आहार भान – आवळ्याचे सरबत प्या, रोगप्रतिकार शक्ती वाढवा

aahar bhan how to make Amla syrup, sarbat
आहार भान - आवळ्याचे सरबत प्या, रोगप्रतिकार शक्ती वाढवा

उन्हाळ्यासाठी आता हिवाळ्यात करून ठेवायचे महत्त्वाचे पदार्थ म्हणजे मोरावळा अथवा आवळ्याचा मुरंबा आणि आवळ्याचे सरबत. मार्चपर्यंत रसरशीत आवळे बाजारात मिळतात. आवळ्यामध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. शिजल्यावर पण आवळ्यातील क जीवनसत्व टिकून राहते हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आवळा बहुगुणी आहे. पचन संस्था सुधारतो. त्वचेचा वर्ण सुधारतो. केसाला लावलात तर केस काळे होतात. आजकाल अॅसिडिटी जवळजवळ सगळ्यांनाच असते. त्यासाठीही आवळा उपयोगी आहे. रोज एक चमचा मोरावळा आणि १-२ ग्लास आवळ्याचे सरबत प्यालात तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस मी दीड किलो आवळ्याचे सरबत केले. स्टीलच्या ४-५ उभ्या डब्यांत भरून फ्रिझरमध्ये ठेवले. लागेल तसा एक एक डब्बा काढून खाली फ्रीजमध्ये ठेवला. रोज एक ग्लास सरबत आम्ही तिघे जण घेत असू. चांगले ३ महिने आम्हाला ते आवळ्याचे सरबत पुरले. अजिबात खराब झाले नाही. फक्त पल्प काढायला दरवेळी कोरडा चमचा वापरायचा एवढे पथ्य पाळले.

साहित्य 

ताजे, रसदार आवळे – १ किलो
देशी गूळ – सव्वा किलो
सैंधव मीठ – ४-५ मोठे चमचे
आले – २ इंच
वेलची पूड – ४ चमचे

कृती 

१. आवळे २-३ वेळा पाण्याने चांगले धुवून घ्या.
२. डाग लागलेला भाग काढून टाका.
३. भांड्यात अर्धी वाटी पाणी घालून कुकरमध्ये ४-५ शिट्या घेवून आवळे उकडून घ्या.
४. आले चेचून त्यात २-३ वेळा पाणी घालून त्याचा रस काढून घ्या.
५. देशी गूळ बारीक कापून घ्या.
६. थोडे उकडलेले आवळे, थोडा गूळ, थोडे सैंधव, थोडे आल्याचा रस असे मिक्सर मधून पेस्ट करून घ्या.
७. एका मोठ्या भांड्यात सगळे चांगले मिक्स करा.
८. स्टीलच्या ३-४ उभ्या डब्यात घालून फ्रीझर मध्ये ठेवा.
९. उरलेले सरबत काचेच्या बरणीत किंवा बाटलीत घालून फ्रीज मध्ये ठेवा.
१०. सरबत करताना एक ग्लास पाण्यात दोन चमचे हा पल्प घाला. तुम्हाला हवे असल्यास जास्तीचा गूळ किंवा साखर, मीठ घालू शकता.

पुढच्या काही महिन्यात जेव्हा उन्हातून कासावीस होऊन घरी याल तेव्हा या सरबताने जीव इतका शांत होतो की काही विचारू नका. बाजारातील कृत्रिम सरबतपेक्षा घरी बनवलेले सरबत कधीही आरोग्यदायी असते.

पुढच्या आठवड्यात नक्की मोरावळा आणि आवळा सरबत बनवून ठेवा आणि येता उन्हाळा सुखाने घालवा.

डॉ.ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]


हेही वाचा – आहार भान – लिंबाचे गोड लोणचे