घर फिचर्स हो, हे घडू शकते...

हो, हे घडू शकते…

Subscribe

आपल्या देशाच्या लोकसंख्येकडे काही सुशिक्षित रागाने पाहतात तसे न पाहता ती देशाची एक ताकद आहे असे पाहिले तर आपल्या देशाची बलस्थाने लक्षात येतील. आपल्याकडे लोक काम करीत नाहीत असा कायम एक आरोप केला जातो तेच लोक जेव्हा परदेशात जातात तेव्हा कसे लगेच कामाला लागतात. अमेरिकेसारख्या प्रगत देशातील महत्त्वाची पदे, कामे किंवा शास्त्रीय शोध हे भारतीय माणसांनी लावले आहेत. भारतातही हे घडू शकते.

मागच्याच रविवारी नाशिकला सुखरुप पोहोचले. एक महिन्याच्या गंभीर आणि सखोल अभ्यासानंतर घरी आले होते. पहिल्यांदा अशी एक महिना सलग घरच्यांना सोडून राहिल्यामुळे आलेला थकवा आणि तिकडे काय काय छान होते हे सांगण्यात पुढे तीन दिवस मी बोलतच होते. खरं तर कोर्स सुरू असतानाही त्यातले आवडलेले जसा जसा वेळ मिळेल तसेतसे ‘सोशल मीडिया’वरून लिहीत होते. जे जे पाहिले आणि आवडले, वेगळे वाटले किंवा अगदी सेम टू सेम आपल्या देशासारखे होते ते ते सर्व फोटोच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना दाखवत होते.

कोर्समधला पहिला आठवडा बिचकत बिचकत सर्वांच्या ओळखी करण्यात गेला. बिचकत बिचकत मी यासाठी म्हणाले, कारण कोर्ससाठी ज्या ज्या देशातून कार्यकर्त्या आलेल्या होत्या ते देश त्यांच्या त्यांच्या देशात सतत एकमेकाविरुद्ध बोलत असतात. त्यांच्या त्यांच्या देशात काहीही वाईट झालं, काहीही कमी पडलं की, शेजारच्या आपल्या दुश्मन देशाच्या चालीमुळे झालं असं म्हणण्याची जणू आपल्या सर्व आशिया खंडातल्या लोकांना सरावच असावा. आपण नाही का काहीही झालं की, ते पाकिस्तानमुळे झालं असं म्हणतो. तिथे कोर्सला गेल्यावर दिवसभराची सविस्तर अभ्यासपूर्ण सत्र झाल्यानंतर रात्री जेव्हा गप्पा मारायला बसायला लागलो तेव्हा समजले की त्यांच्याकडेही ते एखादं काम आपल्या देशात का झालं नाही याचा शोध घेण्याऐवजी पटकन शेजारच्या देशाला दुश्मन मानून त्याचे खापर त्या देशाच्या नावाने फोडून मोकळे होतात.

- Advertisement -

हळूहळू आमच्या असे लक्षात आले की, प्रत्येक देशाचा कारभार करणारा एक समूह आहे आणि त्याला आपली सत्ता टिकवण्यासाठी लोकांना नको त्या विषयात अडकवावेच लागते, मग ते अशा अफवा पसरवतात की, काही लोकांना आरक्षण दिल्यामुळे अनेकांचे नोकरीचे नुकसान होते. आपल्या देशाची प्रगती का होत नाही तर पाकिस्तानच्या खेळीमुळे इ.इ. एकूणच आशिया खंडातील एकाच भूभागाचे तुकडे पडत जे देश तयार झाले तिथे त्या त्या देशाचा कारभार हा त्या देशातील काही श्रीमंत घरांच्या ताब्यात असतो. जेव्हा मी चळवळीत आले तेव्हा सर्व काही टाटा, बिर्ला यांच्या नावाने, नेतृत्वात घडत होते. आता यात ‘ए’ पासून नावे सुरू झाली आहेत आणि पहिल्या काही अद्याक्षरा मध्येच ही ‘श्रीमंत’ नावे अडकली आहेत. सध्या आपल्या देशातल्या कुठल्याही व्यवसाय, कंपनी किंवा उद्योगाबद्दल बोलायचे असेल तर या थोड्या श्रीमंत नावाच्या पुढे काही जाणच होत नाही.

आपल्या देशाच्या लोकसंख्येकडे काही सुशिक्षित रागाने पाहतात तसे न पाहता ती देशाची एक ताकद आहे असे पहिले तर आपल्या देशाची बलस्थाने लक्षात येतील. आपल्याकडे लोक काम करीत नाहीत असा कायम एक आरोप केला जातो, तेच लोक जेव्हा परदेशात जातात तेव्हा कसे लगेच कामाला लागतात. अमेरिकेसारख्या प्रगत देशातील महत्त्वाची पदे, कामे किंवा शास्त्रीय शोध हे भारतीय माणसांनी लावले आहेत. इथे लोकांना स्वच्छ रहा असं म्हटलं की, आली मोठी शहाणी अक्कल शिकवायला अशी प्रतिक्रिया येते. तेच लोक अमेरिकेत गेले की कचरा खिशात, बॅगमध्ये टाकून घरी आणतात किंवा जेव्हा कचरा पेटी दिसेल तेव्हा त्यातच टाकतात. असं का घडतं? याचा विचार जेव्हा मी करते तेव्हा लक्षात येते की आपल्याकडे वैयक्तिक कृतीला जेवढी मान्यता मिळायला हवी ती मिळतच नाही. आपण सर्व मिळून असे करुयात असे लोक म्हणतात आणि ‘ते सर्व’ कधीच एकत्र येत नाहीत. त्यामुळे कुठलीही कृती तशीच अर्धवट किंवा अपुरी रहाते किंवा घडतच नाही. मला कायम माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग आठवतो.

- Advertisement -

एकदा भर दुपारी एक वाजता मी नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलच्या दारातल्या सिग्नलवर उभी होती. दोन्ही पाय माझे जमिनीवर होते. माझी दुचाकी एकदम स्थिर होती आणि काहीच क्षणात कोणीतरी माझ्यावर येऊन आदळलं. मी जोरदार आपटले. जे कोणी माझ्यावर येऊन आदळले तेही दोघे खाली पडले होते. आमच्या तिघांच्या सामानाची व्यवस्थित दाणादाण झाली होती. आजूबाजूचे रिक्षावाले धावत आले. आम्हा तिघांनाही उचलले. रस्त्याच्या साईडला घेतले. त्या दोघांना रिक्षावाल्याने अगदी सहज विचारले, ‘अरे त्या ताई सिग्नलला उभ्या होत्या तरी तुम्हाला दिसल्या नाही का? कसे काय तुम्ही आपटलात?’ त्या मुलाने तेवढ्याच तत्परतेने उत्तर दिले, ‘अहो दुपारी एक वाजता कोणी सिग्नलला उभं राहतं का? एकतर एकदम स्लो गाडी चालवत होत्या, मला वाटलं या निघून जातील; पण थांबल्या. जेव्हा माझ्या हे लक्षात आले आणि मी ब्रेक मारायचा प्रयत्न केला; पण आमच्या गाडीचा स्पीड एवढा होता की, मी खूप थांबवायचा प्रयत्न केला पण धडकलोच.’ त्याच्या या प्रामाणिक उत्तराने त्याला हसावं की, त्याच्यावर ओरडावं हेच मला कळेना. माझ्या पायाला लागले होते. त्यातून रक्त येत होतं. त्याला अर्जंट कुठे तरी ऑर्डर द्यायला जायचे होते. मग मी त्याला माफ करण्याचा निर्णय घेतला. कुठलीही तक्रार करणार नाही असे मी त्याला आश्वस्त केले आणि एक सल्ला मात्र त्याला दिला तो म्हणजे कुठलीही वेळ असली तरी सिग्नलला उभं रहा म्हणून.

