अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासामध्ये काम करणे हे अनेक अंतराळप्रेमी आणि शास्त्रज्ञांचे स्वप्न असते. हे स्वप्न एका भारतीय महिलेने साकार केले आहे. नासाच्या मार्स रोव्हर मोहिमेत मदत करणारी आणि मंगळावर रोव्हर चालविणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.ती महिला म्हणजेच डॉ. अक्षता कृष्णमूर्ती. अंतराळात काम करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अक्षता हे उत्तम प्रेरणादायी उदाहरण आहे. अक्षता ही नासाच्या त्या मोहिमेचा भाग होती ज्या अंतर्गत अंतराळ संस्था मंगळावर काही नमुने गोळा करत होती. मंगळ पर्सिव्हरन्स मोहीम ही नासाच्या चंद्र-ते-मंगळ शोध पद्धतीचा एक भाग होती. त्यात अक्षताचाही सहभाग होता. पुढील काही वर्षांत हे नमुने पृथ्वीवर परत आणले जातील.
रॉकेट सायंटिस्ट असलेल्या डॉ. अक्षता कृष्णमूर्ती हिचा अंतराळ क्षेत्रातील प्रवास अनोखा आणि प्रेरणादायी आहे. तिने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटिक्स आणि अॅस्ट्रोनॉटिक्समध्ये पीएच.डी. केली आहे. अक्षता ही नासा मध्ये इन्वेस्टिगेटर आणि मिशन सायन्स फेज लीड्स या पदावर आहे.

लोकांनी तिच्या अंतराळा क्षेत्रात काम करण्याच्या स्वप्नांबद्दल तिला अविश्वास दाखवला होता परंतु तिने त्याकडे लक्ष न देता आपलं काम सुरूच ठेवलं. अक्षता म्हणते की, “मी 13 वर्षांपूर्वी अमेरिकेत नासा येथे काम करण्यासाठी आले होते. जमिनीवर आणि मंगळावर विज्ञान आणि रोबोटिक ऑपरेशन्सचे नेतृत्व करण्याचे माझे स्वप्न होते. बरेच लोक म्हणाले की हे माझ्यासाठी अशक्य आहे. व्हिसानुसार मी परदेशी नागरिक असल्याने, अनेक लोकांनी मला माझे क्षेत्र बदलण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला काहीतरी वेगळं प्लॅन करायला सांगितलं.”
परंतु अक्षताने हार मानली नाही आणि ती खंबीरपणे उभी राहिली. तिच्यामते कोणतंही काम करायचं असेल तर वेडेपणा आवश्यक आहे. मात्र, या प्रवासात तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, खूप संघर्ष करावा लागला. पीएचडी पूर्ण झाल्यानंतर तिला नासामध्ये नोकरी मिळाली. डॉ. कृष्णमूर्ती नासाच्या मालकीच्या संशोधन प्रयोगशाळेतील जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्ये सामील झाली आणि तिने नासाच्या प्रकल्पांवर काम करणे सुरू केले. पदवी मिळवण्यापासून ते पूर्णवेळ काम सुरू करण्यापर्यंत काहीही सोपे नव्हते. ती म्हणते, “आज मी अनेक प्रकारच्या अंतराळ मोहिमांसाठी काम करते. कोणतेही स्वप्न कठीण नसते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कठोर परिश्रम करा. तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी नक्कीच पोहोचाल.”
हेही वाचा : Successful Tips : यशस्वी होण्यासाठी हा आहे उत्तम मार्ग
Edited By – Tanvi Gundaye