घरफिचर्सSumitra Bhave Death: 'भावे' प्रयोग

Sumitra Bhave Death: ‘भावे’ प्रयोग

Subscribe

आपल्या समाजाला, राज्याला, देशाला मानबिंदू ठरतील अशी माणसं दुर्मीळतेने घडतात. सुमित्राताई त्यापैकी एक

प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे गेल्या या बातमीने आजची सकाळ म्लान केली. त्यांच्या जाण्याने एक संचित हरपल्याची भावना आहे. त्या दिग्दर्शिका होत्या, पटकथाकार होत्या, सिनमॅटोग्राफर होत्या, त्या लेखिका होत्या, सामाजिक कार्यकर्त्या होत्या, संशोधक होत्या. एका ज्ञानशाखेत हरवून जायला होतं, सुमित्राताई अनेक ज्ञानशाखांच्या उपासक होत्या. नव्वदीत जन्मलेल्या मंडळींसाठी त्यांच्या चित्रपटांनी सकस खुराक दिला.

चित्रपट म्हणजे हाहाहाहहूँहूँ, अंगविक्षेपी चाळे, जराही हसू न येणारे विनोद, इश्क-प्रेम-मोहब्बतच्या नावाखाली चालणारी छाछुगिरी, उगाचच असलेली गाणी, व्हिलन नामक उग्र प्राणी, त्याचे पंटर, लुटूपुटूच्या मारामाऱ्या, कजाग सासू या रूढ गोष्टींना सुमित्राताईंना छेद दिला. चित्रपट म्हणजे डोकं गहाण ठेवून बघायची गोष्ट हा विचार झुगारून देत चित्रपट म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट असा पाया रचला. चित्रपटाला सामाजिक अभ्यासाची, पायाभूत पातळीवरील कामाची जोड देता येते हे त्यांनी शिकवलं. समाजातल्या अप्रिय गोष्टींवर चित्रपटातून भाष्य करता येतं आणि तसं करताना सत्संगछाप होण्याची आवश्यकता नसते हेही त्यांनी दाखवून दिलं.

- Advertisement -

हिरो-हिरोईन-व्हिलन अशा कल्पनारम्य जगात जगण्यापेक्षा आपल्यासारख्या माणसांच्या गोष्टी त्यांनी तयार केल्या. मेकअपची पुटं चढवून, बेगडी वाटणारे कपडे आणि कोरडे संवाद म्हणणारी माणसं हा ढाचा बदलला. एखाद्या घरात, एखाद्या कचेरीत दैनंदिन व्यवहार सुरू आहे आणि दूरवरून कॅमेरा ते टिपतो आहे इतकं त्यांचं चित्रण अस्सल वाटे. म्हणून त्यांचे चित्रपट आणि त्यातली माणसं सर्वाधिक भावतात. त्यात अभिनिवेश नसे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी अनेकविध आयते सेट उपलब्ध असतात मात्र सुमित्राताईंनी प्रत्यक्ष लोकेशनवर जाऊन शूट करण्यावर भर दिला.

रूढार्थाने त्या दिग्दर्शक होत्या पण चित्रपट निर्मिती प्रक्रियेतल्या सर्व गोष्टी त्या स्वत: करत. वन वुमन आर्मी होत्या. कोट्यवधी रुपये खर्चून टपराट असे खंडीभर चित्रपट निघतात. सुमित्राताईंनी चित्रपटासाठी पोटाला चिमटा काढत आर्थिक भार, तंगी सोसली. पण चित्रपटाच्या दर्जाशी तडजोड केली नाही. त्यांच्या चित्रपटातली प्रत्येक फ्रेम, प्रत्येक संवाद, गाणं असेल तर अर्थपूर्ण असे.

- Advertisement -

माध्यमशाखेच्या विद्यार्थ्यांना चित्रपट रसास्वाद, चित्रपट निर्मितीची अंगं शिकवली जातात. सुमित्राताईंचा प्रत्येक चित्रपट केसस्टडी आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत ओकारी येईपर्यंत हल्ली प्रमोशन सुरू असतं. चित्रपटाच्या बरोबरीने मेकिंग ऑफ बनवून ठेवलेलं असतं. सुमित्राताईंनी त्यांच्या कामातून असंख्य भन्नाट गोष्टी केल्या पण त्याचं विपणन केलं नाही. ‘अस्तु’ या चित्रपटात त्यांनी पुण्यातल्या फुले मंडईत हत्ती आणला. तिथलं कामकाज सुरू असताना हत्ती आणून शूट करणं किती कठीण आहे पण त्यांनी करून दाखवलं. दुसरं कोणी असतं तर त्याचं भांडवल करून शेखी मिरवली असती पण सुमित्राताईंनी मानसिक आरोग्यावर असलेला अस्तू सर्वोत्तम होईल याकडेच लक्ष दिलं. ‘दहावी फ’ इयत्तेतल्या मुलांचं जगणं कसं असतं ते सुमित्राताईंमुळे कळलं. सामाजिक भान असलेला शिक्षक अख्ख्या तुकडीचं जगायला शिकवू शकतो हा धडाही मिळाला.

