गृह विभागाने बंडाची कल्पना आधीच देऊनही दुर्लक्ष?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. आता भाजपाप्रणित सरकार राज्यात येईल. पण महाविकास आघाडीतील बंडखोरीची माहिती गृहविभागाने आधीच दिली होती, पण त्याबाबत वेळीच पावले उचलली गेली नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

राज्यात राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीनंतर अतिशय वेगाने घाडमोडी घडत होत्या. तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह गुजरातच्या सुरतमध्ये रवाना झाले. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले आणि आघाडीती सुमारे 50 आमदार त्यांच्या गटात सामील झाले. अशी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली असतानाही मुख्यमंत्री अनभिज्ञ कसे राहिले? गृह विभागाकडून त्यांना पूर्वकल्पना दिली नव्हती का? दिली असेल तर, त्याकडे दुर्लक्ष झाले का? असे सवाल उपस्थित होत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंदर्भात गृह मंत्रालय आणि गु्प्तचर विभागाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली होती, असे सांगण्यात येते. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देखील याबाबत त्यांनी विचारणा केल्याचे सांगण्यात येते. तथापि, गुप्तचर विभागाने (एसआयडी) दोन महिन्यांपूर्वीच सरकारला या बंडाची माहिती दिली होती, असे आता सांगण्यात येते. गुप्तचर विभागाने सहा वेळा तर, शरद पवार यांनी चार वेळा उद्धव ठाकरे यांना याबाबत सावध केले होते. मात्र तरीही सरकार बेसावध राहिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.