जागतिक दहशतवादविरोधी दिन

दहशतवादाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. त्यामुळे हा प्रश्न कोणत्याही एका देशाचा नाही. दहशतवाद जगात सर्वत्र वेगाने पसरत आहे. त्यामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. मे 1991 मध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू राज्यातील श्रीपेरंबुदुर येथे सभेला संबोधित करत असताना दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. या दिवसांचे औचित्य साधून 21 मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. 21 मे या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी असते.

हाच दिवस दहशतवादविरोधी दिवस म्हणून संपूर्ण देशात पाळला जातो. या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी सन 1984 ते सन 1989 पर्यंत काम पाहिले. संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी व अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचवावा, तसेच देशासाठी दहशतवादाविरोधात लढणार्‍या हजारो सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करणे, भावी पिढीला मूलगामी प्रभावापासून वाचविणे, त्यांच्या मनामध्ये देशाच्या प्रगतीसाठी, संरक्षणासाठी जागरुकता निर्माण करणे, हादेखील या दिवसाचा उद्देश आहे.

आजच्या स्थितीला संपूर्ण जगात ज्या-ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यापैकी सर्वात मोठी आणि अवघड समस्या म्हणजे दहशतवाद व हिंसाचार आहे. या दहशतवादामुळेच संपूर्ण जगाची शांतता भंग पावली आहे. फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दहशतवाद या समस्येने देशाची फार मोठी आर्थिक हानी केलेली आहे. दहशतवाद व हिंसाचार याचे मूळ हे धार्मिक महत्त्वाकांक्षेत आहे. आपला धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे. धर्माचा प्रचार व प्रसार व्हावा, हा यामागील सर्वात मोठा हेतू आहे. त्यासाठी अत्यंत विषारी आणि विखारी प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातो म्हणून दहशतवाद निर्माण करणारी देशभर पसरलेली केंद्रे संपवणे व धर्मांधतेला प्रोत्साहन देणार्‍या संस्था, संघटनांची दुकाने बंद करणे आवश्यक आहे.