Ajwain kadha- ओव्याचा काढा प्यायल्याने सर्दी खोकलाच नाही तर सांधेदुखीही होईल दूर

पूर्वापार सुरू असलेल्या रुढीनुसार आजही घरात लहान मुलांना किंवा मोठ्यांना सर्दी पडसे झाले की आजीच्या बटव्यातील औषधे दिली जातात. म्हणजेच घरात सहज उपलब्ध असणारे औषध पदार्थ. जे घरातील मोठी मंडळी मुलांना काढ्यातून तर कधी जेवणातून देतात. यातलाच एक पदार्थ आहे ओवा. औषधी गुण असलेल्या ओव्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. यामुळे काहीजण जेवणातही ओव्याचा वापर करतात.

पण प्रामुख्याने ओव्याचा किंवा त्याच्या पानाचा उपयोग हा सर्दी खोकल्यासाठी, अजीर्ण झाल्यावर केला जातो. आज आपण सर्दी खोकला झाल्यावर ओव्याचा काढा कसा बनवावा ते बघणार आहोत. सध्या सगळीकडे सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत.

त्यातच हिवाळा असल्याने सर्दी पडसे होणे ही सामान्य बाब जरी असली तरी कोरोनाकाळातील सर्दी खोकला हा त्रासदायक आहे. तर थंडी असल्याने सांधेदुखीचा त्रासही अनेकांना होतोय .पण ओव्यातील काही औषधी गुणांमुळे सर्दी खोकल्यापासून सांधेदुखीपर्यंतच्या त्रासापासून आराम मिळतो. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीही हा ओव्याचा काढा घेऊ शकतात.

साहीत्य-दोन ग्लास पाणी, पाच चमचे ओवा, एक चमचा हळद.

कृती- सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी घ्या. त्यात ओवा, हळद टाका. पाणी उकळून आटवून घ्या. एक ग्लास पाणी झाले की हा काढा पिण्यास द्या.
दिवसातून दोन वेळा हा काढा घ्यावा. एक दोन दिवसात लगेच फरक पडतो. छातीत साचलेला कफ आणि शरीरातील घातक द्रव्य खोकल्यातून लघवीतून बाहेर पडते. मोकळे वाटते.तसेच सांधेदुखीचा त्रास होत असेल तर ओवा भाजून एका कॉटनच्या फडक्यात ठेवावा. त्याची पुरचुंडी बनवून दुखऱ्या भागावर त्याने शेकावे. आराम मिळतो.
तसेच सर्दी असल्यास याच पुरचुंडीने छातीही शेकावी आराम मिळतो.