आहार भान – कोहळ्याची पचडी

बऱ्याच घरात कोहळा अजिबात खाल्ला जात नाही. 'कोण ती पाणचट भाजी खाणार', असे उद्गार असतात. पण कोहळ्याचे गुण कळले की नक्की तुमचे मत बदलेल

Ahar Bhan Kohlyachi oachadi
आहार भान - कोहळ्याची पचडी

उन्हाळ्यात नेहमीच्या मसालेदार भाज्या खायला नको वाटतात. त्या मसाल्यांचा त्रासही होतो. तेव्हा ही कोहाळ्याची पचाडी म्हणजे दही घालून केलेली भाजी खूप छान वाटते.

बऱ्याच घरात कोहळा अजिबात खाल्ला जात नाही. ‘कोण ती पाणचट भाजी खाणार’, असे उद्गार असतात. पण कोहळ्याचे गुण कळले की नक्की तुमचे मत बदलेल. कोहळ्यात पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण जास्त. ब आणि क जीवनसत्व खूप असते. वजन कमी करायला उपयुक्त. शरीर थंड करतो. ऍसिडिटी वर गुणकारी आहे. मूत्र दाह, गुदप्रदेशी जळजळ होणे यावरही गुणकारी आहे. कोहळ्याची खीर, पेठा बलवर्धक आहे.

साहित्य 

 • कोहळा – पाव किलो
 • दही – एक मध्यम वाटी
 • कडीपत्ता
 • राई , हिंग
 • कोथिंबीर

कृती

 • कोहळ्याची साल काढून घ्यावी आणि मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
 • एका कढईत दोन छोटे चमचे तेल घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात राई, हिंग आणि कडीपत्ता टाकावा. थोडी हळद टाकावी.
 • या फोडणीत कोहळ्याच्या फोडी घालाव्यात.नीट मिक्स करावे.
 • थोडे पाणी शिंपडून झाकण ठेवावे. गॅस मंद आचेवर ठेवावा.
 • फोडी पारदर्शक झाल्या म्हणजे कोहळा शिजला. गॅस बंद करावा. कोथिंबीर घालून मिक्स करावे.
 • दही फ्रीज मधील असेल तर एक तास आधी काढून ठेवावे म्हणजे गार दही बाधत नाही.
 • भाजी किंचित कोमट असताना दही घालावे.
 • चपाती किंवा भाता बरोबर छान लागते.
 • उन्हाळ्यात आपण खाण्याच्या सवयी थोड्या बदलल्या तर त्रास होत नाही.

डॉ . ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]