Eco friendly bappa Competition
घर गणेशोत्सव 2023 सोन्याच्या पावलानं लक्ष्मी माय आली... गौरीच्या आकर्षक मुखवटे, अलंकारांनी सजली बाजारपेठ

सोन्याच्या पावलानं लक्ष्मी माय आली… गौरीच्या आकर्षक मुखवटे, अलंकारांनी सजली बाजारपेठ

Subscribe

प्रत्येक घरात भाद्रपद महिन्यामध्ये गौरीचे आगमन होते. ज्यांच्या घरात नवीन सून आली आहे, ते कुटुंब गौरीसाठी लागणारे सर्व साहित्य पुन्हा नव्याने खरेदी करत असते. गौरीचे मुखवटे, गौरीचे दागिने, गौरी बसवण्यासाठीचा स्टॅण्ड या सर्व साहित्यांची बाजारपेठेत जोरदार खरेदी सुरू आहे.

मुंबई : गणपती-गौरीचे दिवस म्हणजे उत्साह, आनंद यांचा सुरेख मेळ. आज गणरायाचे आगमन होत आहे. गणपती विराजमान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते. गौरीच्या आगमनासाठीचे विधी ठिकठिकाणी निरनिराळे आहेत. माहेरवाशीण म्हणून पूजली जाणारी गौर ही अनेक ठिकाणी गणपतीची आई म्हणून पूजतात, तर अनेक ठिकाणी ज्येष्ठा-कनिष्ठा अशा बहिणींच्या स्वरुपात पूजली जाते. (Ganeshotsav 2023 Lakshmi Mai came with a golden step Market decorated with Gauri s attractive Idol ornaments)

तीन दिवस चालणाऱ्या गौरीच्या सणाला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक घरात भाद्रपद महिन्यामध्ये गौरीचे आगमन होते. ज्यांच्या घरात नवीन सून आली आहे, ते कुटुंब गौरीसाठी लागणारे सर्व साहित्य पुन्हा नव्याने खरेदी करत असते. गौरीचे मुखवटे, गौरीचे दागिने, गौरी बसवण्यासाठीचा स्टॅण्ड या सर्व साहित्यांची बाजारपेठेत जोरदार खरेदी सुरू आहे.

- Advertisement -

गौरीच्या आगमनासाठीच्या विधीमध्ये देखील विविधता आढळते. गौरीचा थाट हा वेगळाच असतो. याच गौरीच्या आगमनानिमित्त गौरीचे अनेक प्रकारचे सुंदर मुखवटे आणि वेगवेगळ्या डिझाइन्सचे दागिने सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गौरीचे मुखवटे अगदी 300 रुपयांपासून मिळतात. तसेच, संपूर्ण गौरीची मूर्ती देखील बाजारात उपलब्ध आहे. त्यात कापडी, फायबर आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीही उपलब्ध आहेत.

मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक गौराईच्या साडीचे एक वेगळेपण आहे. महाराणी पैठणी, पेशवाई अशा अनेक प्रकारच्या नऊवारी साड्या या गौराईंना नेसवण्यात आल्या आहेत. प्रत्येक गौरीला सध्याच्या लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नथींसह, अलंकारांनी नटवण्यात आले आहे. त्यामुळे गौराईचे रूप अजून खुलून दिसते.

यंदाची ‘बाईपण भारी देवा’च्या अलंकाराची क्रेझ

- Advertisement -

‘यंदा बाईपण भारी देवा’ चित्रपटातील दागिन्यांची क्रेझ आहे. लालबाग मार्केट परिसरातील दुकानांमध्ये खरेदीस येणाऱ्या महिला याच दागिन्यांची मागणी करत आहेत. या चित्रपटात अभिनेत्रींनी घातलेला वेलवेट लक्ष्मीहार यंदा गौराईच्या सजावटीसाठी पसंतीस उतरत आहे. सजलेल्या स्त्रीचे सौंदर्य जसे उठून दिसते, तसेच आपली गौरीदेखील सुंदर असावी, अशी यामागची भावना आहे.

विविध अलंकार उपलब्ध

मुंबईच्या बाजारात विक्रेत्यांकडे वेलवेट लक्ष्मीहाराची किंमत सुमारे 380 रुपये आहे. याशिवाय संपूर्ण पोशाख दागिन्यांसह फायबर मटेरियलपासून तयार गौरीची किंमत 18 हजार रुपयांपासून पुढे आहे. त्यातही बैठ्या स्वरुपातील किंवा मग उभी असलेली अशा दोन्ही स्वरुपातील गौरी उपलब्ध आहेत.

तसेच, अन्य दागिन्यांमध्ये कोल्हापुरी साज, बाजूबंद, तोडे, बांगड्या, नथ, ठुशी, चंद्रकोर, साखळ्या, कंबरपट्टा, बिंदी, पैंजण, कृत्रिम फुलांचे गजरे- वेण्या अशी वैविध्यता आहे. या दागिन्यांची किंमत 200 रुपयांपासून ते अगदी 600 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. इतकेच काय तर, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील इतक्या किमतीतही दागिने उपलब्ध आहेत. अगदी 20 रुपयांपासून ते थेट एक ते दोन हजार रुपयांपर्यंत गौराईला सजवण्यासाठी नथीपासून ते हार, कंबरपट्टा असे अनेक प्रकारचे अलंकार खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

फेटे असलेल्या गौरीलाही मागणी

यंदा फेटे असणाऱ्या गौरीही महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच फेटादेखील मूर्तीच्या आकारप्रमाणे लहान स्वरुपाचा आहे. त्यामुळे मुखवटा अगदी सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

गौरी पूजनात वैविधता

गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडू, पितळ, कापड, फायबर असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काही ठिकाणी केवळ मुखवट्यांची पूजा होते, तर अनेकांकडे पूर्ण उभ्या गौऱ्या असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसेलली गौरी असते. तर खड्यांच्या गौरी, लहान मडक्यांची गौर पूजण्याचीही रीत आहे. मराठवाडा आणि विदर्भात गौरींना महालक्ष्मी म्हटले जाते. प्रदेशानुसार, गौरीच्या पूजनात तसेच नैवेद्यातही विविधता आढळते.

कोकणातील गौरी

कोकणात गौरी विराजमान झाल्यानंतर पहिल्या दिवशी तांदळाच्या भाकरी आणि भाजीचा नैवेद्य गौराईला दाखवतात. तसेच हळदीच्या पानातील पोताळ्या आणि पाच भाज्यांचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी दाखवण्यात येतो. येथे खास असतात ते उकडीचे मोदक. तर, काही ठिकाणी गौरीला तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा कोकणातील अनेक गावांमध्ये जपली जाते. या तिखटाच्या नैवेद्यात गौराईसाठी मटण, चिकन, खेकडे आणि मासे यांचा नैवेद्य दाखवला जातो.

(हेही वाचा: ‘आपलं महानगर’तर्फे यंदाही ‘इको-फ्रेंडली बाप्पा’ स्पर्धा; सोबत ‘सेल्फी विथ बाप्पा’ उपक्रम )

- Advertisment -