‘वास्तुपुरुष’ हा चित्रपट मराठीतल्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक आहे. मूल्य जपणारे वडील, गुप्तधनाच्या शोधात असलेला ऐतखाऊ काका, कवीमनाचा दुसरा काका, अनेक वर्ष घरी काम करणारी मंडळी, करारी स्त्री, मोठ्या शहरातून छोट्या गावात येऊन काम करणारी वर्किंग वुमन, जातीची उतरंड, चालीरीती, वाडा या सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्र गुंफल्या. एकापेक्षा एक कलाकारांची भट्टी आणि मातीतली गोष्ट यामुळे हा चित्रपट समृद्ध करतो. ‘देवराई’ चित्रपट आपल्याला अस्वस्थ करतो. स्क्रिझोफेनिया झालेल्या मंडळींचं आयुष्य कसं असतं ते ताकदीने दाखवलंय.

‘एक कप च्या’ हा चित्रपट माहितीच्या अधिकारावर आहे. पण ही डॉक्युमेंटरी नाही. माहितीचा अधिकार सामान्य माणूस कसा उपयोगात आणू शकतो हे दाखवताना जे कोकण टिपलंय ते खिळवून ठेवणारं आहे. गंभीर, आशयधन असा शिक्का बसलेला असताना सुमित्राताईंनी ‘घो मला असला हवा’ हा इतका धमाल चित्रपट केला. कल्ला आहे या चित्रपटात.

‘मोर देखने जंगल में’ नावाचा चित्रपट आहे. आता ब्रँड झालेले कलाकार वयाने लहान असताना त्यांना घेऊन सुमित्राताईंनी हा चित्रपट तयार केला होता. कासव चित्रपटातही मानसिक आरोग्य केंद्रस्थानी आहे. यात जे कोकण दिसलंय ते भारीच आहे. दोघी, बाधा, संहिता किती नावं घ्यावीत. प्रत्येक चित्रपटाने पोतडीत भर टाकली, माणूस म्हणून जगण्याला बळ दिलं. त्यांचं नाव दिसलं की हातातलं काम थांबवावं, कलाकृती पाहावी आणि मग उरलेलं काम मार्गी लावावं असा शिरस्ता. त्यांच्या चित्रपटांची झिंग चढली की अनेक समकालीन गोष्टी बालिश, हास्यास्पद वाटू लागतात.

सुमित्राताईंचे चित्रपट पाहू लागल्यानंतर आपण नकळतपणे प्रगल्भ होत जातो. सपक काही समोर आलं की प्रश्न विचारू लागतो- खरंच हे पाहण्याच्या लायकीचं आहे का पॉप्युलर कल्चर आहे, पीअर प्रेशर आहे म्हणून आपण बघतोय असे प्रश्न पडू लागतात. त्यांचं काम पाहू लागल्यावर आपण आतापर्यंत अगदीच टाकाऊ गोष्टी पाहत होतो असंही वाटू लागतं. त्यांचा चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वार्थाने वेगळा होता. चित्रपट तयार करण्यासाठी त्या सर्वस्व पणाला लावत पण त्यांचे चित्रपट थिएटरला जेमतेम येत. याची नेहमी खंत वाटे.

चांगलं रुजायला, पसरायला वेळ लागतो हेच खरं. हे काय चित्रपट आहेत का, हे फेस्टिव्हलचे पिक्चर, समांतर-आर्ट वगैरे अशी टीकाही होते. दर वर्षाला शेकड्याने मराठी चित्रपट येतात, जातात. अनेक तर कधी आले ते कळतही नाही पण अमुक विषय समजून घ्यायचा असेल, तत्कालीन विशिष्ट समाजजीवन अनुभवायचं असेल तर त्यांच्या चित्रपटांना पर्याय नाही. असं म्हणतात की मोठी माणसं मागे वारसा सोडून जातात. सुमित्राताईंनी स्वत: प्रचंड काम केलं. ते काम करताना, चित्रपटाला शैक्षणिक मूल्य आहे, तो अभ्यासाचा विषय आहे, मनोरंजन म्हणजे फक्त प्रेमगीतं नव्हेत याबरहुकूम काम करणाऱ्यांची फळीच तयार केली. त्यांच्या चित्रपटात ठराविक माणसं दिसतात. कथानकं बदलत राहायची, पण या मंडळींचा पट बदलला नाही. त्यांनी दिलेल्या विचारांची कास पकडून आज अनेक युवा कलाकार दमदार काम करत आहेत.

तुमचं काम बोललं पाहिजे हा दंडक त्यांच्या प्रत्येक कलाकृतीने कसोशीने जपला आहे. ‘मी माणूस आहे, ज्याला अन्य माणसांविषयी, त्याच्या दैनंदिन आयुष्याविषयी, नातेसंबंधाविषयी, निसर्गाविषयी कुतुहूल आहे’, असं त्यांनी काही महिन्यांपूर्वी लोकसत्तातर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान झाल्यानंतरच्या मुलाखतीत सांगितलं होतं. गोष्ट सांगणं आणि त्यासाठी चित्रपट तयार करणं हे इतक्या सोप्या शब्दात त्यांनी उलगडलं होतं. आपल्या समाजाला, राज्याला, देशाला मानबिंदू ठरतील अशी माणसं दुर्मीळतेने घडतात. सुमित्राताई त्यापैकी एक. त्यांच्या जाण्याने बावनकशी कार्यशीलतेचा ‘भावे प्रयोग’ कायमसाठी स्थिरावला आहे…

लेखक – पराग पाठक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -