घर गणेशोत्सव 2023 विशेष लेख गुणेश तू गणेश तू... बाप्पासाठी पर्यावरणस्नेही मखर अन् आरास

गुणेश तू गणेश तू… बाप्पासाठी पर्यावरणस्नेही मखर अन् आरास

Subscribe

मुक्ता लोंढे

मुंबई : आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन येत्या मंगळवारी होणार आहे. म्हणूनच घरोघरी गणरायाचे स्वागत करण्यासाठी लगबग सुरू आहे. सजावटीसाठी लागणारे साहित्य हार, फुले, लाइट्सची खरेदी करण्यासाठी बाजारपेठाही गच्च भरल्या आहेत. मात्र आपला बाप्पा सर्वांपेक्षा उठून दिसावा, यासाठी खास आरास लाडक्या गणपती बाप्पासाठी करण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. मग त्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो, तो मखर. हा मखर देखील तितकाच आकर्षक हवा असा अट्टाहास प्रत्येकाचा असतो. मार्केटमध्ये पारंपरिक थर्माकॉलच्या मखर उपलब्ध असले तरी, इको-फ्रेंडली मखरासह पुठ्ठ्यांचे मखर तसेच स्पंजच्या मखरांचे वेगवेगळे डिझाइन्स सहज उपलब्ध होत असल्याने मखर खरेदीचा कलही वाढतोय.

हेही वाचा – जीवाला तुझी आस गा लागली… बंधन दूर होताच गणेशमूर्तीने घेतले विराट रूप

- Advertisement -

श्रावण महिना सुरू झाला की, सर्वांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. मग घराची साफसफाई, रंगरंगोटी केली जाते, मात्र विशेष लक्ष मखराकडे असते. यंदाच्या वर्षी डेकोरेशन कसे करावे यासाठी उत्साही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगत असते. ऑनलाइन, ऑफलाइन, स्वत: घरी मखर तयार करणे हे सर्व पर्याय आजमावले जातात.

दादर मार्केटमधील वनमाळी हॉलमध्ये दरवर्षी आकर्षक अशा मखरांचे प्रदर्शन भरवले जाते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असलेला मखर तसेच पंढरपूरचा पांडुरंग आणि कोल्हापूरची महालक्ष्मीच्या देखाव्याला ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. याचवेळी सोशल मीडियावर वाढत चाललेला ट्रेंड पाहता पैठणी, इरकल आणि खणाच्या साडीचेही मखर तयार केले जातात.

थेट मार्केट आणि ऑनलाइन किती तफावत?

- Advertisement -

मुंबईतील मार्केटमध्ये मखरांची किंमत किमान 1 हजार रुपयांपासून सुरुवात होते. तर, मोठे मखर हे 5 हजार रुपयांपर्यंत विकले जातात. तसेच ऑनलाइन पेपर मखरची किंमतही 1 हजार 600 रुपये इतकी आहे.

हेही वाचा – विघ्‍नविनाशक गणेशदेवा… लाडक्या बाप्पाच्या आवडत्या मोदकांची 10 दिवस रेलचेल

थर्माकॉल मखर हानिकारक, तरीही विक्री सुरू

महानगरपालिकेने पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या थर्माकॉलच्या मखरांची तसेच सजावटीचे साहित्यांवर बंदी खातली आहे. मात्र प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत आजही अनेक दुकानांत थर्माकॉलचे मखर विकले जातात. महापालिका प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाला याचा मोठा फटका बसू शकतो.

गौरीसाठी देखील सजावटीच्या अनेक वस्तू

घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यावर गौरीच्या आगमनाची तयारी सुरू होते. यासाठी देखील विविध सजावट साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. गौरींच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या साड्या, गौरीचे मुखवटे, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बाजारात बघायला मिळतायेत. कोणाकडे दोन गौरी तर कोणाकडे एक गौरी असते. एकूणच गणरायाच्या आगमन होणार म्हणून सगळीकडे चैतन्याचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे आणि प्रत्येक जण बाप्पाच्या जोरदार स्वागतासाठी तयारीला लागला आहे.

- Advertisment -