नाविन्याचा शोध सातत्याने घ्यायला हवा

हम तो तेरे आशिक है.. या मालिकेतून पहिल्यांदाच टीव्हीवर कॉमेडी पात्र रंगवता आले. माझ्यासाठी हा खूप वेगळा अनुभव होता. कारण याआधी केलेल्या सर्व मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकरल्या होत्या. कॉमेडीचा उत्तम टायमिंग असलेल्या प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्रीसोबत या मालिकेत काम करण्याचा अनुभव देखील भन्नाट होता.

Madhavi Kulkarni
माधवी निमकर-कुलकर्णी

मी जशी आहे, जशी दिसते… असे पात्र मला या मालिकेत करायला मिळाले, याचा मला आनंद वाटतो. सध्या ही मालिका थांबली असली तरी त्यातली शालू ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली, याचे समाधान वाटते. बर्‍याच लोकांचा गैरसमज होता की, हम तो तेरे आशिक… एका हिंदी मालिकेवर आधारीत आहे. मात्र आमचा प्रोजेक्ट हा पूर्णपणे वेगळा होता. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने शालू या पात्राला न्याय देऊ शकले. मी आतापर्यंत जे निगेटिव्ह आणि कॉमेडी रोल केलेे आहेत. पण मला यापुढे डॅशिंग रोल करण्याची इच्छा आहे. जसे की स्पोर्ट्स बायोपिक करायला आवडेल. असे माधवी निमकर-कुलकर्णी हिने सांगितले. आपलं महानगरच्या महानगर आणि मी या मुलाखत कार्यक्रमात तिने महानगर टीमशी मनमोकळा संवाद साधला.

नकारात्मकतेतून बाहेर येण्यासाठी वेळ दिला
टीव्ही मालिकेत करियरच्या सुरुवातीला स्वप्नांच्या पलिकडले (2012-14), जावई विकत घेणे (2014) या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या होत्या. ज्या खूप गाजल्या. पण त्यानंतर पुन्हा पुन्हा मला नकारात्मक भूमिकेच्या ऑफर यायला लागल्या होत्या. एकाच पठडीतल्या भूमिका करण्याची माझी इच्छा नव्हती. माझ्यासाठी कामातून मिळणारे समाधान महत्त्वाचं होतं. त्यामुळं मी थांबण्याचा निर्णय घेतला. एकापाठोपाठ येणार्‍या ऑफर्स नाकारल्यामुळे माझ्यावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं गेलं. पण सुदैवाने मला सुरक्षित अंतर ठेवा (2017) हे नाटक मिळालं. नाटक कॉमेडी होतं आणि माझ्या पात्रासाठी झी टॉकिजचा सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर लगेचच हम तो तेरे आशिक है मिळालं. मी कॉमेडी करू शकते, हा आत्मविश्वास मला आला. आता मला आवडेल अशाच भूमिका मी स्वीकारत आहे.

पुष्कर श्रोत्री चांगला मित्र
सुरक्षित अंतर ठेवा, या नाटकात पुष्कार श्रोत्री सोबत पहिल्यांदा काम केलं. नाटक आणि तेही कॉमेडी, हे माझ्यासमोरचं आव्हान होतं. पण पुष्करच्या मदतीनं हे काम सोप्प झालं. पुष्करच्या कॉमेडीचा टायमिंग अफलातून आहे. नाटकाच्या तालमीच्या पहिल्या दिवसापासूनच त्याच्याशी एक छान गट्टी जमून गेली. पुष्करचा स्वभावच जगतमित्रासारखा आहे. त्यामुळं तो सर्वांनाच आपलंस करुन घेतो. पुष्करच्या मैत्रीचा फायदा हम तो तेरे आशिक है ची शालू साकारताना झाला.

सुरक्षित अंतर ठेवा.. लग्नसंस्थेवर कॉमेडी
सध्या लग्न संस्था अडचणीत सापडलेली आहे. लिव्ह इन, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेजची आव्हाने यामध्ये आत्ताच अनेक संकटे उभी राहिली आहेत. वीस वर्षानंतर तर परिस्थिती आणखी बिकट होईल की काय? अशी शंका येते. सुरक्षित अंतर ठेवा, या नाटकाच्या माध्यमातून आम्ही हा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. फार गंभीर न होता लोकांना हसत हसत अंतर्मुख करुन विचार करायला लावेल, अशा पद्धतीने हे नाटक लिहिले गेले होते. त्यापद्धतीने आम्ही काम केलं.

…आणि अभिनयाची आवड निर्माण झाली.
लहानपणी आपण अभिनय करु, अभिनेत्री होऊ, असं कधीच वाटलं नव्हतं. पण माझी मोठी बहिण सोनालीकडे (अभिनेत्री सोनाली खरे) पाहून मलाही अभिनयाची आवड निर्माण झाली. खोपोलीला राहत असल्यामुळे घरच्यांना थोडीशी साशंकता होती की या क्षेत्रात काम करण्यासाठी कितपत वेळ काढू शकेन. नोकरीनिमित्त जेव्हा मुंबईत आले, तेव्हा सोनालीसोबत एकदा ई टिव्हीच्या कार्यालयात जाण्याचा योग आला. ई टिव्हीवरचे संतोष आयचित यांच्या सहकार्यामुळे गाणे तुमचे आमचे या शोचे अँकरींगचे काम मला मिळाले. यानंतर मग एकामागून एक नाटक आणि टिव्ही मालिकांमध्ये कामं मिळत गेली.

