मुंबई : लाडक्या बाप्पाचे आज आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वत्र लगबग सुरू आहे. गणपतीच्या प्रसादापासून आरासपर्यंत नानाविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी खरेदीसाठी या बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. बाप्पाला आवडणाऱ्या सर्वकाही गोष्टी आजही घेतल्या जात आहेत. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे.
गणपतीला गुळ-खोबरं जरी आवडत असले तरीही नैवेद्यासाठी काही खास पदार्थ तयार केले जातात. हिंदू धर्मात केळीच्या झाडाला पवित्र मानले जाते. त्याचसोबत जेव्हा आपण घरात एखादे शुभकार्य करतो तेव्हा सुद्धा केळीचे खांब किंवा त्याच्या पानाचा वापर केला जाते. केळीचे झाड हे विष्णूला प्रिय असते, असे म्हटले जाते. केळीच्या पानावर नैवेद्य वाढण्याचे धार्मिक कारण तर आहेच, पण त्याचसोबत वैज्ञानिक कारण ही सांगितले जाते. केळीच्या पानाच जेवणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते.
नैवद्याचे पान वाढताना सर्वात प्रथम केळीच्या पानाखाली ताट किंवा पाट ठेवला जातो. नैवेद्याचे पान वाढताना त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला नक्की काय ठेवावे, हेही जाणून घेणे आवश्यक आहे. डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी असे पदार्थ वाढावेत. म्हणजेच जे तोंडी लावण्याचे आहेत तसे पदार्थ डाव्या बाजूला वाढले जातात. याशिवाय, खीर, पुरण, मोदक यासारखे पदार्थ उजव्या बाजूला वाढले जातात. उजव्या बाजूला भाजी वाढली जाते. पानाच्या मधोमध भाताची मूद, साधे वरण आणि त्यावर तुपाची धार असते. बाजूला पोळी वाढली जाते.
नैवेद्य देवाला दाखवताना, त्यावरून एकदा किंवा तीन वेळेस पाणी फिरवले जाते. पाणी फिरवताना ते नैवेद्याभोवती उजव्या हाताने डावीकडून उजवीकडे फिरवून सोडले जाते. नैवेद्य दाखवताना ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा हा मंत्र म्हटला जातो. या मंत्रामध्ये ज्या शब्दांचे उच्चारण करता ते आपल्या शरीरातील पाच वात आहेत. हे वात आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
त्यानंतर नैवैद्यासाठी देवाला आवाहन केले जाते. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो थोडावेळ देवासमोरच ठेवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, गणपती बाप्पाला दाखवलेल्या नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवले जात नाही. तर गणपतीला दुर्वा अपर्ण करणे शुभ मानले जाते.
एकूणच आजपासून पुढील 10 दिवस उत्साहाचे, जल्लोषाचे आणि आनंदाचे आहेत. गणरायाची नानाविध रुपे डोळ्यात साठवली जातील. हीच रुपे बघण्यासाठी आप्त-मित्रपरिवार तसेच गल्लोगल्लीतील गणेश मंडळांना भाविक भेटी देतील. मुंबई आणि परिसर गर्दीने फुलून जाईल. हे 10 दिवस म्हणजे फक्त भारावण्याचे आहेत.