घरफिचर्सयेळवस : उत्सव शेतीचा

येळवस : उत्सव शेतीचा

Subscribe

डिसेंबर आणि जानेवारीचे महिने म्हणजे शेत शिवारात खानपानाच्या मेजवानीचे दिवस असतात. याच दिवसांत ‘येळवस’ हा शेतीसंस्कृतीमधील महत्त्वपूर्ण सण येतो. या सणाची लोक आतुरतेने वाट पाहतात. कित्येक महिने आधी या सणाला एकत्र जमण्याचे नियोजन करतात. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी या भागातील, पुणे, मुंबई व इतरत्र नोकरी व शिक्षणासाठी असलेले सर्वजण झाडून येळवस या सणाला आपल्या गावी परततात. &................................

डिसेंबरच्या गुलाबी थंडी बरोबरच शिवारात येरोन्या, बोरं, बिब्बे, चिंचा हा रानमेवा आलेला असतो. तुरीच्या शेंगा भरू लागतात. याच दिवसात संध्याकाळी शेता शेताच्या बांधावरून धूर निघत असल्याचं दिसत राहतं. हा धूर काही शेकोटी केल्याचा नसतो. हा धूर असतो तो तुरीच्या शेंगा भाजत असल्याचं. छोट्याशा मडक्यामध्ये तुरीच्या शेंगा गच्च भरून त्याच्या तोंडाशी पळसाची पाने लववून बंद केलं जातं. मग हे मडके पालथे ठेवून त्यावर जाळ केला जातो. पाच दहा मिनिटात या मडक्यातील शेंगा मस्त उकडून निघतात. काहीजण याच तुरीच्या शेंगात दोन चार हिरव्या मिरच्या टाकतात.

शिजलेल्या शेंगासोबत अधूनमधून मिरची तोंडी लावत शिवारा शिवारात लोकांच्या गप्पा सुरू असतात. या दिवसात गावातील मित्र मंडळी जमून एकत्र असं तुरीच्या शेंगा खाण्याचा कार्यक्रम करतात. डिसेंबर आणि जानेवारीचे महिने म्हणजे शेत शिवारात खानपानाच्या मेजवानीचे दिवस असतात. याच दिवसांत ‘येळवस’ हा शेतीसंस्कृतीमधील महत्त्वपूर्ण सण येतो. या सणाची लोक आतुरतेने वाट पाहतात. कित्येक महिने आधी या सणाला एकत्र जमण्याचे नियोजन करतात. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी या भागातील, पुणे, मुंबई व इतरत्र नोकरी व शिक्षणासाठी असलेले सर्वजण झाडून येळवस या सणाला आपल्या गावी परततात.

- Advertisement -

येळवस हा शेतीचा उत्सव, शेतीमधील आलेल्या नवीन पिकांचा आस्वाद घेण्याचा सन. मार्गशीर्ष महिन्याचा दर्शवेळा अमावास्येचा दिवस येळवस म्हणून साजरा केला जातो. साधारण हा सण डिसेंबरच्या दुसर्‍या किंवा जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात येतो. यालाच गावाकडची लोकं वेळा अमावस्या, येळ अमावस्या किंवा येळवस असे म्हणतात. हा सण मराठवाडा भागातील कर्नाटक व तेलंगण सीमालगत असणार्‍या नांदेड, लातूर, उस्मानाबाद ह्या जिल्ह्यात उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय परभणी, जालना, हिंगोलीच्या काही गावामध्येही काही प्रमाणात साजरा केला जातो.

डिसेंबर व जानेवारी महिन्यात या भागात ज्वारी, गहू, हरबरा, करडई, तूर ही सर्व रब्बीची पिकं शेतीत डोलत असतात. रानात येरोन्या, बोरं, बिब्बे, चिंचाही लागलेल्या असतात. या दिवसात तसे शेतीचे कामही खुपसे नसते. शेतकरी आपल्या शेतीतील उभ्या पिकाकडे बघून त्याचे लाड करीत असतो. डोलणार्‍या व भरलेल्या पिकामुळे त्याच्या चेहर्‍यावर उत्साह आलेला असतो. हा उत्साह साजरा करण्यासाठी यळवस या सणाला आपले जवळचे, लांबचे सर्व मित्र, नातेवाईक यांना तो आपल्या शेतीत आमंत्रित करतो.