अन्विताने खुप काही मिळवून दिलं
स्वप्नांच्या पलिकडले, या मालिकेने मला खूप काही मिळवून दिलं. यातील अन्विता हे पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. या नकारात्मक भूमिकेमुळे लोकांच्या लक्षात राहिली. अन्वितानंतर मला अनेक नकारात्मक भूमिका मिळाल्या. स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेनंतर अभिनयाच्या कामातून मी चार ते पाच वर्षांची विश्रांती घेतली होती. पण अन्वीता या पात्रामुळे माझी ओळख कायम ठेवली गेली.

हो बिग बॉसमध्ये जायला आवडेल
बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोचा कधी विचार नाही केला. पण मला या शोमध्ये जायला आवडेल. तसंही मला गेम्स खेळायला आवडतात. हा देखील अनुभव माझ्यासाठी वेगळा ठरू शकेल. पण या शोमध्ये मी किती दिवस राहीन, हे मात्र सांगता येत नाही. मोबाईल फोन वरून होणारं बोलणं, कुटुंबापासून लांब होऊन वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांसोबत 100 दिवस काढणं, हा वेगळा अनुभव आहे. आणि तो एकदा तरी घ्यायला मला नक्की आवडेल.

काम चांगले असेल तर इंड्रस्ट्रीत टिकू शकते
टिव्ही मालिकांमुळे चांगले चित्रपट करता आले नाहीत. कारण चांगला चित्रपट करण्याची वेळ आली तेव्हा मी मालिकेत व्यग्र होते. पण काही मालिकानंतर मी थांबण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना आपण इंडस्ट्रितून बाहेर जाऊ, ही भीती कधीही वाटली नाही. उलट मला कामाच्या संधी येत होत्या. मात्र माझ्या मनाला भावणार्‍या भूमिकाच करायच्या, असं मी ठरवलं होतं.

एकांकिकेत काम करायचं राहून गेलं…
मराठी सिनेसृष्टीत किंवा नाटक क्षेत्रात काम करणारे बहुतेकजण हे एकांकिकेत काम करुन आलेले आहेत. मी खोपोलीत राहिली असल्यामुळे मला मात्र एकांकिकेत कधी काम करता आले नाही. याची खंत मला नेहमीच वाटते. मात्र एकांकिकेत काम न करता, कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना मी इथपर्यंत पोहचू शकले याचा मला आनंद आहे.

वेबसिरीजची निर्मिती आवडेल
मला सुरुवातीपासूनच निर्मिती क्षेत्रात उतरावं असं वाटतं होतं. आपल्या प्रोडक्शन हाऊससारख्या मालिका बनवणं, त्या प्रसारित झाल्यानंतर लोकांना त्या आवडणं. यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. नाटक, सिनेमा किंवा वेबसिरीज असो.. पण निर्मितीचा अनुभव मला घ्यायचा आहे. सध्या वेबसिरीजचा चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळं चांगली वेबसिरीज समोर आली तर नक्कीच त्याची निर्मिती करायला आवडेल.

सलमानबरोबर डेटवर जायचंय.
सलमान खान हा कलाकार म्हणून मला खूप आवडतो. त्याचा चित्रपट पाहताना त्याच्याकडे पाहतच राहते. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार आहेत. पण एक चाहती म्हणून ते बाजूला ठेवून फक्त मी त्याच्या चित्रपटांची फॅन आहे.

स्वतःला फिट ठेवण्यासाठी योग गरजेचा.
योग किंवा व्यायाम हे फक्त सेलिब्रिटीपुरतं मर्यादित नाहीये. प्रत्येक व्यक्तीने योगा केला पाहीजे. आठ वर्षापूर्वी मला योगाची सवय लागली. स्वतःला प्रेझेंटेबल ठेवायचे असेल तर फिट राहणं गरजेचं आहे.

कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंत पोहोचले.
सिनेसृष्टीत काम करायचे असेल, तर कुटुंबाचा पाठिंबा खूपच गरजेचा आहे. माझ्या सासरच्या मंडळींनी मला, माझ्या कामाला समजून घेतलं. त्यामुळंच मी इथपर्यंत पोहचू शकले.

या महानगराने मला काय दिले?
मुंबई हे महानगर तर आहेच, पण त्याशिवाय ती एक स्वप्ननगरी आहे. कष्ट करण्याची जिद्द असेल तर हे महानगर उपाशी ठेवत नाही. खोपोलीतून जेव्हा मुंबईत आले तेव्हा सुरुवातीचे सहा महिने थोडे धकाधकीचे गेले. इतकी गर्दी नको वाटायची. पण आता या गर्दीची सवय झाली आहे. कामानिमित्त कुठे बाहेर गेल्यानंतर कधी मुंबईत परत येतेय असं होतं. लोकांची गर्दी बघितल्याशिवाय चैन पडत नाही. माझ्या करियरची सुरुवात इथूनच झाली. मी काहीतरी करु शकते, हा आत्मविश्वास मला या महानगरानेच दिला. या महानगराला परत जर काही द्यायचं असेल तर या शहराची स्पेस आपण परत दिली पाहीजे. इतक्या लोकांना सांभाळता सांभाळता मुंबईच आता थकलेली वाटतेय. हरित मुंबई , स्वच्छ मुंबई… हे वाक्य फक्त बोलण्यापुरते मर्यादित राहतंय कृतीत येत नाही, याचे खूप दुःख वाटते. सुशिक्षित म्हणवणारेच अनेकजण हे शहर अस्वच्छ करतात, याचेही वाईट वाटते. एक नागरिक म्हणून या शहराला काय देता येईल, तर स्वच्छता दिली पाहीजे, असं मला वाटतं.