वाहतूक, नवीन बांधकामं आणि वाहनांच्या गर्दीमुळे भारतातील वायू प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा सातत्याने खालावत चालला आहे. प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईची राजधानी नवी दिल्लीशी स्पर्धा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
इंधन, लाकूड आणि बायोमास देखील समस्या वाढवणारे घटक असल्याचे सिद्ध झाले आहे. शहरी हवेचे प्रदूषण ज्या दराने वाढले आहे ते खरोखरच चिंताजनक आहे. भारतातील बहुतेक शहरांची हवा विषारी बनली आहे जी हवेच्या गुणवत्तेच्या मूलभूत आरोग्य मानकांपेक्षा खाली गेली आहे. नायट्रोजन आणि ऑक्साईडसारख्या नवीन प्रदूषकांमुळे हवा विषारी बनली आहे.
या प्रदूषकांचा शरीरावर होणारा परिणाम :
अल्पकालीन: प्रदूषित हवेचे तात्काळ परिणाम नाक, घसा, डोळे आणि फुफ्फुसांवर होतात. यामुळे ऍलर्जी आणि संक्रमण होऊ शकते.
दीर्घकालीन: संशोधनानुसार, वायू प्रदूषणाच्या नियमित संपर्कामुळे फुफ्फुसाच्या आजाराचा धोका वाढू शकतो, विशेषत: लहान मुले आणि वृद्धांमध्ये. वायू प्रदूषणामुळे मुलांच्या फुफ्फुसाची क्षमता 20 टक्क्यांनी कमी होऊ शकते.
स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय खबरदारी घ्याल ?
घरामध्ये असताना:
धुराच्या प्रवेशाचा वेग कमी करण्यासाठी आपले दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा. तुमच्या आजूबाजूचा परिसर धूरमुक्त असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, तुम्ही खिडक्या उघडू शकता.
तुम्ही खिडकीसाठी जाळीचे पडदेही वापरू शकता. हे केवळ धूळ आणि प्रदूषणाचे कणच फिल्टर करत नाहीत तर किटकांनाही तुमच्या घराबाहेर ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.
तुम्ही अत्यंत प्रदूषित भागात राहात असल्यास, नियमितपणे स्वच्छ हवा असलेल्या वातावरणात जा.
जर वातावरण प्रदूषित नसेल तर तुम्ही उद्यानात किंवा बागेत जाऊन दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकता.
पिस्ता लिली, क्रायसॅन्थेमम, गोल्डन पोथोस आणि इंग्लिश आयव्ही यांसारखी हवा शुद्ध करणारी रोपे घरात आणून तुम्ही तुमचे घर सुशोभित करू शकता, यामुळे घराचे सौंदर्यही वाढवू शकता आणि घरातील प्रदूषण कमी करू शकता.
हवेच्या गुणवत्तेच्या सूचनांकडे लक्ष द्या
जर आवश्यक नसेल तर घरातून अजिबात बाहेर पडू नका. जर तुम्ही मॉर्निंग वॉकला जात असाल तर काही दिवस घरीच व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
एअर प्युरिफायर वापरा :
प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी हवा शुद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही एअर प्युरिफायर वापरू शकता, जे खोलीतील प्रदूषण काढून टाकण्यास मदत करते. त्याच वेळी, जर घरात लहान मुले असतील किंवा घरात कोणाला श्वसनाचा त्रास असेल तर याचा वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे.
मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नका :
बाहेर जाण्यापूर्वी मास्क अवश्य घाला,जेणेकरुन तुम्ही प्रदूषणाचा अतिरेक टाळू शकाल. N-95 मास्क वापरण्याचा प्रयत्न करा, कारण त्याच्यात प्रदूषणापासून संरक्षण करण्याची क्षमता आहे.
तुमचे वाहन कमी वापरा :
तुम्ही तुमचे वाहन वापरत असाल तर काही दिवस सार्वजनिक वाहतूक वापरा. जर तुम्हाला कमी अंतराचा प्रवास करायचा असेल तर वाहनाचा वापर करण्याऐवजी पायी जाण्याचा प्रयत्न करा.
आहाराकडे विशेष लक्ष द्या :
वाढत्या प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हंगामानुसार फळे आणि भाज्यांचे सेवन करा. पालक आणि ब्रोकोली यांसारख्या हिरव्या भाज्यांचा आहारात नक्की समावेश करावा.
स्वत:ला हायड्रेटेड ठेवा :
प्रदूषणामुळे काही लोकांना कोरड्या खोकल्याचाही त्रास होत आहे. अशा स्थितीत शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. हे टाळण्यासाठी, स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकता येतील. अशा परिस्थितीत तुम्ही घरगुती डिटॉक्स वॉटर, हेल्दी ड्रिंक्स किंवा कोमट पाणी घेऊ शकता.
वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा :
जर तुमच्या ऑफिसने तुम्हाला घरून काम करण्याचा पर्याय दिला असेल तर त्याचा नक्कीच फायदा घ्या. यामुळे केवळ पैशांची बचत होणार नाही, तर वायू प्रदूषण कमी होण्यासही मदत होऊ शकते.
तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर :
तुमच्या शहराच्या हवेच्या गुणवत्तेबद्दल दोन दिवस अगोदर माहिती देणारे,एक भविष्य सांगणारे बाह्य प्रदूषण ॲप डाउनलोड करा. हे तुम्हाला बाहेरच्या हवेला कधी आणि कसे सामोरे जायचे याबद्दल चांगले निर्णय घेण्यास मदत करेल.
या टिप्सच्या मदतीने तुम्ही वाढत्या प्रदूषणात तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता. तसेच, तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांच्या संपर्कात राहा.
हेही वाचा : New luggage law for airlines : एअर इंडियाच्या ‘लगेज रूल्स’ मध्ये नवे बदल
Edited By – Tanvi Gundaye