नवी दिल्ली : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यानंतर कोणता संघ विश्वचषकावर आपले नाव कोरतो हे काही वेळात स्पष्ट होणार आहे. असे जरी असले तरी आतापर्यंत विश्वचषक कोणकोणत्या संघाने जिंकला हे अद्यापही अनेकांना माहिती नसेल. मात्र, चिंता करू नका, कारण, विश्वचषक स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून तर आतापर्यंतच्या सर्व विश्वचषक विजेत्यांची लिस्टच तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. (WorldCup Which country has won the World Cup so far All information in one click)
1975 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक सुरू झाला तेव्हा फारसे ग्लॅमर नव्हते. पांढऱ्या पोषाखात 60 षटकांचे सामने खेळण्यासाठी संघांची कमतरता होती. पात्रता सामन्यांऐवजी आठ संघांसह विश्वचषक सुरू झाला. पहिला विश्वचषक वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव करून जिंकला होता. त्याला 9000 पौंड बक्षिस मिळाले. पहिल्या विश्वचषकात भारताला पूर्व आफ्रिकेविरुद्ध केवळ 10 विकेट्सने विजय मिळवण्यात यश आले होते. 1975 नंतर क्रिकेट जगताचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजने 1979 च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडचा 92 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला. व्हिव्हियन रिचर्ड्स (138) आणि कॉलिन किंग यांनी चमकदार कामगिरी केली होती. भारताला त्यांच्या गटातील तीनपैकी एकही सामना जिंकता आला नव्हता.
1983 मध्ये वर्ल्डकपवर भारताने कोरले होते पहिल्यांदा नाव
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 चा वर्ल्डकप जिंकला होता. भारतीय क्रिकेटच्या आतापर्यंतच्या प्रवासात हा एक मैलाचा दगड ठरला. गेल्या दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने प्रथमच विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारतीय संघ 183 धावांवर बाद झाला, पण प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ केवळ 140 धावाच करू शकला. मोहिंदर अमरनाथ आणि मदन लाल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. व्हिव्हियन रिचर्डचा कपिलचा ऐतिहासिक झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. याआधी कपिलने झिम्बाब्वेविरुद्ध 175 धावा करून भारताला एकहाती विजय मिळवून दिला होता.
1987 मध्ये ऑस्ट्रेलियाने पटकावला वर्ल्ड कप इंग्लंडबाहेर भारत आणि पाकिस्तानमध्ये विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा सात धावांनी पराभव करत प्रथमच चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिल्यांदा हॅटट्रिक घेण्यात चेतन शर्मा यशस्वी ठरला.
भारतानंतर 1992 मध्ये पाकिस्तानही ठरला विश्वविजेता
1992 च्या विश्वचषकापासून एकदिवसीय विश्वचषकात मोठा बदल झाला. रंगीबेरंगी पोशाख, फ्लडलाइट्स, क्षेत्ररक्षणाच्या नियमांमध्ये बदल आणि पांढऱ्या चेंडूचे युग या विश्वचषकापासूनच सुरू झाले. जसजशी क्रिकेटची लोकप्रियता वाढत गेली तसतशी प्रायोजकांची संख्याही वाढली. दक्षिण आफ्रिकेने 21 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि उपांत्य फेरी गाठली. सेमीफायनल मॅचमध्ये पाऊस पडला तेव्हा त्याला विजयासाठी 13 चेंडूत 22 धावा करायच्या होत्या. पण डकवर्थ लुईस पद्धतीच्या आधारे त्याला एका चेंडूत 21 धावा करण्याचे लक्ष्य मिळाले. याबाबत दक्षिण आफ्रिकेसह जगभरातील क्रिकेटप्रेमींनी खेद व्यक्त केला. आठ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवून भारत सातव्या स्थानावर होता. मेलबर्नच्या मैदानावर पाकिस्तानने इंग्लंडचा 22 धावांनी पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले. इम्रान खान, जावेद मियांदाद आणि वसीम अक्रम हे विजयाचे शिल्पकार ठरले.
