स्वावलंबी म्हणजे काय की, आत्मनिर्भरता असाच त्याचा अर्थ होते. तुम्ही जेव्हा आत्मनिर्भर असता तेव्हा तुमच्यामधील आत्मविश्वास वाढतो आणि कोणत्याही प्रसंगाला तुम्ही ठामपणे सामोरे जाऊ शकता. खरंतर अशी आपल्याकडे म्हण सुद्धा आहे की, ‘एकटे आलो आहोत, तर एकटेच जायचे आहे’. त्यामुळे आता जरी प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहत असली तरीही स्वावलंबीपणा हा प्रत्येकात असलाच पाहिजे. नवरा कमावतोय, तुम्ही सुद्धा कमावताय हे सर्व ठिक आहे. परंतु जेव्हा तुमच्यासमोर एखादी अशी परिस्थिती निर्माण होते ज्यामध्ये तुमचा नवरा सुद्धा कामी पडत नाही तेव्हा तुमची आत्मनिर्भरता फार कामी येते. तुम्ही ती स्थिती कशी उत्तम पद्धतीने हाताळू शकता याची कौशल्ये तेथे कामी पडतात.
सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमध्ये स्वावलंबीपणा हवाच. त्यामुळे मैत्रिणींनो, स्वावलंबी असाल तरच सध्याच्या स्पर्धेच्या जगात पुढे जाऊ शकता आणि टिकू शकता. कोणीही कोणासाठी थांबलेले नसते हे नेहमीच लक्षात ठेवा. त्यामुळे जे योग्य वाटतेय ते करा आणि पुढे चालत रहा. काही वेळेस असे होते की, एखादी गोष्ट मनापासून करायची असते पण ती करण्यासाठी समस्या येत राहतात किंवा कोणतरी त्यासाठी अडवणूक करत असतो. यामुळे आपण आपली आवड तेथेच सोडून देतो. अशी स्थिती लग्नानंतर फार वेळा उद्भवते. आपल्याला करायचे असते पण मुलं आणि चुलं यामध्येच आपण अडकून राहतो. यावेळी आपल्याला आपल्यावरील जबाबदाऱ्यांची काळजी वाटत राहते. परंतु जेव्हा तुम्ही तुमचे मत परखडपणे एखाद्या समोर विश्वासाने मांडता तेव्हा, तुमचा ते काम करण्यासाठीचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता स्पष्टपणे दिसून येतो.
या उलट स्थिती ज्या तरुणींचे लग्न झाले नाही किंवा लग्न होणार असेल अथवा शिक्षण पूर्ण होऊन आता करियरला सुरुवात करण्याची असेल अशावेळी ही स्वावलंबन फार महत्वाचे. स्वबळावर आयुष्यातील काही गोष्टी करण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे. कोणालाही न घाबरता तुम्ही कोण आहात आणि तुमच्यात काय वेगळेपण आहे हे दाखवता आले पाहिजे. तुमच्या मेहनीच्या जोरावर सर्वकाही साध्य होईलच. त्याचसोबत त्या गोष्टी तुम्ही आत्मनिर्भर असाल तर किती वेगळेपणाने होतील या दृष्टीकोनातून ही पहा. नेहमीच एका चौकटीत राहून विचार करणे सध्या सोडून द्या. चौकटीबाहेर पडा आणि आयुष्य जगा, आत्मनिर्भर व्हा.
मैत्रिणींनो आयुष्य जगण्याची संधी ही पुन्हा पुन्हा मिळत नाही त्यामुळे ज्या काही इच्छा-आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न तरी करा. लोकांना तुमच्याकडे बोटं दाखवण्याची वेळच आणू देऊ नका. ऐवढे आत्मनिर्भर व्हा की, कठीणातील कठीण प्रसंगाला तुम्ही शांत डोक्याने आणि विचारपूर्वक घेऊ शकता. जेव्हा तुमच्यात असा बदल होईल तेव्हा पहा तुमचे आत्ताचे आयुष्य आणि यापूर्वी जगत असलेले आयुष्य यामधील किती मोठा पल्ला तुम्ही गाठला आहात. स्वावलंबीपणाने आत्मविश्वास वाढतोच पण तुम्ही एक कर्तव्य निष्ठ व्यक्ती म्हणून उभे राहता. मन प्रसन्न राहते आणि करत असलेल्या गोष्टींमधून आनंद ही मिळत राहतो. हेच खरं आयुष्य जगण्याच सिक्रेट आहे. त्यामुळे आनंदी रहा आणि तुमचा आनंद दुसऱ्यांना ही शेअर करायला विसरु नका.
हेही वाचा: Career Option : महिलांनो ‘या’ ट्रेंडिंग क्षेत्रांमध्ये करा करिअर