या फळ्या शहरी आणि ग्रामीण असतात, श्रीमंत आणि गरीब असतात किंवा पुरुष आणि स्त्रिया अशाही असतात. स्त्रियांचे आरोग्य हा अनेक कारणांमुळे खूप आधीपासूनच दुर्लक्षित राहिलेला विषय. स्त्रियांचे, आणि त्यातही त्या गरीब आणि ग्रामीण भागातील स्त्रिया असतील तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न हा कुठल्याच आणि कुणाच्याच प्राधान्यक्रमावर नसतो.

- Advertisement -

गावात आरोग्याच्या सेवा पुरवण्यासाठी कागदावर दिसेल इतकी सक्षम यंत्रणा असली तरी ती बायकांसाठी परिणामकारक ठरते असं नाही. तिथे बर्‍याचदा पुरुष डॉक्टर असतात आणि त्यामुळे बायका आपले प्रश्न घेऊन तिथे जात नाहीत. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे बायका आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, तक्रारी सांगायला संकोचतात. घरात असेल किंवा आरोग्याच्या यंत्रणांमध्ये सुद्धा जास्त काळजी घेतली जाते ती गर्भवती महिलांच्या आरोग्याची. पण किशोरवयीन मुली, मध्यमवयातील बायका आणि विशेषत: विधवा आणि परित्यक्ता स्त्रिया यात फारशा नसतात.

ग्रामीण भागात काम करतानाचा माझा अनुभव आहे की, जवळजवळ सर्वच बायका आणि मुली लोहाच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिक असतात. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये नेहमीच घरात मुलगा आणि मुलगी असतील मुलाला सकस आणि जास्त अन्न, मुलीला मात्र कमी किंवा मोठ्या कुटुंबांमध्ये घरातील सगळ्या पुरुषांची जेवणं झाल्यानंतर घरातील बायकांनी जेवायचे दंडक त्यांना पुरेशा आणि पोषक आहारापासून लांब ठेवतात. पण बायकांचं अ‍ॅनिमिक असणं, कुपोषित असणं हे इतकं सामान्य मानलं जातं की, त्याकडे विशेष लक्ष देण्याची फारशी गरजही कुणाला वाटत नाही.

- Advertisement -

करोनाच्या काळात फक्त करोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून काळजी घेणं हे वेगळं, पण महिलांच्या आरोग्याकडे आपल्याला त्यापलीकडेही जाऊन बघावं लागेल. आधीच मुलीचं अ‍ॅनिमिक असणं, त्यात तिचं कमी वयात लग्न होणं आणि लग्नाच्या वर्षभरातच तिचं गरोदर होणं ही एक सामान्य आणि रोजची घटना मानली जाते. लवकर झालेल्या गरोदरपणामुळे मृत्यू होण्याच्या केसेससुद्धा गावात सर्रास घडतात आणि भरीस भर म्हणजे असं अशक्त असणं हा या मुलींचाच गुन्हा मानला जातो.

मुली आणि बायकांच्या आरोग्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे मासिक पाळीचे आरोग्य. गावांमध्ये मुलींना जिथे मासिक पाळी म्हणजे नेमकं काय? ती का येते आणि मासिक पाळी येणं ही आपली चूक नसते हेच माहीत नसतं अशा ठिकाणी मासिक पाळीच्या काळात उद्भवणार्‍या समस्यांकडे बघण्याचा आणि त्यावर इलाज करण्याचा दृष्टीकोन असणं म्हणजे अवघडच. आम्ही संशोधन केलेल्या गावांमध्ये 80 टक्के मुली मासिक पाळीच्या समस्येविषयी कुणाशीच बोलत नाहीत. आणि पाळीच्या काळात उद्भवणार्‍या समस्यांसाठी डॉक्टरकडे न जाता बाबा-बुवा, भगताकडे जातात. एकतर आरोग्याकडे दुर्लक्ष करणं नाहीतर असे उपाय करणं या दोन्ही मार्गांनी या बायका आणि मुली अनारोग्याला आमंत्रणच देत असतात.

महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी गावागावात काम करणार्‍या ‘आशा’ आहेत. यामुळे काहीसा फरक पडत असला तरी आपल्या संस्कृतीने बिंबवलेल्या समजामुळे बाईने आपल्यातल्या ‘अंगभूत!?’ सहनशिलतेचा वापर करून आजारपण सहन करायचं आणि अगदीच वेळ हाताबाहेर गेल्यानंतर ते कुणालातरी सांगायचं हे गावातल्या बायकांच्या डोक्यात पक्कं बसलेलं असतं. मग जिथे आपले शरीर सुदृढ नाही हे स्वीकारणेच अवघड असते तिथे आरोग्याच्या सेवांचंही कुंपण ठरतं.

आणखी यानिमित्ताने एक महत्वाचा मुद्दा चर्चेत येतो, तो म्हणजे सतत हात धुण्याने करोनापासून बचाव करता येतो. सतत हात धुणे हे शहरात राहणार्‍या आणि घरातल्या नळाला फिरवू तेव्हा पाणी उपलब्ध होऊ शकणार्‍या लोकांसाठी खूप साधे आहे. पण गावात जिथे पाण्याच्या एकेका हंड्यासाठी सरासरी 3-4 किमी पायी जावं लागतं तिथे मात्र हा प्रतिबंधात्मक उपाय आणखीच कशाकशाला अधोरेखित करणारा ठरतो. म्हणजे घरात सगळ्यांनी हात धुवायचे म्हणजे पाण्याचा साठा वाढवायला हवा. सध्या सुरु असलेल्या महिन्यात म्हणजे उन्हाळ्यात पाण्याचे साठे, विहिरी आटतात आणि पाण्यासाठी आणखीच पायपीट करावी लागते. आणि ही पायपीट मात्र बायका आणि जास्त करून घरातल्या किशोरवयीन मुलींचीच होते. म्हणजे आता या प्रतिबंधात्मक स्वच्छतेच्या सवयींनी मुलींना पाण्याचा चार खेपा जास्त कराव्या लागणार. उन्हातान्हात पाणी वाहताना त्यांच्या सुरक्षेचा आणि त्यामुळे होणार्‍या शारीरिक त्रासाचा प्रश्न तर करोनाच्या दहशतीत असाच विरून जाणार.

महिलांच्या आरोग्याबाबत ‘शांततेची संस्कृती’ असणार्‍या या काळात आपण राहतो आहोत. पण याच काळात आपण सार्वजनिक आरोग्याबद्दल अधिक जागरूक आणि सतर्क होतो आहोत. या सगळ्या संकटाच्या काळात आपलं लक्ष या मुद्याकडे वेधण्याचा मानस हाच की, आरोग्याबद्दल सजग होण्याची आता गरज आहे आणि तसे करता येईल अशी संधीसुद्धा आहे. मग सार्वजनिक आरोग्य म्हणताना आपण त्याला जास्तीत जास्त समावेशक करून त्यात सार्‍यांना कसे घेता येईल हे पाहायला हवं म्हणून हा प्रपंच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -