पुणे : विश्वचषकाच्या 40व्या सामन्यात इंग्लंडने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकांत नऊ बाद 339 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 37.2 षटकांत 179 धावांवर गारद झाला. या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडणारा हा चौथा संघ ठरला आहे. (ENG vs NED Netherlands out of World Cup Defeated by England by 160 runs)
इंग्लंड संघाने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात शानदार विजय मिळला. इंग्लंडने नेदरलँडचा 160 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. आठ सामन्यांत त्याचे चार गुण होते. इंग्लंडला सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत इंग्लंड दहाव्या स्थानावरून आता सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा संघ आठ सामन्यांतील सहाव्या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
तेजा निदामनुरूने केल्या सर्वाधिक धावा
नेदरलँड्सकडून तेजा निदामनुरूने सर्वाधिक नाबाद 41 धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 38 आणि वेस्ली बॅरेसीने 37 धावा केल्या. सायब्रँडने 33 आणि बास डी लीडेने 10 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि आदिल रशीदने प्रत्येकी तीन बळी घेतले. डेव्हिड विलीने दोन गडी बाद केले.
हेही वाचा : चालणे तर सोडाच धड उभंही राहता न येणाऱ्या मॅक्सवेलला का नाही मिळाला रनर? वाचा-
बेन स्टोक्सचे विश्वचषकातील पहिले शतक
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज बेन स्टोक्सने इंग्लंडकडून 108 धावा केल्या. त्याने 84 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. स्टोक्सचे हे विश्वचषक इतिहासातील पहिले शतक आहे. डेव्हिड मलानने 87 आणि ख्रिस वोक्सने 51 धावा केल्या. जो रूटने 28, जॉनी बेअरस्टोने 15 आणि हॅरी ब्रूकने 11 धावा केल्या. डेव्हिड विली केवळ सहा, जोस बटलर पाच आणि मोईन अली केवळ चार धावा करू शकला. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने तीन बळी घेतले.
हेही वाचा : Glenn Maxwell : मॅक्सवेल बनला ‘रन मशिन’; त्याच्या सर्वश्रेष्ठ खेळीने केलेले 10 विक्रम जाणून घ्या
हे चार संघ झाले विश्वचषकातून बाहेर
विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणारा तिसरा संघ श्रीलंका आहे, ज्याला सहाव्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशने श्रीलंकेचा 3 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेपूर्वी इंग्लंड आणि बांगलादेशचे संघ विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत मागे पडले होते. आता स्पर्धेच्या 40 व्या सामन्यात इंग्लंडने नेदरलॅंडचा पराभव केल्याने नेदरलॅंडही विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.