मुक्ता लोंढे
मुंबई : येत्या तीन दिवसांनंतर मुंबई, पुण्यासह राज्यभरात भक्तीचा मळा फुलणार आहे. घरोघरी टाळ-मृदुंगाचे सुमधूर स्वर आणि त्यात एकाच सुरातील विविध आरत्या… असे एक भारावून टाकणारे वातावरण सर्वत्र असेल. लहान-मोठ्या सार्वजनिक मंडपांमध्ये सकाळ-संध्याकाळी गणेशभक्तांची गर्दी असेल. त्यातही मुंबई-पुण्यातील नावाजलेल्या गणेश मंडळांमधील गर्दी तर बघायलाच नको. हे ध्यानी घेऊनच बड्या मंडळांनी विघ्नहर्त्याबरोबरच भक्तगणांच्या सुरक्षिततेसाठी कोट्यवधी रुपयांचा विमा देखील उतरवला आहे.
हेही वाचा – खुशखबर! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी राज्य सरकारचा निर्णय
‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेनंतर पुढचे १० दिवस सर्वत्र उल्हास, उल्हास आणि उल्हासचे दिसणार आहे. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत गणेशभक्तांच्या गर्दीने रस्ते फुलून जातील. दादर, लालबाग, गिरगाव हा परिसरात शनिवारी आणि रविवारी जनसागराला उधाण येईल. पुण्यामध्ये श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणपती, गुरुजी तालीम मंडळाचा श्री गणेश, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती असे मानाचे गणपती आहेत. तसेच, मुंबईत देखील लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेशगल्लीचा राजा (मुंबईचा राजा), सँडहर्स्ट रोडजवळील डोंगरीचा राजा, गिरगावमध्ये निगदवरी लेनमधील गिरगावचा राजा तसेच खेतवाडीतील ११वी गल्लीतील मुंबईचा महाराजा, अंधेरीचा राजा असे अनेक गणपती या गणेशोत्सव काळातील भाविकांचे आकर्षण आणि श्रद्धास्थान आहे.
हेही वाचा – राजा खातोय तुपाशी अन् शेतकरी…; मंत्रिमंडळ बैठकीवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
त्यातही किंग सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती सर्वात श्रीमंत गणपतींपैकी एक म्हणून ओळखला जातो. जीएसबीच्या गणेशोत्सवाचे यंदाचे ६९वे वर्ष असून हा उत्सव पाच दिवसांचा असतो. या गणराजाचे दागिने जडजवाहिऱ्याचे असल्याने त्याची काळजी मंडळाकडून दरवर्षा घेतली जाते. भाविक आणि सेवेदारांनी आतापर्यंत या गजाननाला तब्बल ६५ किलोंहून अधिक सोन्याचे दागिने आणि २९५ किलोपेक्षा अधिक चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. हे ध्यानी घेऊन जीएसबी मंडळाने न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडून तब्बल ३६० कोटी ४० लाख रुपयांचे विक्रमी विमाकवच घेतले आहे. यात भाविकांसह मंडप आणि स्टेडियमसाठी ३० कोटी रुपये, सोन्याचांदीच्या दागिन्यांसाठी ३८.४७ कोटी; आग, भूकंप, फर्निचर, सीसीटीव्ही, भांडी यासाठी २ कोटी; स्वंयसेवक, स्वयंपाकी, सुरक्षारक्षक, स्टॉल कामगार, गाड्या, चप्पल यांच्यासाठी २८९.५० कोटी, याशिवाय मंडप परिसरासाठी ४३ लाख रुपयांचे विमाकवच घेण्यात आले आहे. गेल्यावर्षी ३१६ कोटींचा विमा मंडळाच्या वतीने काढण्यात आला होता.
हेही वाचा – मागील 9 वर्षांत पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान मोदीच खरे घमंडिया, काँग्रेसची टीका
सर्वांचेच आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. या गणराजाच्या दर्शनासाठी राजकारण्यांसह सेलिब्रिटी देखील हजेरी लावत असल्याने गर्दी आणखी वाढते. त्यामुळे मंडळाने न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडून २६.५४ कोटी रुपयांचा विमा काढला असून पाच लाख ४० हजार रुपयांचा विमा प्रीमियम भरला आहे. २४ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हा विमा काढण्यात आला आहे. अलीकडेच न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालय चारचे उपमहाव्यवस्थापक शेखर सक्सेना, क्षेत्रीय व्यवस्थापक अनिता सावंत, प्रभारी अभिजित कुमार तसेच एजंट नरेंद्र लांजवळ यांनी ही पॉलिसी मंडळाकडे हस्तांतरित केली.
हेही वाचा – ‘इंडिया’ हिंदू आणि सनातन धर्माविरोधी – निर्मला सीतारामन
गणेशमूर्तीचे दागिने आणि अन्य किमती वस्तूंसाठी ७ कोटी ४ लाख रुपये गणेशभक्त, मंडळाचे विश्वस्त, कार्यकारी अधिकारी तसेच स्वयंसेवक, स्थानिक रहिवासी, सुरक्षारक्षक आणि वॉचमनसह अन्य कर्मचारीवर्ग यांच्यासाठी १२ कोटी रुपयांचा विमा असून प्रसादातून विषबाधासारखा प्रकार घडल्यास ५ कोटी रुपये, विजेची उपकरणे तसेच सेट, मंडप, मेन गेट व अन्य नुकसानाबद्दल २.५ कोटी रुपयांचे विमाकवच घेतले आहे.
एकूणच, दरवर्षीप्रमाणे यंदाही विघ्नहर्ता आपल्या उत्सवात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ देणार नाही, एवढे नक्की. पण त्याचबरोबर सजग आणि सतर्क राहून काळजी घेणे ही आपल्या सर्वांची देखील जबबादारी आहे. तेव्हाच या उत्सवाचा आनंद द्विगुणीत होईल.