Dussehra 2021: भारतातील ‘या’ सहा शहरांमध्ये साजरा होतो आगळावेगळा दसरा

हिंदूंचा महत्वाचा सण असलेला दसरा देशभरात उत्साहात साजरा होत आहे. आज सोनं लुटून विजयादशमी साजरी केले जाते. असत्यावर सत्याचा विजय म्हणून दसरा साजरा करण्याची आपली परंपरा आहे. पण देशात सहा शहर अशी आहेत जिथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो.

छत्तीसगडमधील बस्तरचा दसरा उत्सव

बस्तरमधला दसरा उत्सव हा जगप्रसिद्ध आहे. पौराणिक कथांनुसार प्रभु रामचंद्राने १४ वर्षांचा वनवासकाळ येथेच काढला होता. यामुळे येथील जगदलपूरमध्ये मा दंत्तेश्वरीच्या मंदीरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे दरवर्षी हजारो आदिवासी त्यांचे लोकनृत्य साजरा करतात. पण बस्तरमध्ये दसऱ्याला रावणाचे दहन केले जात नाही. तर राजा पुरुषोत्तमने येथे रथ चालवण्याची प्रथा सुरू केल्याने दसऱ्याच्या दिवशी रावण दहन न करता रथ चालवण्याची परंपरा आहे.

म्हैसूरचा दसरा उत्सव

म्हैसूर येथे दसरा अनेक दिवस साजरा केला जातो. यामुळे या दसरा उत्सवाची दखल जगभरात घेतली जाते. कर्नाटकचा सण म्हणून येथे दसऱ्याला विशेष महत्व आहे. येथे नवरात्रीच्या पहील्याच दिवसापासून दसरा उत्सव साजरा केला जातो. या शहराला म्हैसूर हे नाव महिषसुराच्या नावावरून देण्यात आले आहे. यादिवशी म्हैसूर पॅलेसला नववधूप्रमाणेच सजवण्यात येते. शहरभर शोभायात्रा काढण्यात येते.

कुल्लूचा दसरा उत्सव
हिमाचल प्रदेशमधील कुल्लूच्या दसऱ्याला आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून मान्यता देण्यात आली आहे. येथील ढालपूर मैदानातला दसरा जगप्रसिद्ध आहे. १७ व्या शतकापासून ेयथे दसरा करण्यात येत आहे. दसऱ्याच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. येथे दसरा सात दिवस साजरा केला जातो.

मदिकेरी दसरा उत्सव
दक्षिण भारतातील मदिकेरीमध्ये १० दिवस दसऱ्याची धूम असते.भव्य दिव्य स्वरुपात येथे दसरा साजरा केला जातो.दसऱ्याच्या तीन महिन्याआधीपासून येथे उत्सवाची लगबग असते. या दसरा उत्साहात सहभागी ोहण्यासाठी देशभरातून नागरिक येतात.

कोटाचा दसरा उत्सव

राजस्थानमधील कोटा शहरातही दसरा जल्लोषात साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी येथे भजन किर्तनाचे आयोजन केले जाते. जगभरातून पर्यंटक येथे दसऱ्यात सहभागी होण्यासाठी आवर्जून येतात.

मंगळूरचा दसरा उत्सव
मंगळूरमध्येही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी करण्यात येणारा टायगर डान्स जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी केले जाते.