सध्या बोर्डाच्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थी तणावग्रस्त आहेत. विद्यार्थ्यांना आता या दिवसांमध्ये त्यांची परीक्षेची राहिलेली तयारी पूर्ण करावी लागेल आणि परीक्षेला बसावे लागेल. याकरताच आज आपण जाणून घेऊयात काही अशा सोप्या ट्रिक्स ज्या पेपर सोडवताना वेळेचे नियोजन करण्यासाठी कामी येऊ शकतील.
1) 15 मिनिटे योग्यरित्या वापरा :
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 10 ते 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जातो. विद्यार्थ्यांनी या वेळेचा योग्य वापर करावा आणि प्रथम प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचावी. अशा प्रकारे प्रश्नांबाबत गोंधळ होणार नाही, कोणत्या विभागात किती प्रश्न विचारले जातात किंवा किती प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत हे आधी नीट समजून घ्यायला हवे.
2) आधी सोपे प्रश्न सोडवा :
पेपर सोडवताना सर्वात आधी सोप्या प्रश्नांची उत्तरे लिहून घ्या. म्हणजे उर्वरित वेळात तुम्हाला कठीण प्रश्नांवर विचार करायला वेळ मिळू शकेल आणि तुम्ही त्याची सविस्तर व योग्य उत्तरे लिहू शकाल.
3) एकाच प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका :
परीक्षेत एकाच प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका. जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेतील कोणताही प्रश्न माहित नसेल तर तो सोडून द्या आणि पुढे जा व इतर प्रश्न सोडवा. बऱ्याचदा परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर इतका असतो की ज्या प्रश्नांची उत्तरे त्यांना माहित नसतात, त्या प्रश्नांचाही ते विचार करत राहतात आणि काहीही लिहित राहतात. जरी त्याचे उत्तर चुकीचे असले तरी. अशा परिस्थितीत नको त्या प्रश्नावर वेळ घालवण्यापेक्षा बाकीचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवे.
4) लांब उत्तरे लिहिताना त्याचे विभाग करा :
बऱ्याच वेळा, विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणारे दीर्घ उत्तर असणारे प्रश्न सोडवण्यात बराच वेळ घालवतात, ज्यामुळे त्यांना परीक्षेत वेळेची कमतरता भासते. तुमच्यासोबत असे होऊ नये म्हणून, अशा प्रश्नाचे उत्तर लहान भागांमध्ये विभागून घ्या. प्रत्येक भागातील काही ठरावीक मुद्दे ठळकपणे अधोरेखित करा. त्या भागांना शीर्षक द्या. यामुळे उत्तर मोकळे व सुटसुटीत दिसेल तसेच महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला व्यवस्थित मांडता येतील.
हेही वाचा : Beauty Tips : ग्लोइंग स्किनसाठी बेस्ट डिटॉक्स ड्रिंक्स
Edited By – Tanvi Gundaye