गेल्या काही वर्षांत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटात सोशल मीडियाचे क्रेझ प्रचंड प्रमाणार वाढलं आहे. यामुळे आयुष्यातील खास क्षण कॅमेऱ्यात कैद करून जगासोबत शेअर करायचा ट्रेंडही वाढत आहे. मग ते प्री-वेडिंग फोटोशूट असो, मॅटर्निटी फोटोशूट असो किंवा नवजात बाळाचे बेबी फोटोशूट असो . फोटो शूटचे हे वेड मोठ्यांनाही लागलं आहे. प्रामुख्याने सेलिब्रिटी असे शूट करत असल्याने सामान्य नागरिकही त्यांना कॉपी करू लागले आहेत. पण तज्ज्ञांच्या मते पालकांना नवजात बाळाचे फोटोशूट करण्यात किती जरी आनंद मिळत असला तरी हे बेबी फोटो शूट बाळासाठी मात्र हानिकारक ठरू शकते. यामुळे प्रत्येक पालकांनी बेबी फोटो शूट करण्याआधी त्यामागची वैद्यकिय कारणे जाणून घेणे महत्वाचे आहे.
आई बाबा होणं हा प्रत्येक जोडप्यासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी सर्वौच्च आनंदाच क्षण असतो. घरात आलेल्या या चिमुकल्या पाहुण्यांच स्वागत करण्यासाठी त्याचं कोडकौतुक करण्यासाठी सगळेचजण उत्साहीत असतात. यामुळे हा आनंद इतरांसोबत शेअर करण्यासाठी बाळाची झलक मित्रमैत्रीण, नातेवाईकांना दाखवण्यासाठी बरोबर सेल्फी काढले जातात. पण काही पालक आपल्या मुलासाठी इतके उत्साहित असतात की ते त्यांचे फोटोशूट करून घेण्यास सुरुवात करतात. पण नवजात मुलाचे फोटोशूट करून घेणे डोकेदुखी ठरू शकते. लहानशा चुकीचा मुलाच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि भविष्यात समस्याही निर्माण होऊ शकतात.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या स्कोपिंग रिव्ह्यूच्या अहवालात बेबी फोटो शूट लहान मुलांसाठी अपयाकारक कसे आहे याबदद्ल सांगण्यात आले आहे.
स्कोपिंग रिव्ह्यूच्या अहवालानुसार आपण बऱ्याचेवळा लहान गोंडस बाळाचे कलरफुल टॉवेल किंवा कपड्यामध्ये गुंडाळलेले विविध पोजमधले फोटो, व्हिडीओ पाहतो. प्रामुख्याने बाळ १२ दिवसांचे किंवा एक, दोन महिन्याचे असताना हे शूट केले जोते. कारण या दिवसात बाळ सतत झोपून असते. ते हालचाल करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे हवे तसे फोटो काढणे फोटोग्राफरसाठी सोयीचे असते. फोटोमध्ये बऱ्याचवेळा टॉवेलमध्ये गुंडाळलेले हे बाळ कधी उताणे दिसते, तर कधी कुशीवर झोपलेले, तर कधी पाठीचा भाग वर करून त्याला झोपवलेले असते. या फोटोंमध्ये बाळ फारच निरागस, गोड दिसते. त्यामुळे बाळाच्या या पोझीशन बघून आपल्यालाही गंमत वाटते. त्यातून आनंद मिळतो.
पण वैद्यकियदृष्ट्या काही दिवसांच्या किंवा महिन्यांच्या नवजात बालकांचे शरीर फार नाजूक असते. त्यांची हाडेही नाजूक असतात. यामुळे त फोटो आकर्षक यावे यासाठी त्यांना उलट, सुलट करून झोपवणे अयोग्य आहे. कारण अशा पद्धतीने बाळाला झोपवल्यामुळे त्याच्या पाठीचा कणा, सांधे, नसांवर ताण येतो. त्याचा परिणाम रक्ताभिसरणावर होऊ शकतो. प्रसंगी असे फोटोशूट लहान मुलाचा जीवही घेऊ शकतात.
हल्ली बाळाच्या फोटोशूटमध्ये बेडकासारखी पोझ खूप सामान्य आहे. यामध्ये मुलाला गालावर दोन्ही हात ठेवलेल्या अवस्थेत बसवले जाते. नवजात शिशू स्वतःचा तोल सांभाळू शकत नाही, त्यामुळे या पोझमध्ये चूक झाल्यास मुलाचा चेहरा जमिनीवर आदळू शकतो आणि हाताला धक्का बसू शकतो.
या स्थितीमुळे मुलाची लहान हाडे देखील मोडू शकतात. याशिवाय काही पोझ लटकलेल्या अवस्थेत असतात. यामध्ये मुलाला कापडात बसवले जाते. याला हॅमॉक पोझ म्हणतात. यामध्ये मुलाला टांगण्यासाठी वापरलेले कापड अतिशय हलके असते. जर त्याची गाठ उघडली किंवा मुलाने आपली स्थिती बदलली तर तो खाली पडू शकतो .फोटोसाठी बटाट्याच्या सॅकमध्येही मुलाला कापडात गुंडाळले जाते आणि हात तोंडाच्या खाली ठेवले जातात. ही पोझ खूप सुंदर दिसते. पण बाळासाठी ती धोकादायक ठरू शकते.
या फोटोशूटमध्ये मुलाला तीन वेळा कापडात गुंडाळले जाते. यामुळे पालकांनी प्रथम तपासावे की पहिली गाठ घट्ट बांधली गेली आहे जेणेकरून मुलाच्या पाठीला आणि मानेला आधार मिळेल. यानंतर, उर्वरित दोन वेळा गुंडाळा. यामध्ये मुलांच्या सांध्यावर आणि नितंबांवर दाब तर नाही ना हे वारंवार तपासावे.
त्याचप्रमाणे, एक बकेट पोझ असते. ज्यामध्ये मुलाला बादलीमध्ये उभे केले जाते आणि तोंडाला आधार दिला जातो. यामुळे मुलांच्या सांध्यांनाही इजा होऊ शकते.
काही फोटोंमध्ये, मुलाच्या तोंडाच्या खाली हात ठेवला आहे जसे की मुलं काहीतरी विचार करत आहे. अनेक वेळा त्याच्या डोळ्यांवर चष्माही बांधला जातो.
वास्तविक, नवजात अर्भकाची हाडे खूप मऊ असतात, त्यामुळे त्यांची फ्रॅक्चर किंवा तुटण्याची दाट शक्यता असते. मुलांची मानही फार नाजूक असते. ती ही जपावी लागते.
काही अतीउत्साही पालक आपल्या नवजात मुलाचे त्याच्या मोठ्या भाऊ किंवा बहिणीसोबत फोटोशूट करून घेतात. जर मोठे मूल 2 ते 4 वर्षांचे असेल तर नवजात बाळाला कसे धरायचे ते त्याला समजत नाही. यामुळे शक्यतो असे फोटोशूट टाळावे.
दरम्यान, काही जण आपल्या पाळीव प्राण्यांसोबत नवजात मुलाचे फोटोशूटही करून घेतात. पण प्राण्याचे नख मुलाला लागले किंवा त्यांचे केस तोंडात गेल्याने बाळाला त्रास होऊ शकतो. तसेच मुलांना पाळीव प्राण्यांची ॲलर्जी होण्याचा धोकाही असतो.
वास्तविक, नवजात बाळाची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. अशा परिस्थितीत पाळीव प्राण्यांमधील कोणताही जीवाणू किंवा विषाणू मुलाच्या शरीरात शिरल्यास ते त्यांना आजारी बनवू शकतात. त्यामुळे नवजात बाळाला पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवावे. यामुळे पालकांनी बेबी फोटो शूट करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.