नम्रता तळेकर | जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तसतशा गृहिणी बाप्पासाठी गोड-धोड प्रसाद बनवण्याच्या तयारीला सुरुवात करतात. बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास मोदक बनवले जातात. नेहमीच्या पारंपरिक पद्धतीचे मोदक बनवण्यापेक्षा त्यात थोडा वेगळेपणा आणला तर, त्याची लज्जत आणखीनच वाढेल आणि गणपतीनिमित्त घरी येणार्या पाहुण्यांना तुमच्या हातच्या बनवलेल्या मोदकाचा प्रसाद दिल्यावर कौतुकही होईल. लाडक्या बाप्पाचा आवडता हा पदार्थ आणि त्याचा इतिहास याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया… (Ganesha the Destroyer 10 days of Modaks beloved fathers favorite train)
मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकलेट, विविध रंगांचा वापर करून केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत.
हेही वाचा – चाहूल गणेशोत्सवाची : पुन्हा पारंपरिक देखाव्यांचा ट्रेंड, मंडळे धार्मिक देखावे साकारणार
मोदकांचा इतिहास
पौराणिक काळापासून मोदकाचा उल्लेख आढळतो, पण मोदकाच्या पाककृतीत याचा विशेष उल्लेख नाही. मोद देणारा तो मोदक या अर्थाने लाडवांनाही मोदक म्हटले जायचे. त्यामुळे तांदळाची उकड, आत खोबरे आणि गुळाचे गोड चूर्ण ही पाककृती मोदक म्हणून प्रचलित झाली.
इसवी सन 750 ते 1200 या कालखंडात उकडीच्या मोदकांसारखा पदार्थ बनू लागल्याचा उल्लेख आढळतो. त्यात तांदळाची उकड समान असली तरी आतले गोड सारण वेगवेगळ्या पद्धतीने भरले जात होते. नारळाचे चूण आणि उकड असा उल्लेख एकेठिकाणी आढळतो. पण त्या पदार्थाचा उल्लेख मोदक नाही तर ‘ठडुंबर’ असा केलेला दिसतो. शिवाय, आहारविषयक ग्रंथात ‘वर्षिल्लक’ नामक पदार्थाची पाककृती अगदी उकडीच्या मोदकांशी मिळती जुळती आहे. आपल्याकडच्या अनेक पाककृती मूळ वेगवेगळ्या नावांसह अस्तित्वात होत्या आणि कालांतराने त्याच पाककृती भिन्न नावाने प्रसिद्ध झालेल्या दिसतात.
हेही वाचा – डंका नाशिक ढोलचा : मराठी संस्कृती जतन करणारे ‘शिवसाम्राज्य ढोलपथक’
मोदक ही पाककृती ज्या प्रांतात तांदूळ जास्त पिकतो, तेथे ही पाककृती अधिक लोकप्रिय आहे. मात्र थोड्याफार बदलासह या एकाच पाककृतीची नावे बदललेली दिसतात. तमिळ भाषेत ‘मोदक’ किंवा ‘कोळकटै’, मल्याळी भाषेत ‘कोळकटै’, कानडी भाषेत ‘मोदक’ किंवा ‘कडबू’, तेलुगू भाषेत ‘कुडुमु’ अशी त्याची अनेकविध नावे आहेत.
प्राचीन काळापासून पूजेसाठी गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य वापरला जातो. बारकाईने पाहिले तर मोदकांचा आकार हा श्रीफळासारखा दिसतो. पूजेतला नारळ आणि गूळ-खोबरे यांचा यथोचित संगम साधत कुणा भक्ताने किंवा सुगरणीने ईश्वराप्रती व्यक्त केलेला कल्पक आणि गोड भक्तीभाव म्हणजे मोदक, असेही म्हणता येईल.
जिथे जे पिकते तेच नैवेद्याच्या ताटातून ईश्वराला समर्पित केले जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उकडीचे मोदक होतात तर, विदर्भ, मराठवाडा इथे तळणीचे मोदक होतात. ओला नारळ जिथे मुबलक उपलब्ध तिथे तशाप्रकारे आतले चूण बनते. जिथे ओला नारळ नाही तिथे सुक्या खोबऱ्याचा वापरही केला जातो.
आज मोदकाच्या आतल्या सारणाचे वैविध्य लक्षणीयरित्या बदलले आहे. मोदकाचा आकार तोच ठेवत काजू, आंबा, चॉकलेट, सुकामेवा इतक्या वैविध्यपूर्ण पद्धतीने मोदक तयार होतात की त्याला दाद द्यायलाच हवी. तरीही गणपती बाप्पा घरी विराजमान झाल्यावर नैवेद्यात पारंपरिक मोदकांचे स्थान अबाधित आहे.
हेही वाचा – जीवाला तुझी आस गा लागली… बंधन दूर होताच गणेशमूर्तीने घेतले विराट रूप
मोदक वळता येणे ही कला आहे. केवळ सगळे साहित्य मोदकाचे आहे म्हणून कसाबसा वळलेला मोदक जिव्हातृप्ती करत नाही, कारण हा पदार्थ त्याच्या आकारातून अधिक गंमत आणतो. कळीदार मोदक बनवणे आणि त्याला तुर्रेबाज टोक काढणे ही कला खरंतर वैशिष्ट्यपूर्ण आहे. काळानुसार मोदकाचे प्रकार बदलत गेले. हल्ली कळीदार मोदक सगळ्यांनाच येतो असे नाही. पण बाप्पासाठी अनेक मंडळी बाजारातून का होईना, मोदक खरेदी करताना पाहायला मिळतात.
मोदकांचे नानाविध प्रकार
तळणीचे मोदक आणि उकडीच्या मोदकाबरोबरच केळ्याचे मोदक, तांदळाचे गुलकंदी मोदक, चॉकलेटचे मोदक, उपवासाचे मोदक, पनीरचे मोदक, खव्याचे मोदक, गूळ कोहळ्याचे मोदक, पुरणाचे मोदक, फ्रुट मोदक, मिक्स मेवा मोदक, काजू-मनुकांचे मोदक, तीळगुळाचे मोदक, खोबरे मैद्याचे मोदक, कॅरामलचे मोदक, काजू कतलीचे मोदक, फुटाण्यांचे मोदक, बटाटयांचे मोदक, बेसनाचे मोदक.