प्रसंग इथे संपला असता तर मलाही आश्चर्य वाटलं नसतं; पण खरी मजा तर पुढे आहे. त्यानंतर माझ्या लागलेल्या पायाकडे कोणीही पाहिले, काय झाले होते हे मी सांगितले की सर्वांचा एकच प्रश्न – दुपारी कोणी सिग्नलला उभं रहातं का? माझं तेव्हाही हेच उत्तर होतं आणि आताही हेच उत्तर आहे की, ‘हो, जिथे जिथे सिग्नल आहे तिथे तिथे प्रत्येक वेळेस उभे रहाणे हे तुमचे नागरिक म्हणून आद्य कर्तव्य आहे’. सिग्नल पाळला पाहिजे हे प्रत्येकाने स्वतःला शिकवण्याची गरज आहे. ती आपल्या देशाची सर्वात मोठी आजची गरज आहे. प्रत्येकच माणसाने प्रत्येकच नियम स्वतःला साक्षी ठेवून पाळला तरच आपला देश सुखी, समृद्ध आणि तुम्हाला काय तो ‘महासत्ता’ का काय करायचा आहे न तो होऊ शकेल. आपल्याकडे आपण नियम कधी पाळतो तर पोलीस असेल तर. समाजशास्त्र म्हणत कुठलाही समाज तेव्हाच प्रगती करू शकतो जेव्हा कोणीही पहारेदार नसताना, पोलीस नसताना, कायद्याचा सेवक नसताना लोक माणूस असण्याची खूण असलेली गोष्ट म्हणजे कायद्याचे, नियमांचे पालन करतील.

आपण तर महा शहाणे आहोत, असलेल्या पोलिसाला, कायद्याच्या रक्षकाला कसा पटवला, त्याला कशी चिरीमिरी देऊन गप्प केले किंवा ओळख सांगून सुटलो हे सांगण्यातच आपल्याला ‘मर्दानगी’ वाटते. आजकाल तर इतकी सर्वांना घाई झालेली असते की आपल्या डाव्या साईडच्या सिग्नलवरची शेवटची व्यक्ती सिग्नल क्रॉस करण्यापूर्वी आपण अर्ध्या रस्त्यावर पोहोचलेलो असतो. म्हणजे डाव्या साईडचा शेवटच्या व्यक्ती आणि आपल्याकडच्या पहिल्या व्यक्तींच्या गाड्या एकमेकांना स्पर्श करून जातात. का असं वागत असतील लोक? बरं हे सर्व शिकलेले लोक असतात बरं का! माझ्यासारखे अडाणी किंवा कमी शिकलेले लोक बरोबर सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे राहतात, आपल्याकडचा ग्रीन सिग्नल दिसल्यानंतर मगच निघतात, असं बरंच काही. असं प्रत्येक माणूस जेव्हा नियम पाळेल तेव्हाच आपला देश व्यवस्थित चालेल, स्वच्छ राहील, नीटनेटका राहील.

