Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स जागतिक बुद्धिबळ दिन

जागतिक बुद्धिबळ दिन

Related Story

- Advertisement -

‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस 20 जुलै हा ‘जागतिक बुद्धिबळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून बुद्धिबळ खेळला जात आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा जन्म भारतातच झाला होता. चतुरंग हे बुद्धिबळाचेच प्राथमिक रूप. बुद्धिबळ हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हा पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखला जातो. बुद्धिबळ सध्या जगातील सर्वांत प्रसिद्ध बैठ्या खेळांपैकी एक आहे. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये, पत्राने, आंतरजालावर व विविध स्पर्धांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाफ झालेला दिसतो.

स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. १८८६ साली विल्हेल्म स्टेइनिट्झ हा पहिला अधिकृत बुद्धिबळ विश्वविजेता झाला. विश्वनाथन आनंद हा भारतीय खेळाडू २०१२ सालापर्यंत जगज्जेता होता. बुद्धिबळाच्या सांघिक स्पर्धा ‘बुद्धिबळ ऑलिंपियाड’ दर दोन वर्षांतून एकदा भरवल्या जातात. दोन आंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनाले देस इचेक्स (फिडे) आणि इंटरनॅशनल करस्पाँडन्स चेस फेडरेशन या जगातील महत्वाच्या स्पर्धा भरवतात.

- Advertisement -

बुद्धिबळ खेळणार्‍या संगणकाच्या निर्मितीसाठी संगणकतज्ज्ञ पहिल्यापासून प्रयत्नशील होते. त्यामुळेच अलीकडील बुद्धिबळावर संगणकाचा प्रभाव पडलेला दिसतो. १९९७ मध्ये गॅरी कास्पारोव्ह (त्यावेळचा जगज्जेता) आणि आय.बी.एम. कंपनीचा डीप ब्ल्यू संगणक यांच्यातील सामन्यातून सर्वांत बुद्धिमान/कुशल माणसाला बुद्धिबळात हरवणारी संगणक-प्रणाली तयार करता येते हे सिद्ध झाले. जरी अनेक देश बुद्धिबळाच्या शोधाचा दावा करत असले तरी बुद्धिबळ ह्या खेळाची सुरुवात प्रथम भारतात झाली असे सध्यातरी मानले जाते. बुद्धिबळासाठी विविध भाषांत वापरले जाणारे शब्द भारतीय चतुरंग या शब्दापासून तयार झाले आहेत, यावरून हे स्पष्ट होते. चतुरंग म्हणजे ‘सैन्याची चार अंगे’ पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ. तसेच प्राचीन काळात फक्त भारतातच सैन्यांमध्ये घोडे, उंट आणि हत्ती हे तीनही प्राणी वापरले जात होते.

साहित्यामध्ये बुद्धिबळाचा पहिला संदर्भ पूर्व ५०० मध्ये भारतात दिघ निकयमध्ये ब्रह्मजल सुत्त या ग्रंथात आढळतो. पर्शियामधील पहिला संदर्भ ६०० च्या दरम्यान आढळतो; येथे त्याला शतरंज असे म्हटले आहे. सातव्या शतकात मोहर्‍यांचे वर्णन केलेले आढळते. ८०० पर्यंत खेळ चीनमध्ये शिआंकी नावाने पोहचला होता. मुस्लीम जगाने शतरंज पर्शियाच्या विजयानंतर उचलला. मोहोर्‍यांची पर्शियन नावे तशीच राहिली. स्पेनमध्ये त्याला ajedrez ’अजेद्रेझ’, पोर्तुगीजमध्ये xadrez आणि ग्रीकमध्ये zatrikion’ तर बाकीच्या युरोपमध्ये पर्शियन ‘शाह’ शब्दाच्या विविध रूपांनी ओळखले जाऊ लागले. खेळ पश्चिम युरोप आणि रशियामध्ये तीन वेगवेगळ्या मार्गांनी पोहचला. पहिल्यांदा नवव्या शतकात सुरुवात झाली. १००० पर्यंत सर्व युरोपभर पसरला. इबेरियन पठारावर मुर यांनी दहाव्या शतकात या खेळाची ओळख करून दिली.

- Advertisement -