- Advertisement -

येळवसाच्या जेवणाची तयारी
येळवस हा थंडीच्या दिवसात येणारा सण. घरातील लहानगे, वयस्क यांना जेवण दिल्यावर आदल्या दिवशी रात्री महिला या सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करीत असतात. तुरीच्या शेंगा सोलून ठेवणे, हरभर्‍याच्या ढाळीतून दाणे काढून ठेवणे, कुठूनतरी मिळवलेली कच्ची चिंच असेल तर ती काढून ठेवणं, दुधी भोपळा, वांगी, वेगवेगळ्या प्रकारच्या वालाच्या शेंगा, कच्चे टमाटे या सगळ्या गोष्टी तयार करून ठेवणं. तीळ व शेंगदाणे भाजून घेणे, त्याची बारीक कुट करून ठेवणे. या सर्वांची तयारी करून साधारण बारा एक वाजता झोपलेल्या महिला परत सकाळी तीन चार वाजता उठून स्वयंपाकाला लागतात. हा सण म्हणजे त्यांच्यासाठी व सर्वांसाठीच लगीनघाईच असते. सर्व कार्यक्रमाप्रमाणे यामध्येही महिलांना जास्तीची कामे करावी लागतात.

बहुतेक सर्व स्वयंपाक चुलीवरचाच असतो. दिवाळीला बळीराजाचा जो वाडा बनवला जातो त्यासाठी मुख्यतः शेण वापरलेलं असतं. दुसर्‍या दिवशी हा वाडा मोडून त्याचे पाच शेणाचे गोळे केले जातात. त्यातीलच थोड्या शेणाची दोरी बनवून गुणाकारासारखे चिन्ह बनवून गोळ्यावर वरच्या बाजूला चिकटवले जाते. त्याची पूजा करून ते उन्हात वाळवले जातात. त्यांना ‘बोड्डेम्मा’ असं म्हटलं जातं. येळवसचे जे जेवण बनवतात त्यात बोड्डेम्मांचा गौर्‍यासारखा जळणात वापर केला जातो. बळीराजाच्या वाड्यापासून बनविलेले बोड्डेम्मा, शेतीसंस्कृतीमधील महत्त्वपूर्ण येळवस सणाला जेवण बनविताना वापरतात. ही प्रथा का व कशी रूढ झाली असेल, याचा शोध घेणं आवश्यक आहे.

शेतीमधील येळवस पूजा
रब्बीच्या ज्वारी व हरभरा पिकात एके ठिकाणी एक छोटी खोप उभी केली जाते. खरीप पिकावेळी पेरलेली ज्वारीची किंवा आधीच्या वर्षीच्या ज्वारीच्या पाच पेंढीपासून ही खोप बनविलेली असते. त्या खोपेत चिखल करून शेतीच्या देवीचं घर बनवलं जातं. या देवीला काही भागात लक्ष्म्या म्हणतात. देवीच्या घरात जातं, उतरंड, उखळ, मुसळ, घर-संसारात लागणार्‍या वेगवेळ्या वस्तू, घराला राखणदार असं सर्व बनवलं जातं.

खोपीच्या पुढे थोड्या अंतरावर छोट्या मातीच्या भांड्यात दुधात तांदूळ शिजत ठेवतात. त्याला उत्तु याव व ते उत्तरेकडे जावं असा समज असतो. उत्तरेकडे उत्तु गेलं तर शेत चांगलं पिकेल. घरात सुख येईल, अशी लोकांची समजूत आहे. या दिवशी दूध उतू घालण्यासाठी जो विस्तव बनवलेला असतो तोच विस्तव जपून ठेवून पुढील दोन महिने त्यावर हुरडा भाजला जातो.

