मुंबई : श्रावण सुरू होताच वेध लागतात, ते गणेशोत्सवाचे. येत्या मंगळवारी गणरायाची प्रतिष्ठापना होणार असली तरी, ढोल-ताशाच्या गजरामध्ये बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे. अनेक मंडळे आता गणरायाचे आगमन पारंपरिक पद्धतीने करत आहेत. ढोल-ताशाच्या तालावर निघालेली मिरवणूक गणरायाच्या आगमनाचा आनंद द्विगुणीत करतात.
आधी केवळ सनई-चौघडा किंवा ताशाच्या तालावर निघणारी गणरायाच्या मिरवणुकीत गणेशभक्तांची पावले बॅन्जोवर थिरकू लागली. पण आता ट्रेण्ड पुणेरी ढोल-ताशाचा आहे. ढोल-ताशा पथकातील भला-मोठा पण शिस्तबद्ध मुला-मुलींचा ताफा सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. एकाच प्रकारची पारंपरिक वेशभूषा ही या पथकांची खासियत ठरते. लयबद्ध ठेक्यावर गणेशभक्त गुलालाची उधळण करत बेभान होऊन नाचतात. तेव्हा ‘आपल्या’ बाप्पाचे आगमन झाल्याचे भाव मनी उमटतात.
पण 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या उत्सवात आपापसातील स्पर्धा विकोपाला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक नावाजलेल्या गणेश मंडळाकडून काही महिन्यांआधीच ढोल-ताशा पथकांकडून अर्ज मागविण्यात येतात. या अर्जाच्या माध्यमातून जे पथक अगदी कमी मानधनात वादन करण्यास तयार होईल, त्यांना गणरायाच्या चरणी मानवंदना देण्याची संधी देण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून यासाठी पुणेरी ढोल-ताशा पथकांची मागणी वाढलेली आहे. परंतु संस्कृती जपण्यासाठी सुरू झालेल्या या पुणेरी ढोल-ताशा पथकांमध्ये चढाओढ मात्र वाढली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो ढोल-ताशा पथके आहेत. हल्ली तर गल्ला-गल्ल्यांमध्ये सुद्धा ढोल-ताशा पथक पाहायला मिळते. परिणामी आता स्पर्धा वाढू लागलली आहे. मोठ्या मंडळांच्या ऑर्डर मिळवण्याची देखील चढाओढ सुरू झालेली आहे. एखाद्या पथकाने एखाद्या नावाजलेल्या मंडळाकडून दहा हजारांमध्ये ऑर्डर निश्चित केली असेल, तर त्याचवेळी दुसऱ्या पथकाकडून आणखी कमी पैशांमध्ये ढोल-ताशा उपलब्ध करून देऊ सांगितले जाते. पण काही वेळेस मात्र हे सर्व फुकटात उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवण्यापर्यंत मजल जाते. त्यामुळे सहाजिकच आता ढोल-ताशा पथकांमधली ही स्पर्धा कुठे ना कुठेतरी निकोप राहिलेली नाही. परिणामी, महाराष्ट्राची ही संस्कृतिक ओळख डागाळते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
अनेक पथकांवर गाशा गुंडाळण्याची पाळी
मुंबईमध्ये अनेक मोठ्या मंडळांमध्ये बऱ्याच पथकांकडून मानवंदना देण्यासाठी अगदी फुकटात देखील वादन केले जाते. परंतु याचमुळे इतर सार्वजनिक मंडळ देखील इतर ढोल-ताशा पथकांकडून तशीच अपेक्षा करतात. परंतु मोबदला न घेता केलेल्या वादनामुळे किंवा अत्यल्प मानधन घेत केलेल्या वादनामुळे मात्र अनेक ढोल-ताशा पथकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो, हे वास्तव आहे. केवळ नाव व्हावे किंवा एक ओळख व्हावी म्हणून मानधन घेऊन करण्यात येणाऱ्या वादनामुळे अनेक ढोल-ताशा पथकाला केवळ काही वर्षांतच स्वतःचा गाशा गुंडाळावा लागतो.
सध्याच्या काळात तरी ढोल ताशाही संस्कृती जपण्यासाठी नाही तर ढोल ताशाही स्पर्धा आणि चढाओढ असल्याचेच पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सध्या “ताशाचा आवाज तरारा झाला रं, गणपती माझा नाचत आला!” म्हणण्याधी गणपती आगमनाच्यावेळी किंवा विसर्जनाच्यावेळी “ढोल कुणाचा वाजं जी” ही म्हणण्याची वेळ अनेक ढोल ताशा पथकांवर आली आहे.
ढोल-ताशावर महागाईची देखील थाप
वाढत्या महागाईच्या काळामध्ये ढोलाचे केवळ एक पान मग ते फायबरचे पान असो किंवा चमड्याचे पान असो याची किंमत जवळपास 700 ते 750 रुपयांच्या घरात आहे. ढोलाची केवळ टाकी घ्यायला गेलो तर ती टाकी तीन ते चार हजार रुपयांना विकत घ्यावी लागते. त्याशिवाय या ढोलाला बनविण्यासाठी ज्या दोरीचा उपयोग होतो त्या दोरीचे बंडल देखील आज दोन हजार रुपयांना विकले जाते. त्यामुळे साधारणतः एक ढोल हा सहा ते सात हजार रुपयांना बाजारामध्ये उपलब्ध होतो. ज्या ताशाच्या तर्रीवर लोक बेभान होऊन नाचतात, त्या ताशाची किंमत देखील पाच हजाराच्या खाली नाही. वादन करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ढोल आणि ताशासाठी लागणाऱ्या वस्तूंची किंमत ही हजाराच्या घरात आहे.
कोरोनाचाही फटका
कोरोनानंतर तर अनेक पथकांवर बिकट परिस्थिती ओढावलेली आहे. दोन वर्ष बंद असलेली वादने, त्यामुळे झालेले लाखो रुपयांचे नुकसान त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने पथक उभारण्यासाठी करावी, लागणारी कसरत यामुळे अनेक पथकप्रमुखांची पुरती दमछाक झालेली आहे. परंतु त्यातही अनेकदा नव्याने सूरू झालेल्या पथकांकडून एकमेकांची वादने फोडण्याचे काम होत असताना मात्र यामुळे ढोल ताशाच्या या क्षेत्रात चढाओढ आणि स्पर्धा पाहायला मिळत आहे.