अपर्णा गोतपागर
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला फक्त दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी तयारी करण्यात भक्तांची लगबग वाढली आहे. बाप्पाचे अलंकार, मखर, सजावटीच्या वस्तू, सुंगधी अगरबत्ती, पूजेचे साहित्य आदी वस्तूने बाजारपेठा सजलेल्या आहेत तर, या बाजारपेठा गणेशभक्तांनी फुलून गेल्या आहेत. मंगळवारी बाप्पा प्रत्येकाच्या घरोघरी आणि गणेश मंडळात विराजमान होणार आहेत. त्यामुळे सर्वाधिक मागणी आहे, ती पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींना. पण यासाठी अनेकांनी यातून मार्ग काढलेला आहे.
महाराष्ट्रातील गणेशोत्सव पाहाण्यासाठी जगभरातून लोक येतात. बाप्पाच्या आगमनावेळी मोठ्या गणेश मंडळांपासून घरगुती गणेशोत्सवापर्यंत ‘श्रीं’ची मूर्ती आणण्यासाठी कुठे ढोल-ताशा, टाळ-मृदंगाचा गजर ऐकू येतो. बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक भाविक रस्त्यावर गर्दी करतात. यावेळी प्रत्येक मोठ्या गणेश मूर्तीसह घरगुती गणपती बाप्पाचे देखील दर्शन होते. सार्वजनिक मंडळाच्या वेगवेगळ्या रुपातील मोठमोठ्या मूर्तींबरोबरच घरगुती बाप्पाच्या लहान मूर्तीही तितक्याच चित्तवेधक आणि लोभसवाण्या असतात. गणेशोत्सव काळात बाप्पाची आरती आणि सोबत टाळ-मृदुंगाचा आवाज आपल्या कानी पडत असतो. त्याच्याबरोबरीने बाप्पाचा आवडत्या मोदकाच्या बरोबरीने सुग्रास अन्नाचा घमघमाटही सगळीकडे असतो.
हेही वाचा – डंका नाशिक ढोलचा : पाच विश्वविक्रम करणारे ‘सिंहगर्जना’ वाद्यपथक
पहिल्या दिवशी वाजतगाजत गणरायाचे आगमन मंडपात किंवा घरोघरी झाले की, त्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसतो. पण त्यानंतर लगेच बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींची प्रतीक्षा. गणेशोत्सवात या गुरुजींना सर्वाधिक डिमांड असतो. यामुळे 1 ते 2 महिनाआधीच गणपतीच्या प्रतिष्ठापना करण्यासाठी गुरुजींकडे वेळ मागितली जाते. काही वेळा गुरुजी इतके बिझी असतात की, ते मोबाइलवरूनच एखाद्या यजमानाच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करतात. तर, एखाद्या यजमानाकडे तयारीला उशीर झाला की, काही गुरुजींना वेळेचे व्यवस्थापन करणे अवघड होऊन बसते. याबरोबरच बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी गुरुजींना द्याव लागणारी दक्षिणा सर्वांनाच परवडते असे नाही.
हे सर्व ध्यानी घेऊन अनेकांनी यातून स्वत:हूनच मार्ग काढले आहेत. आता प्रत्येकाकडे मोबाइल असल्याने व्हिडीओच्या माध्यमातून देखील ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली जाते. त्याबरोबरच सर्वसामान्य लोकांना समजेल, अशा सोप्या भाषेत गणरायाच्या प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणारी पुस्तकेही बाजार सहज उपलब्ध आहेत. ही पुस्तके वाचून गणेशभक्त स्वत: बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. गेल्या 7 ते 8 वर्षात घरगुती बाप्पाच्या प्रतिष्ठापना गुरुजीऐवजी स्वतः करण्याची कल वाढत चालल्याचे दिसते.
हेही वाचा – गणपती बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा ‘असा’ आहे इतिहास
गणपतीची प्रतिष्ठापना कशी करायची, या पुस्तकांची मागणी ही आता वाढलेली आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांत याला विशेष मागणी आहे. यापूर्वी पुस्तके ही संस्कृत भाषेतील होती. त्यामुळे भाविक गुरुजींनाच बोलवत होते. पण आताच्या पुस्तकात पूजाविधी, प्रत्येक विधीचे महत्त्व या सर्व गोष्टी सोप्या भाषेत दिलेल्या आहेत. यामुळेच गणपती प्रतिष्ठापना पुस्तकांची विक्री वाढलेली आहे, असे दादरच्या आयडियल बुक डेपोचे अनिकेत तेंदुलकर यांनी सांगितले.
हेही वाचा – Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या पूजेमध्ये ‘या’ गोष्टी कधीही अर्पण करु नये
भाविक पुस्तके वाचून बाप्पाची स्थापना करू शकतात. गुरुजी वेळेवर उपलब्ध झाले नाहीत तर, बाप्पाची मूर्ती तशीच ठेवू शकत नाही. बाप्पाची पूजा करणे गरजेचे आहे. पूजा रीतसर आणि संकल्प ठेवून केली, तरी चालू शकते. तरीही, गणेशोत्सव जवळ येण्याआधी गुरुजींची वेळ घेण्याचा प्रयत्न करावा, असे अजित वसंत वेदांते, गुरुजी यांनी सांगितले. काही गुरुजींची वाढलेली दक्षिणेमुळे देखील स्वतःच गणरायाची प्रतिष्ठापना करण्याकडे लोकांचा कल वाढला असल्याचे त्यांनी मान्य केले. देवाचा पूजाविधी हे तुमच्या हातातून होते, हे तुमचे नशीब आहे. यात वाढीव दक्षिणा घेऊन त्याचे महत्त्व कमी करायचे नसते, असा सल्लाही त्यांनी दिला.