आपल्याकडे असे ज्यांना नियम पाळायचे आहेत, सर्वांना वागण्या बोलण्याची, व्यक्त होण्याची समान संधी मिळावी असं वाटतं त्यांना लोक पाकिस्तानात जाऊन रहा असे म्हणतात. आमच्या कोर्समध्ये नऊजणी पाकिस्तानमधून आल्या होत्या. न राहवून मी त्यांना विचारलेच की, तुमच्याकडे खूप जागा आहे का? कारण आम्हाला सारखं असं ऐकावं लागतं की…. कारण आमच्याकडे मुसलमानांना त्रास होतो आहे, मॉब लिंचिंगमध्ये पूर्ण भारतभर मांस आहे अशा संशयाने जेवढे लोक मारले गेले ते सर्व मुसलमान होते, हा केवळ योगायोग नाही. मांस अनेक जाती धर्माचे लोक खातात; पण मारले मात्र फक्त मुसलमान जातात याचा अर्थ मांस खाणे हा रागाचा विषय नाही तर मुसलमान मारून टाकणे, ज्यांना जिवंत रहायचे आहे त्यांच्यात दहशत पसरवणे, आम्ही म्हणतो तसेच जगा नाहीतर आधी आम्ही तुम्हाला मारू आणि मग तुमचा खून पचवण्यासाठी त्याच्याकडे मांस होते असे कारण पुढे केले जाते असा आजपर्यंतचा अनुभव आहे असे बोलले, पटवून दिले तरी काही ऐकणार्‍यांची भूमिका स्पष्ट असते ती म्हणजे मुसलमानाची बाजू घेता मग जा तिकडे. बरं असं म्हणणारे या देशाच्या विकासासाठी काही वेगळे करीत आहेत का, तर तसंही नाही. हिंदू धर्मातल्या सर्व जातींशी ‘हे’ देशप्रेमी लोक चांगले वागतात का, तर तेही नाही. आपल्या जातीतील पोरगी दुसर्‍या जातीच्या पोराच्या प्रेमात आहे असे कळले तरी यांची ‘पंच’ मंडळी बसते आणि त्या पोराला, त्याच्या घरच्यांना ‘समजावले’ जाते आणि तरी त्या पोराने ऐकले नाही तर त्याला मरतातच; पण स्वतःच्या मुलीला, बहिणीला मारून टाकण्यापर्यंत यांची मजल जाते आणि त्याला हे ‘ऑनर किलिंग’ म्हणतात.

हे काय आज शोध लागला असं नाही; पण ज्या ज्या समाजाचा माणूस म्हणून विकास झाला त्याची कारणमीमांसा केली तर लक्षात येते की त्या समाजात सर्व लिंग, सर्व जाती धर्म यांच्यात समानता होती म्हणून तो समाज विकासाचा टप्पा गाठू शकला. नाहीतर जगातल्या पहिल्या पन्नास श्रीमंत लोकांमध्ये पाच भारतीय आहेत ही एक बाजू आणि मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानी जवळच्या जिल्ह्यात आजही कुपोषणाने लहान मुलं मरत आहेत ही त्याच प्रगत भारताची दुसरी बाजू. हे बदलायचे असेल तर कोणीतरी एकाने नमुना दाखल चांगले वागून उपयोग नाही तर इथल्या प्रत्येकच व्यक्तीने एकमेकांशी समानतेने, सारख्याच भावनेने वागायला हवे. आणि हे शक्य आहे-सर्वच सिग्नल पाळून मग तो रहदारीचा सिग्नल असो, तो जाती समानतेचा सिग्नल असो, नाहीतर धार्मिक सलोख्याचा सिग्नल असो, सर्वांना वागण्या / बोलण्याची/ धार्मिक अभिव्यक्ती करण्याची, आवडीप्रमाणे जगण्याची संधी देण्याचा सिग्नल असो नाहीतर सर्वच लिंगाना समानता देणारा सिग्नल असो. लोक काय म्हणतील पेक्षा माझे मन काय म्हणतंय याचा पुरावा घेतला, त्याचं ऐकलं तर नक्कीच तुम्हीही असे सर्व सिग्नल पाळू शकाल. काही दिवस सर्वांना सवय लागेपर्यंत कदाचित माझा अपघात झाला तसे थोडे अपघात होतीलही; पण तरीही टिकून राहिलो तर मात्र हा देश नक्कीच ‘महासत्ता’ बनेल. पहिल्यांदा ‘हो हे शक्य आहे’ यावर विश्वास ठेवून सुरुवात तर करूया.

- Advertisment -