1996 साली श्रीलंकेच्या संघाचा वर्ल्ड कपवर ताबा
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 1996 मध्ये पुन्हा एकदा भारतात परतली. आपल्या संघाकडून देशाला मोठ्या अपेक्षा होत्या. भारताने त्यांच्या गटातील पाच पैकी फक्त दोन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली, पण कोलकात्यात श्रीलंकेच्या 8 बाद 251 धावांच्या प्रत्युत्तरात भारताची 8 बाद 120 अशी अवस्था झाल्यानंतर, प्रेक्षकांनी खेळपट्टीवर बाटल्या फेकल्या आणि गॅलरीत फटाके फोडले. यामुळे सामना थांबवण्यात आला. श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. या विश्वचषकात पदार्पण करताना केनियाने वेस्ट इंडिजचा 73 धावांनी पराभव करून सर्वांनाच चकित केले. अंतिम फेरीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला. अंतिम फेरीत तीन बळी आणि दोन झेल घेत अरविंद डी सिल्वा श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. यासह त्याने 107 धावांची नाबाद खेळी खेळली.
1999 मध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा विश्वविजेता
1999 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा आठ विकेट्स राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला. शेन वॉर्नने फायनलमध्ये चार विकेट घेतल्याने पाकिस्तानी संघ 132 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने अवघ्या 20 षटकांत लक्ष्य गाठले. सुपर सिक्समध्ये भारताची कामगिरी खराब होती. भारतीय संघ फक्त पाकिस्तानविरुद्ध जिंकू शकला आणि तो बाहेर पडला.
2003 मध्ये टीम गांगुलीचा पॉंटींगच्या टीमने उडवला होता धुव्वा
2003 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा 125 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला. ग्लेन मॅकग्राने पहिल्याच षटकात सचिन तेंडुलकरला पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारतीयांची मने तोडली. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू शेन वॉर्नला डोपिंगच्या आरोपामुळे मायदेशी परतावे लागले होते.
हेही वाचा : मोहम्मद शमीच्या कामगिरीवर मुख्यमंत्री आदित्यनाथही फिदा; पाच कोटींचे दिले गिफ्ट
2007 मध्ये ऑस्ट्रेलियाची हॅट्रीक
वेस्ट इंडिजने आयोजित केलेल्या या विश्वचषकात 16 संघांनी भाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली होती. याच स्पर्धेत पाकिस्तानचे इंग्लिश प्रशिक्षक बॉब वुलमर यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तर एका षटकात सहा षटकार मारणारा दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्स हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला. भारत आणि पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक होती. ते स्पर्धेतून लवकर बाहेर पडले.
…आणि 2011 भारताने पुन्हा विश्वचषक उंचावला
दोन दशके क्रिकेटवर राज्य करणाऱ्या सचिनचा हा शेवटचा विश्वचषक होता. धोनीच्या नेतृत्वाखाली सहाव्या विश्वचषकात त्याचे स्वप्न पूर्ण झाले. भारताने आयोजित केलेल्या या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने मारलेल्या हेलिकॉप्टर शॉटनंतर भारताने विश्वचषक जिंकला होता.
हेही वाचा : IND Vs AUS Final: भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना मी बघत नाही; कोण म्हटले असे? वाचा-
2015 मध्ये पुन्हा विश्वचषक ऑस्ट्रेलियाकडेच
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2015 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा सर्व संघांना पराभूत करून विश्वचषक जिंकला. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला. ब्रेंडन मॅक्क्युलमच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली, मात्र तिसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कचा यॉर्कर पडल्याने न्यूझीलंडचा पराभव जवळपास निश्चित झाला होता.
2019 मध्ये प्रथमच इंग्लंडने कोरले विश्वचषकावर नाव
2019 चा विश्वचषक रोमांचक होता. निर्धारित 100 षटके आणि सुपर ओव्हरनंतरही अंतिम सामना बरोबरीत सुटल्याने चौकार आणि षटकारांच्या गणनेच्या आधारे विजेत्याची निवड करण्यात आली. इंग्लंडने पहिला विश्वचषक ज्या पद्धतीने जिंकला त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.