जागतिक नेत्रदान दिन

मृत्यूनंतर नेत्रदान होत असल्याने, आपल्या मृत्यूनंतर अंधाला नेत्रदान करून आपण त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणू शकतो. दृष्टीविकार प्रतिबंधक आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम या पूर्णपणे केंद्र पुरस्कृत कार्यक्रमात अनेक नेत्रपेढ्या आणि फिरती नेत्र पथके यांचा समावेश आहे.

डोळे ही सजीवांना मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. मात्र, काही जण त्यापासून वंचित असतात. जन्मजात आंधळे असणे किंवा अपघाताने अंधत्व येणे यामुळे अशा व्यक्ती सृष्टीच्या सौंदर्याचा लाभ घेऊ शकत नाहीत, मात्र आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या आधारे आपण एका व्यक्तीची दृष्टी दुसर्‍या एका अंध व्यक्तीला देऊन त्याचे जीवन प्रकाशित करू शकतो. नेत्रदानासाठी जगभरातील विविध सामाजिक, रुग्णालयीन संस्था पुढे येत आहेत. १० जून हा ‘जागतिक नेत्रदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात प्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेत्रदान दिनाचे आयोजन करण्यात येते.

मृत्यूनंतर नेत्रदान होत असल्याने, आपल्या मृत्यूनंतर अंधाला नेत्रदान करून आपण त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणू शकतो. दृष्टीविकार प्रतिबंधक आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम या पूर्णपणे केंद्र पुरस्कृत कार्यक्रमात अनेक नेत्रपेढ्या आणि फिरती नेत्र पथके यांचा समावेश आहे. त्यामुळे जनसामान्यात दृष्टीदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्र सरकारसुद्धा प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. राज्यात नऊ लाखांपेक्षा जास्त लोक नेत्रहीन आहेत. राज्यातील अंध व्यक्तींची ही आकडेवारी फारच चिंताजनक आहे. सन १९७९ मध्ये आणि त्यानंतर राज्यात अंधत्व निवारण आणि दृष्टीहिनांच्या मदतीसाठी विविध नेत्रशिबिर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

नेत्रदानाविषयी लोकांमध्ये कमालीचे समज गैरसमज असल्याचे आपण पाहतो. त्यामुळे नेत्रदान, नेत्रपेढी, तिचे कार्य याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. १ वर्षांवरील व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने जिवंतपणी नेत्रदानाची लेखी इच्छा व्यक्त करणे गरजेचे आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६ तासांच्या कालावधीत नेत्रदान होणे गरजेचे आहे. तेव्हा व्यक्तीच्या नातेवाईकांनी तात्काळ नेत्रपेढीत संपर्क साधून नेत्रदानाविषयी कळवले पाहिजे. त्यानंतर दृष्टीहिनांना मागणीनुसार या नेत्रपेढीतून नेत्रदान करण्यात येते. विशेष म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा वापरत असलेल्या व्यक्तीही नेत्रदानास पात्र ठरतात.