खोपीत देवीची पूजा झाल्यावर एकजण द्रोणात पाणी व दुसरा आंबील घेतो. खोपीभोवती एकामागे एकजण फेरी करतात. पुढे असणारा पाणी तर मागे असणारा आंबील घेऊन ज्वारीच्या पानाने ते पिकावर शिंपडतात. पुढे असणारा ‘वलग्या वलग्या’ तर त्यामागील व्यक्ती ‘सालम पलग्या’ असे म्हणत दोन किंवा पाच फेर्‍या घालतात. त्यानंतर सगळे त्या खोपीशेजारी बसून जेवतात. या दिवशी शिवारभर सगळीकडून ‘वलग्या वलग्या’चे आवाज ऐकायला येतात. वलगे वलगे सालम पलगे, याचा अर्थ वांग्याची भाजी आणि पोळी तुम्हाला देतो. तुम्ही आम्हाला चांगली पिकं द्यावीत व आम्हाला समृद्ध करावं, असा काहीसा अर्थ होतो.

येळावस मेजवानी
या सणाची सर्वात मोठी मेजवानी म्हणजे दही व ज्वारीचे पीठ आंबवून केलेलं आंबील. सोबत खमंग भजीची भाजी व भाकर. भजीची भाजी व भाकर खात खात आंबील पिणं यासाठी अनेकजण या सणाची वाट पाहत असतात. याशिवाय ज्वारीचा भात, तांदळाचा भात, तांदळाची खीर, शेंगदाणे किंवा तिळाची पोळी, वरण, इत्यादी पदार्थ बनविले जातात. रायता, लोणचे, काकडी हे सर्व अधिकचे असणारच. शेतीत मोठी माणसे पूजेची तयारी करीत असताना लहान सहान मुलं शेतीभोवती बोरं, बिबे, काकडी, गोळा करीत असतात. मोठे लोकही यावर ताव मारतात. या दिवसापासून आंबील प्यायल्यामुळे पोट मोठं होते असं म्हटलं जातं. पोट जसं मोठं होतं तसं या दिवसापासून रात्र छोटे व दिवस मोठे होण्यास सुरुवात होते. अशा यळवसच्या उत्साहाला ‘आपलं महानगर’च्या वाचकांना आमंत्रण.

रेसिपी :
1. भजीची भाजी
भज्जीच्या भाजीमध्ये वांगी, वाळूक(काकडीचा प्रकार) हरभरे, वाटाणे, ओल्या तुरीच्या सोले, शेंगदाणे, वरण्याच्या शेंगा, गाजर, मेथी, हिरवी चिंच, हरभरा डाळ, गूळ, कोथिंबीर, लसणाची फोडणी इत्यादी, या दिवसात ज्या ज्या गोष्टी शेतीत उपलब्ध असतात त्या एकत्र करून त्यांची भाजी केली जाते. वरील सर्व भाज्या कापून घेऊन लसून, कांदा, जिरे, मोहरी याची फोडणी देतात. वरून कडीपत्ता व कोथिंबीर टाकली जाते. भाजी थोडी वाफवून घेतल्यावर त्यात शिजवलेल्या ओल्या चिंचेला कुस्करून त्याचे पाणी टाकले जाते.

2. आंबील
एक लिटर कोमट पाण्यात दोन तीन वाटी पीठ मिसळून घ्यावे. त्यात एक वाटी दही मिसळावे. ज्यात मिसळले आहे ते पातेले 12 ते 24 तासासाठी ठेऊन द्यावे. (कमी आंबट हवे असेल तर 12 तास, जास्त आंबट हवे असेल तर 24 तास). 12 तासांनंतर पातेल्यातील पीठ खाली बसते व पाणी वर जमा झालेले असते. ते पाणी न हलवता हळूवारपणे दुसर्‍या भांड्यात काढून घ्यावे व गरम करण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आल्यानंतर भिजत ठेवलेले पीठ त्यात टाकावे. पीठ शिजते वेळी पळीने सतत ढवळत राहावे. पिठ शिजत असताना त्यात बारीक ठेचून घेतलेली जिरपूड, लसूण व अद्रक टाकावे. 5 ते 7 मिनिटात आंबील शिजून तयार होईल. शिजलेल्या आंबीलमध्ये चवीनुसार मीठ व थंड पाणी मिसळून पातळ करून प्यावे. एकदा बनविलेली आंबील दोन दिवस टिकू शकते.

-बसवंत विठाबाई बाबाराव : (लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक असून, पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे संस्थेत कार्यरत आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -